नामाचा सहवास प्रथम हट्टानेच होईल, हेही खरं. एक गृहस्थाश्रमी निवृत्त शिष्य श्रीमहाराजांना भेटले आणि म्हणाले, महाराज नाम घ्यावेसे तर खूप वाटते पण काय करू एका जागी स्वस्थ बसवत नाही. बसलो तर कंटाळा येतो. श्रीमहाराज हसले आणि विषयांतर करीत असल्याच्या बहाण्याने घरची चौकशी करू लागले. श्रीमहाराजांनी विचारलं, तुमचा नातू आता शाळेत जातो का? लगेच ते गृहस्थ म्हणाले, काय सांगू महाराज? उनाड आहे हो तो फार. बळजबरीने अभ्यासाला त्याला एका जागी बसवावंच लागतं तेव्हा कुठे बसतो! महाराज हसून म्हणाले, ‘‘मी तेच तर सांगतो. आपलं मन उनाड आहे. त्याला एके ठिकाणी स्वस्थ राहण्याची सवयच नाही. त्याला थोडी बळजबरी करून नाम घ्यायला लावले पाहिजे. नामामध्ये भगवंताची शक्ती असल्याने नाम घेणाऱ्याची देहबुद्धी क्रमाक्रमाने कमी होते व नाम स्थिरावते.’’ तेव्हा प्रथम थोडी बळजबरी हवी. पू. बाबांनी एका प्रवचनात सांगितलं होतं की, पूर्वी व्हिडीओ नवा होता तेव्हा तो भाडय़ानं आणायचा आणि चित्रपटांच्या कॅसेटही आणायची प्रथाच पडली होती. तेव्हा पूर्ण भाडं वसूल व्हावं म्हणून रात्रभर जागून तीन-तीन चित्रपटही लोक पाहायचे. पण नामाला बसलं की अध्र्या तासात जांभया सुरू! तेव्हा दुनियेच्या ओढीमुळे दुनियेचा सहवास आपल्याला पटकन साधतो पण नामाचा किंवा उपासनेचा साधत नाही. कारण त्याची खरी ओढच नाही. एकदा एकानं श्रीमहाराजांना विचारलं, ‘‘महाराज, नाम घ्यावं अशी खरंच खूप इच्छा आहे पण ते होत नाही तर काय करावं?’’ महाराज म्हणाले, ‘‘इच्छा आहे तरी किंवा नाही तरी, एखादी मुलगी कुमारी आहे तरी किंवा नाही तरी, मधली अवस्थाच नाही. इच्छा जर खरी असेल ना, तर ती काम केल्याशिवाय राहणारच नाही. ज्याला खरी इच्छा असेल, त्याला दुसरं काही सुचणारच नाही. त्याला चैन पडणार नाही. तळमळ लागेल. तुम्हाला तसं होतं का? नाही ना? मग इच्छा आहे असं म्हणू नका. तर इच्छा कशाने होईल, असं विचारा! गाईचं दूध काढण्यापूर्वी त्याला अगदी थोडं दूधच लावतात. तसं नामाची गोडी उत्पन्न व्हायला नामच थोडं थोडं घ्यायला सुरुवात केली पाहिजे.’’ एकानं विचारलं, ‘‘महाराज नाम तर घेतो पण नामात प्रेम का येत नाही?’’ हे प्रश्न आहेत ना ते शतकानुशतकं तसेच राहणार आहेत! तर महाराज म्हणाले, ‘‘मूल न झालेल्या बाईनं मला मुलाचं प्रेम कसं येईल, हे विचारण्यासारखा प्रश्न आहे हा! मूल झालं की त्याचं प्रेम आपोआप येईल. तेव्हा नामात प्रेम कसं येईल, असं न विचारता मुखी नाम कसं येईल, हे विचारा! आम्हाला नामात प्रेम येत नाही, कारण आपलं प्रेम आधीच दुसरीकडे गुंतलेलं आहे. त्यात कमी करायची आपली तयारी नसते. आपलं अर्धेअधिक प्रेम देहावर आहे. उरलेलं अर्धेअधिक बायकामुले, स्नेहीसोबती यांच्यात गुंतलेलं आहे आणि उरलंसुरलं उपजीविका, मानलौकिक, आवडीचे छंद यांना वाहिले असते. यात कुठेतरी कानाकोपऱ्यात आपण नाम ठेवणार. मग त्यात प्रेम कसं वाढणारं?’’