क्षणोक्षणी ‘स:’चं अर्थात परमात्म्याचं अनुसंधान राखायचं तर प्रापंचिक कर्तव्यात उणेपणा येईल, असा पवित्रा घेणाऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ३०वी ओवी बजावते- ‘‘देख पा जनकादिक। कर्मजात अशेख। न सांडिता मोक्षसुख।  पावते जाहले।।’’ जनकादिकांनी कर्ममात्रांचा मुळीच त्याग केला नाही, पण तरी त्यांना मोक्षसुख मिळालंच! आपल्या सर्वसामान्य जीवनातही किती जबाबदाऱ्या असतात, किती कटकटी असतात, किती अवधानं असतात; मग जनक तर राज्याचा गाडा हाकत होते. त्यांना किती व्याप असतील? किती मोठमोठय़ा जबाबदाऱ्या असतील? तरी त्यांचं शाश्वताचं अनुसंधान कणमात्रही ढळलं नाही आणि जिथं शाश्वताचं अनुसंधान असतं ना, तिथं अशाश्वत घाबरवूच शकत नाही! जिथं शाश्वताचं क्षणोक्षणी स्मरण आहे तिथे साक्षित्व आहे. साक्षित्व म्हणजे तटस्थ वृत्तीनं प्रसंगात वावरणं. आपल्या जगण्यात साक्षित्व असतं का? नाही. आपण प्रत्येक प्रसंगात देहबुद्धीनुसार वागत, वावरत आणि वाहवतही असतो. ज्या परिस्थितीमुळे आपण गांगरून जातो, घाबरून जातो ती परिस्थिती खरंच तितकी बिकट असते का? ज्या व्यक्तीमागे आपण वाहवत जातो त्या व्यक्तिची खरंच तशी योग्यता असते का? कधी आपला राग अनावर होतो, कधी प्रेम अनावर होतं, पण तो राग वा ते प्रेम अनाठायी तर नसतं ना? आपण प्रसंग घडून गेला की नंतर आपल्या वर्तनाचा विचार करतो. त्यापेक्षा प्रत्येक प्रसंगात साक्षित्व टिकलं तर? ते कशानं टिकेल? तर देहबुद्धीच्या जागी आत्मबुद्धी जागी होईल तेव्हाच! मग प्रत्येक प्रसंगात जसं वागणं आवश्यक आहे तसंच वागत असतानाही आपलं चित्त त्यापासून अलिप्त असेल. कधी दुसऱ्यावर रागवायची गरज असेल, कधी प्रेमाची गरज असेल, कधी कठोर होण्याची गरज असेल.. तरी आतमध्ये आपण ‘स्व’स्थच असू! त्यासाठी प्रत्येक कर्मात आधी साक्षित्वाचा अभ्यास केला पाहिजे. ‘स:’चं म्हणजेच परमात्म्याचं अनुसंधान जसं टिकेल आणि वाढेल तसतसं हे कर्मातलं साक्षित्व साधेल. व्यवहार करीत असतानाच परमात्मस्मरण कसं साधता येतं, हे स्वामी स्वरूपानंद यांनी एका मार्मीक रूपकातून सांगितलं आहे. ते म्हणतात, ‘‘कांगारूच्या मादीच्या पोटाला बाहेरून पिशवी असते. आजूबाजूला कोणी नाही,असं पाहून ती आपली पिल्लं पिशवीतून बाहेर काढते आणि त्यांच्याशी खेळते. कोणाची चाहूल लागली की झटपट आपली पिल्लं पिशवीत ठेवून देते. पुन्हा कोणी नाही असं पाहून पिल्लं बाहेर काढते व त्यांच्याशी खेळते. व्यवहार आणि नाम (उपासना) यांची अशी सांगड साधली पाहिजे.’’ (स्वामी स्वरूपानंद : एक अलौकिक राजयोगी, लेखक- म. दा. भट, प्रकाशक- जोशी ब्रदर्स, पुणे, पृ. ३५). असा साक्षीभाव आणि उपासनेबाबत सजगता असेल तरच सद्गुरू बोध नीट ऐकला जाईल! जीवनातील चढउतारांकडे थोडंतरी तटस्थपणे पाहता येईल. वेळेचा अपव्यय कमी होऊ लागेल आणि आपल्या आचरणाकडे आपल्याकडून सजगतेनं पाहिलं जाईल. अशाश्वतातला रस कमी होईल, शाश्वताची ओढ लागेल.