देवांना मृत्युग्रस्त म्हटल्याने आपल्या मनाला थोडा हादरा बसतो कारण इथे अभिप्रेत असलेला ‘देव’ आणि ‘परमात्मा’ याबाबतची आपल्या मनात असलेली सरमिसळ. मुळात आपण देव म्हणजेच परमात्मा मानतो किंवा ब्रह्मा, विष्णू, शिव, गणपती, लक्ष्मी, सरस्वती, दत्त आदी परमात्म्याची जी जी रूपे वा अवतार आहेत त्यांना आपण देवच म्हणतो. त्यामुळे ‘मृत्युग्रस्त देव’ या शब्दयोजनेनं थोडा गोंधळ होऊ शकतो. तेव्हा इथे देव म्हणून परमात्म्याची रूपे अभिप्रेत नाहीत, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर हेही खरे की इंद्रलोकातील देवीदेवता मृत्युग्रस्त आहेतच. गीतेतही आपण हेच पाहिलं की, स्वर्गप्राप्तीकारक अशी पुण्यकर्मे करूनही जीव ‘देव’पदवीला जाईल, पण जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणार नाही. मग जो स्वत: मृत्यूच्या तावडीत आहे तो दुसऱ्याचं मरणभय कसं कमी करणार? म्हणूनच ‘एकनाथी भागवता’त नारदमुनींच्या मुखी ओवी आहे की, ‘ते देव मृत्युग्रस्त पूर्ण। मा भजत्याचें मरण कोण वारी।।’ मग जो केवळ त्या परमात्म्याचेच स्मरण करतो आणि त्या परमात्म्याचाच होऊन जातो तोच सर्व तऱ्हेच्या भवभयातून मुक्त होतो. गीतेतील दोन श्लोकांमध्ये श्रीकृष्णही तेच सांगतात. ‘अनन्याष्टिद्धr(२२४)चन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।। २२।।’ आणि ‘मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू। मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण:।। ३४।।’ जो अनन्यभावाने माझं चिंतन करतो त्याचा योगक्षेमाचा भार मी घेतो. ही झाली भौतिकालाही स्पर्शिणारी पहिली पायरी. मग? ज्याचं मन मलाच व्यापून असतं आणि माझ्याच भक्तीनं भारलं असतं, जो कोणत्याही आकाराला न भुलता माझ्याच नमस्कारात बुडाला असतो असा जो मत्परायण भक्त आहे तो माझ्यातच विलीन होतो, तो आणि मी एकच होतो! तेव्हा काळजीचा नाश करायचा तर परमात्म्याचंच स्मरण पाहिजे. आता नारदमुनींना अभिप्रेत जो ‘परमात्मा’ आहे त्यामागेही मोठे रहस्य आहे. ते कोणते आणि खरा परमात्मा तरी कोणता, याचा आपण काही दिवसांतच अगदी तपशिलात विचार करणार आहोत. त्याआधी आपल्या ज्ञाताच्या प्रांतानुसार अज्ञात अशा परमात्म्याचा आणि त्याच्या भक्तीचा थोडा विचार करू. आज आपल्याला काळजीची जाणीव आहे पण भगवंताची जाणीव नाही. याचं कारण अगदी सोपं आहे ते म्हणजे ज्या कारणांमुळे काळजी लागते ती कारणे माझ्या जगण्याचा भाग आहेत. त्यांचा मला अनुभव आहे. म्हणून ती मला सत्य वाटतात. भगवंताचा मात्र मला अनुभव नाही. त्यामुळे तो कल्पनेच्या पातळीवर राहतो. तो सत्य वाटत नाही. संकट ओढवलं आहे, ते डोळ्यांसमोर दिसत आहे, असे असताना त्याची काळजी सुटावी म्हणून जो मला दिसत नाही, जो माझ्या अनुभवाचा विषय नाही, जो मला खरा वाटत नाही, त्याचं भजन-स्मरण करण्याचा उपाय माझ्या मनाला रुचत नाही. नव्हे तो उपाय अतक्र्य आणि अशक्यही वाटतो. आपली ही स्थिती आहे!