25 March 2019

News Flash

२८५. फरक

सत्यमार्गदर्शक, साक्षात्कारी सत्पुरुषात आणि आपल्यात काय फरक आहे, त्याचं उत्तर निसर्गदत्त महाराज सहजपणे देतात. ते म्हणतात, ‘‘माझ्यात आणि तुमच्यात मला काहीच भेद दिसत नाही.

| December 26, 2012 04:14 am

सत्यमार्गदर्शक, साक्षात्कारी सत्पुरुषात आणि आपल्यात काय फरक आहे, त्याचं उत्तर निसर्गदत्त महाराज सहजपणे देतात. ते म्हणतात, ‘‘माझ्यात आणि तुमच्यात मला काहीच भेद दिसत नाही. माझे जीवन तुमच्याप्रमाणेच घटनांची मालिका आहे. मी केवळ अलिप्त असून (लक्षात घ्या अलिप्त राहून नव्हे अलिप्त असून) हा बदलणारा देखावा बदलणारा देखावाच आहे असे पाहातो आणि तुम्ही आसक्त होऊन बदलणाऱ्या गोष्टींबरोबर वहात जाता!’’ मग पुढे महाराज सांगतात, ‘‘तुमच्या लक्षाचे केंद्रस्थान चुकीचे नसेल तर तुम्ही, जे काही मी पाहातो, ते आत्ताच पाहू शकाल. तुम्ही स्वतकडे लक्षच पुरवीत नाही. तुमचे मन निरनिराळ्या वस्तु, व्यक्ति आणि कल्पना यातच गुंतलेले असते. तुम्ही जिवंत प्राणी आहात याचीही तुम्हाला कधीच दखल नसते. तुम्ही स्वतला लक्षाच्या केंद्रस्थानी आणा. तुम्ही कसे वावरता ते नीट पहा. तुमच्या क्रियांमागील हेतु आणि त्यांच्या परिणामांचे निरीक्षण जागरूकपणे करा. तुम्ही अनवधानाने स्वतभोवती तुरुंग कसा बांधला आहे, हे नीट तपासून पहा. जे तुम्ही नाही आणि तुमचे नाही ते जाणल्याने तुम्ही स्वतला जाणता. तुमचा स्वतकडे जाण्याचा मार्ग नकाराच्या आणि नापसंतीच्या द्वारे असतो. तुम्ही स्वतचा शोध घेऊ शकत नाही, कारण तुम्हाला त्याची दिशाच माहीत नाही. एक गोष्ट निश्चित आहे की सत्य काल्पनिक नाही. ते मनाची निर्मिती नाही. ‘मी आहे’ अशी जाणीवही सतत नसते. ती उपयुक्त निर्देशक असली तरी कुठे शोधावे ते ती दाखविते पण काय शोधावे ते दाखवत नाही. ती कायम राहाण्याची गरज नाही. तिच्याकडे नीट निरखून पहा. ‘मी आहे’ याखेरीज आणखी काहीच तुम्ही स्वतविषयी खरेपणाने बोलू शकत नाही, अशी तुमची एकदा खात्री झाली आणि ज्याचा निर्देश करता येतो, ते तुम्ही स्वत: नाहीच नाही, हे पक्के कळले की मग ‘मी आहे’ या स्मृतीची गरज संपते. त्यानंतर तुम्ही काय आहात, याचे शाब्दिक वर्णन करण्याविषयी तुम्ही तत्पर असत नाही. स्वतविषयी काही निश्चित व्याख्या सांगण्यापेक्षा प्रवृत्तीपासून मुक्त होण्याचीच तुम्हाला जरुरी आहे. सर्व व्याख्या केवळ तुमच्या देहाला आणि त्याच्या व्यक्तपणाला लागू पडतात. देहभावाच्या पडद्यातून तुम्ही एकदा मुक्त झालात की तुम्ही सहज उत्स्फूर्तपणे मूळ स्वस्थितीकडे मागे याल. आपणा दोघांत केवळ एवढाच फरक आहे की, मला स्वस्थितीची शुद्ध जाणीव आहे आणि तुम्ही मोहग्रस्त आहात. केवळ मनाच्या समजुतीखेरीज अलंकाररूपी सोन्याला सोन्याच्या चूर्णापेक्षा वस्तुत: अधिक महत्त्व नसते. त्याप्रमाणे आपले अस्तित्व वस्तुत: एकरूपच आहे. फरक फक्त देखाव्यापुरता आहे. तत्त्वत: आपण एकच आहोत. आपले सारतत्त्व आपण कळकळीने, जिज्ञासेने, अविरत शोधाने, आत्मशोधाला जीवनार्पण केल्याने प्राप्त करून घेता येते.’’ श्रीनिसर्गदत्त महाराज यांच्या या उत्तराच्या अनुषंगाने समारोपाकडे वळू.

First Published on December 26, 2012 4:14 am

Web Title: 285 diffrence