हे चि परमसेवा, मज सर्वात्मकाची! तुला लाभलेला अत्यंत दुर्मीळ असा, एकमात्र असा जो मनुष्यजन्म आहे तो माझ्या परम सेवेसाठी लाभला आहे. इथे ‘सर्वात्मक’ असा शब्द वापरला आहे. तो कळायला  ‘सर्वात्मक’चा अर्थ आहे सर्वत्र भरून असलेला अर्थात सर्वामध्ये, सर्व रूपांत, सर्व प्राणिमात्रांत व्याप्त असलेला. आता आपलं जीवन कसं आहे हो? ते एकाकी आहे का? नाही. कुणाला असं वाटतही असेल की, मुलं उच्चशिक्षण वा नोकरीनिमित्त दूरदेशी आहेत, जवळ नाहीत, जीवनाचा जोडीदारही काळाच्या पडद्याआड गेला आहे, तर मी एकाकी आहे. कुणी लग्न-बिग्न केलं नसेल तर त्यालाही वाटतं की मी एकटा आहे. प्रत्यक्षात समाजात वावरणारा, नात्यागोत्याच्या गुंत्यात असलेला माणूस कधीच एकटा नसतो. या समाजाशी, आप्तस्वकीयांशी त्याचा संबंध असतोच, येतोच. या संबंधांकडे पाहताना आणि त्या संबंधांनुरूप व्यवहार करताना, हा व्यवहार मात्र ‘मी’पणानेच होतो. कर्तव्यापुरती व्यवहाराची मर्यादा राखली तर त्या गुंत्यात आपण अडकत नाही. आपण मात्र कर्तव्यापुरत्या व्यवहाराची मर्यादा ठेवत नाही तर त्यापलीकडे भ्रम, मोह, आसक्ती, आवड-निवड, प्रेम-द्वेष, आत्मीयता-तिरस्कार, आप-पर भाव अशा भावनांनी आपण वागत जातो आणि अनेकदा वाहवत जातो. मग कर्तव्याचं आचरण ही केवळ भगवंताची सेवा आहे, असं मानलं तर? म्हणजे मला नात्यातल्या एखाद्या आजारी माणसाची सेवा करावी लागत आहे तर कर्तव्याच्या चौकटीत ती सेवा अंगचोरपणा न करता आणि माझी जेवढी क्षमता आहे त्यानुसार ती पार पाडणं, ही जर ईश्वराची इच्छा मानलं, ईश्वराचे मनोगत मानलं, ईश्वराची सेवा आहे, असं मानलं तर सोपं होईल. पण ‘मी’ अमक्यासाठी अमुक करीत आहे, ‘मी’ अमक्याची सेवा करीत आहे, हा भ्रम असेल तर गोंधळाचं बीज पेरलं जाईल. आता याचा अर्थ असा नव्हे की, जीवन नीरसपणे, रूक्षपणे, एकसाचीपणे मला जगावं लागणार आहे. कधी कुणाशी भांडावंही लागेल, कधी कुणाला चार शब्द सुनवावेही लागतील, कधी कुणाचे चार शब्द ऐकूनही घ्यावे लागतील, कधी कुणाशी मतभेद होतील. पण हे सर्व प्रसंगपरत्वे आणि मूळ हेतू अहंकारजन्य नसेल तर कोणताही धोका नाही. आईला मुलाला ओरडावं आणि प्रसंगी मारावंही लागेल, मालकाला नोकराला ओरडावंही लागेल.. पण त्यात अहंच्या परिपोषाचा हेतू नसावा. चित्रपटसृष्टीत एक वाक्यप्रयोग फार छान आहे पाहा. एखादा कसदार अभिनेता आपल्या यशाचं श्रेय दिग्दर्शकाला देताना सांगतो की, ‘आय अ‍ॅम डायरेक्टर्स अ‍ॅक्टर’. मी दिग्दर्शकाच्या आदेशाबरहुकूम प्रसंग वठवणारा अभिनेता आहे! तसं दिग्दर्शकाच्या जागी सद्गुरूंना मानलं तर? तरच ‘अभिनय’ही सुयोग्य होईल, अस्सल होईल पण आपण खरे कोण आहोत, कुणाचे आहोत, याचं आतलं भान कधी सुटणार नाही! प्रत्येक प्रसंग वठवताना त्या अभिनेत्याला जसं दिग्दर्शकाच्या सांगण्याचं भान असतं, तसं जीवनातल्या प्रत्येक प्रसंगात गुरुबोधाचं भान असेल!