आपल्या मूळ विषयाकडे वळण्याआधी स्वार्थ-निस्वार्थपणाबाबत एक मुद्दा स्पष्ट करू. जो निस्वार्थी आहे त्याचा स्वार्थ पूर्ण सुटला असला पाहिजे म्हणजेच त्याची कृती ही पूर्णपणे स्वार्थरहित असली पाहिजे, असे आपल्याला वाटते. ते चूक की बरोबर, हा तो मुद्दा आहे. मागेच आपण पाहिलं की एकानं श्रीमहाराजांना विचारलं होतं की, महाराज व्यवहारात लबाडी करावी लागते तर ती करावी की नाही? त्यावर श्रीमहाराजांनी उत्तर दिलं होतं की दुसऱ्याची लबाडी ओळखता येईल एवढी लबाडी आपल्यात असावी! त्यालाच समांतर असा हा मुद्दा आहे. निस्वार्थीपणा म्हणजे स्वार्थाचा संपूर्ण त्याग का? स्वार्थाची जाणीवच नसावी का? तर याचं उत्तर असं की, दुसऱ्याला त्याचा स्वार्थ जोपासायला वाव मिळेल इतके आपले वर्तन निस्वार्थ नसावे. कारण निस्वार्थीपणा म्हणजे व्यवहाराच्या विरुद्ध जाणे नव्हे. ज्याला व्यवहारच सुटला आहे त्याचा प्रश्नच वेगळा पण जो व्यवहारात राहून परमार्थ करीत आहे त्याला हे व्यवधान पाळावेच लागेल. यासाठी निस्वार्थीपणा नेमका का हवा, हे लक्षात घेतले पाहिजे. निस्वार्थीपणा म्हणजे ‘मी’ आणि ‘माझे’च्या जखडणीतून सुटणे. प्रपंचातली आसक्ती सुटणे. कोणतीही कृती करताना त्यात ‘मी’ आणि ‘माझे’च्या जपणुकीची धडपड न उरणे. याचा अर्थ स्वतचा पूर्ण तोटा करून घेणे नव्हे, दुसऱ्याकडून फसविले जाणे नव्हे, दुसऱ्याला गैरफायदा घेऊ देणे नव्हे! प्रसंगी दुसऱ्याच्या स्वार्थालाही भेदावे लागेल. जेव्हा व्यवहारात राहून परमार्थ करता करता मन भगवंताला संपूर्ण समर्पित होईल तेव्हाची गोष्ट वेगळीच असेल. तर गेल्या भागात आपण काय पाहिलं? सारं काही इथेच सोडून जायचं आहे. इथलं काहीही बरोबर येणार नाही. जे खरंखुरं ‘माझं’ आहे ते माझ्याबरोबर यायलाच पाहिजे. पण इथली एकही वस्तू, इथला नावलौकिक माझ्याबरोबर येणार नाही. मग तो खऱ्या अर्थानं माझा नाहीच. मी ज्यांच्यासाठी तळमळतो किंवा जी माझ्यासाठी तळमळतात अशी ‘माझी’ माणसंही माझ्याबरोबर येणार नाहीत किंवा मीसुद्धा त्यांच्याबरोबर जाणार नाही. तेव्हा या जगात ना कोणतीही वस्तू माझी आहे, ना कोणीही व्यक्ती माझी आहे. आपल्या प्रदीर्घ विषयांतरानंतर आपण पुन्हा त्याच मुद्दय़ाकडे वळत आहोत. या जगात ज्याचं कुणीच नाही, असे आपणच आहोत! श्रीमहाराजांचं वाक्य होतं- ‘‘ज्याला कोणी नाही त्याचे करणे ही देवाची सेवाच नाही का?’’ तेव्हा या जगात ज्याचं कुणी नाही, असे आपणच आहोत. आपल्यालाच मदतीची गरज आहे. ही मदत कोणती? एका व्यक्तीने आपल्या एका अडचणीबद्दल श्रीमहाराजांना सांगितलं. महाराजांनी त्यावर उपाय सांगितला. तरी तो म्हणाला, महाराज मी ते करीनही पण आपण तेवढी कृपा करा. महाराजांनी पुन्हा तोच उपाय सांगितला. त्यानंही तेच उत्तर दिलं. शेवटी महाराज म्हणाले, माझी कृपा आहेच पण आधी तुम्हीही माझ्यावर एवढी कृपा करा आणि मी सांगतो ते करा! तेव्हा श्रीमहाराजांकडून मदत येतेच आहे पण मीसुद्धा स्वतला मदत केली पाहिजे ना?