26 March 2019

News Flash

२८६. अभ्यासयोग

निसर्गदत्त महाराज यांचा जो संवाद आपण पाहिला त्यामागचा हेतू काय? तर जो सत्यमार्गदर्शक आहे, साक्षात्कारी सत्पुरुष आहे त्याच्यात आणि आपल्यात काय फरक असतो, कोणता भेद

| December 27, 2012 12:17 pm

निसर्गदत्त महाराज यांचा जो संवाद आपण पाहिला त्यामागचा हेतू काय? तर जो सत्यमार्गदर्शक आहे, साक्षात्कारी सत्पुरुष आहे त्याच्यात आणि आपल्यात काय फरक असतो, कोणता भेद असतो, ते स्पष्ट व्हावं. आपलं जीवन हे प्रवाहाप्रमाणे वाहात आहे. लहानपणापासून आतापर्यंत आणि त्यापुढेही अनेक घटनांची मालिका आपल्या जीवनात सुरू आहे. अनेक व्यक्ती आपल्या जगण्याचा भाग असतात आणि प्रत्येकाशी आपलं काही नातं असतं. त्याचबरोबर परिस्थितीचा प्रभावही आपल्या जीवनव्यवहारावर असतो. सत्पुरुषही आपल्याच प्रमाणे परिस्थितीला सामोरे जात जीवन जगताना दिसतात. त्यांच्याही आयुष्यात बऱ्यावाईट व्यक्तींची भूमिका असते. तेव्हा बाह्य़दृष्टय़ा फरक दिसत नसला तरी आंतरिक स्थितीत पूर्ण भेद असतो. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या अंतरंगातील समाधान भंग पावत नाही आणि निर्भयतेनं, धीरानं ते परिस्थितीला सामोरे जात असतात. याचं एकच कारण की ते खऱ्या अर्थानं जीवन्मुक्त असतात. मुक्तपणे जीवन जगत असतात. आपल्याला ती स्थिती प्राप्त व्हावी, हीच त्यांचीही इच्छा असते. पण तशी स्थिती हवी असेल तर त्यांच्या बोधानुरूप चालावंच लागेल. सत्याचा साक्षात्कार व्हावा, असं वाटत असेल तर जगण्यातलं असत्य संपावं लागेल. ते संपणं ही फार पुढची गोष्ट. निदान असत्याबाबत माझी जी आंतरिक ओढ आहे तिची तीव्रता कमी होण्यासाठीचा अभ्यास तरी मला करावाच लागेल. श्रीनिसर्गदत्त महाराज त्याच हेतूनं तर सांगतात की, आपले सारतत्त्व प्राप्त करून घ्यायचे तर आत्मशोध घ्यावा लागेल. त्यासाठी कळकळ, जिज्ञासा आणि अविरत शोध आवश्यक आहे. आत्मशोध हे जीवनध्येय झालं पाहिजे, त्या ध्येयासाठी जीवनार्पण झालं तर तो शोध कठीण नाही. थोडक्यात आपलं ध्येय नेमकं ठरलं पाहिजे आणि ते ठरलं तर त्यासाठीच्या अभ्यासात स्वतला झोकून दिलं पाहिजे. साईबाबा, शंकराचार्य आणि कबीर यांच्या बोधाचा वेध आपण त्याच दृष्टीने घेतला. काही जण म्हणतात, अध्यात्म फार कठीण आहे, अध्यात्माचं काही वाचणं फार किचकट असतं. त्यावर उपाय दोन. पहिली गोष्ट अशी की बँकांचे वगैरे जे अर्ज आपण भरतो ते काय सोपे असतात का? ते किचकटच असतात तरी आपण ते प्रयत्नपूर्वक समजून घेत भरतोच ना? तसं हे ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर दुसरा सोपा उपाय म्हणजे जो त्यातला ज्ञानी आहे त्याच्याकडून तो अर्ज आपण भरून घेतो आणि मग तो सांगतो त्या जागी फक्त सह्य़ा करतो. तसं आध्यात्मिक ज्ञानाच्या फंदात न पडता संत जे साधंसोपं नाम घ्यायला सांगतात तेवढं करावं! त्यांच्या बोधानुरूप जगावं. बोधानुरूप अचूक जगता येणं सोपं नाही कारण आपलं मनच त्याआड येत असतं. तरीही आपण प्रयत्न सुरू ठेवला तर शक्ती तेच पुरवतात आणि मार्गावरून मला चालवतातही. तेव्हा हा अभ्यासयोग आपला आपण साधत राहीलं पाहिजे.

First Published on December 27, 2012 12:17 pm

Web Title: 286 study
टॅग Education,Study