स्वामी स्वरूपानंद यांना एका भक्तानं मोठय़ा प्रेमानं विचारलं, ‘‘स्वामी प्रत्येक संतानं काही ना काही चमत्कार केला आहे. आम्हीही तुम्हाला संतच मानतो. तुम्ही कोणता चमत्कार केला आहे?’’  बघा हं! प्रश्न विचारणारा विशुद्ध मनानं तो करीत होता, म्हणून स्वामींनी उत्तर दिलं. नाही तर ते काही बांधील नव्हते उत्तर द्यायला! स्वामी म्हणाले, ‘‘अरे चाळीस र्वष आजाराच्या निमित्तानं मी एका खोलीत राहिलो, हा चमत्कारच नव्हे का? ’’ खरंच मुंबईत शास्त्री हॉलमध्ये शिक्षणानिमित्त स्वामी राहिले आणि नंतर स्वातंत्र्यलढय़ातील तुरुंगवासानिमित्त पुण्यात राहिले, तो काळ सोडला तर एकदा पावसला परतल्यावर रत्नागिरीला दोनेक दिवसांसाठी फक्त स्वामी एकदाच गेले होते. अखेरची चाळीस वर्षे देसायांच्या घरातील लहानशा खोलीत ते स्थित होते. आपल्याला थोडा आजार येऊ दे, थोडा सक्तीचा एकांतवास भोगावा लागू दे, सोसवेल का हो? ‘भलें देवा मज केलेंसी दुर्बळ। तेणें चि निर्मळ जाहलों मी।।’ असं स्वामींसारखं आपण बोलू शकू का? आम्ही स्वत:ला सबळ मानतो आणि मग अहंकाराच्या ताठय़ानं इतके शेफारतो की, अंत:करण किती मलिन होतं, आपल्याला जाणवतही नाही. स्वामींची शारीरिक दुर्बलता ही आपल्या वस्तुपाठापुरती होती. ‘‘कोण पाहे देह सबळ दुर्बळ। झालों मी केवळ ब्रह्म-रूप।।’’ ही त्यांची खरी स्थिती होती. ही स्थिती फार थोडय़ांना उमगली होती. त्यात हनुमंतवत् भावानं त्यांची अखेपर्यंत सेवा करणारे भाऊराव देसाई अग्रणी होते. तेव्हा परिस्थितीच्या अनुकूलतेवर वा प्रतिकूलतेवर मनाचा आनंद अवलंबून राहिला तर मन कधीच कायमचं सुख भोगूच शकणार नाही, मग परमसुखाची गोष्ट तर दूरच! तेव्हा परिस्थितीच्या प्रभावातून, पगडय़ातून मनाला सोडवायचं असेल तर ज्या मार्गानं स्वामींनी हा परमानंद प्राप्त केला, त्या मार्गानंच गेलं पाहिजे. तो मार्ग स्वामींच्या बोधसाहित्यात जागोजागी दाखवला आहे. त्यासाठी आधी मनातलं प्रपंचासक्तीचं वेड सुटलं पाहिजे ना? ‘‘सांगें प्राण्या कां गा होसी वेडा पिसा।’’ (संजीवनी गाथा, १७७) असं स्वामीही विचारतात. खरा आनंद प्रपंचासक्तीनं वेडापिसा होऊन मिळणार नाही, त्यासाठी देवपिसाच झालं पाहिजे! ‘‘देवपिसा झालों नामीं आनंदलों।’’ (सं. गा. २२१) देवपिसे झालो तरच ‘मी’चं ओझं नसण्यात जो खरा आनंद आहे, तो गवसेल! हा परमानंद हीच ज्याची अखंडस्थिती आहे, अशा सद्गुरूशी एकतानता साधली गेली तरच तो निजानंद सहजप्राप्य होईल. त्यामुळे आपण साधना करीत असू, पारायणं करीत असू, पूजाअर्चा करीत असू तरी जोवर सद्गुरूबोधानुसार जगणं हीच साधना बनत नाही, सद्गुरूबोधपरायणतेचं पारायण होत नाही, सद्गुरूभावात पूज्यवत अर्थात शून्यवत होणं, हीच पूजा होत नाही तोवर जगण्यातला खरा अखंड आनंद अनुभवता येणार नाही. गोंदवलेकर महाराजांच्या एका वचनाचा आशय असा होता की, ‘गोपींनी आपलं सर्वस्व कृष्णाला अर्पण केलं आणि त्यांचं भाग्य असं की तो परमात्माच होता!’ अहो त्याप्रमाणे आपलं भाग्य असं की, स्वरूपस्थ सद्गुरू लाभला आहे! मग कसली चिंता?