राम कर्ता आहे, या भावनेनं नामस्मरण करायचं, म्हणजे मी कर्ता नाही, भगवंत कर्ता आहे. हे सर्व चराचर तोच सांभाळतो आहे. त्या चराचराचा मी एक घटक आहे. माझ्या क्षमतेनुसार, आकलनानुसार पूर्ण प्रयत्न करणं एवढंच माझ्या हातात आहे. फळ तोच देईल. जोवर माझी इच्छा आणि त्याची इच्छा यात भेद आहे तोवर माझ्या इच्छेची दिशा आणि माझ्या प्रयत्नांची दिशा यातही भेद राहणारच. मुळात प्रयत्न काय आणि कसे करावेत, याबाबतच्या आकलनातही गोंधळ असणार. त्यामुळेच माझी इच्छा आणि माझे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांचं फळ यात भेद राहणार. जेव्हा माझी आणि त्याची इच्छा एकच होईल तेव्हा कृतीही त्याच्याच इच्छेनुरुप घडेल आणि फळही तेच लाभेल. चराचरात व्याप्त भगवंताच्या इच्छेत माझी इच्छा मिसळण्याचा प्रयत्न हाच जीवनात साधायचा सर्वात मोठा प्रयत्न आहे. तो माझ्याकडून होत रहावा, त्यासाठी चराचरात व्याप्त भगवंतासमोर मी नतमस्तक रहावं, या भावनेनं होणारा जप हा ‘राम कर्ता’ या जाणिवेनं होणारा जप! जीवन भगवंतकेंद्रित बनवणं, हा नामाचा हेतू आहे. माझी आणि त्याची इच्छा एक होईल, तेव्हाच जगणं भगवंतकेंद्रित म्हणता येईल. भगवद्इच्छा जाणण्याची शक्ती केवळ त्याच्या नामातच आहे. ती शक्ती जागवण्यासाठी नेम आहे. ‘तोच एक परमात्मा या चराचरात व्याप्त आहे, त्याला माझा नमस्कार’ हाच यच्चयावत् सर्व नाममंत्रांचा एकमेव अर्थ आहे. ‘नमस्कार’ म्हणजे आपण करतो ती कोरडी कृती मात्र नव्हे. ‘न+म:+आकार’ हा त्याचा खरा अर्थ आहे. ‘म:’ म्हणजे ‘मी’. ज्यायोगे ‘मी’चा आकार, ‘मी’ची वेगळी सत्ता उरणार नाही आणि केवळ त्याच निराकारात ‘मी’ विलीन होईल, अशी कृती म्हणजे नमस्कार आहे, अशी कृती हीच त्याचा खरा जयजयकार आहे. तेव्हा ‘तोच एक परमात्मा या चराचरात व्याप्त आहे त्याला माझा नमस्कार, त्याचाच जयजयकार’ हाच सर्व जपमंत्रांचा एकमेव अर्थ आहे. श्रीराम (तोच एक परमात्मा) जयराम (प्रत्येक जीवमात्रांत, या चराचराच्या रोमारोमांत व माझ्याही हृदयात व्याप्त आहे) जयजयराम (त्याला माझा नमस्कार, त्याचा जयजयकार). दिगंबरा (तोच निर्गुण निराकार परमात्मा) दिगंबरा (दिक्  म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे अवकाश अर्थात ‘अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचराम्’ असा सर्व दिशा आणि अवकाशाला व्यापून असलेला) श्रीपादवल्लभ (श्री म्हणजे लक्ष्मी अर्थात समस्त भौतिक संपदा जी त्याच्या पायाची दासी आहे, तिचा जो स्वामी आहे, अशा समस्त साकार-निराकार, दृश्य-अदृश्य, स्थूल-सूक्ष्म चराचराचाही तो वल्लभ अर्थात स्वामी आहे) दिगंबरा (त्याचा जयघोष). गण (तोच एक परमात्मा) गण गणांत बोते (या चराचरात व्याप्त आहे, त्याला माझा नमस्कार). जो परमपूर्ण आहे तोच खऱ्या अर्थानं परममंगल, परमसुंदर आहे. परमात्मा तसाच आहे. ॐ (समस्त दृश्य-अदृश्य चराचर, सृष्टीतील रोमन्रोम) शिव (त्या परमपूर्ण मंगल सुंदर परमात्म्यानं व्याप्त आहे, त्याला माझा नमस्कार – नम: शिवाय). तेव्हा कोणताही जप भगवंताच्या कर्तृत्वाचं स्मरण जागवणाराच असतो.