उपासना करू लागल्यावर आपल्यातील अवगुण साधकाला अस्वस्थ करू लागतात पण ते दूरही करता येत नाहीत. ते स्वप्रयत्नांनी दूर करायला जावे तर ते अधिकच उग्र रूप धारण करतात. एकदा श्रीसद्गुरू म्हणाले, ‘‘विकार-वासना नष्ट करण्याच्या मागे लागू नकोस. त्याच प्रयत्नांत राहशील तर आयुष्य संपेल पण विकार संपणार नाहीत! त्यामुळे त्यांच्या नादी लागण्यापेक्षा नामाच्या नादी लाग. मग त्या विकार वासनांचं काय करायचं ते मी पाहून घेईन!’’ समर्थाच्या ‘मनाच्या श्लोका’त आहे ना? पदीं राघवाचें सदा ब्रीद गाजे। बळें भक्तरीपूशिरीं कांबि वाजे। अर्थात ज्याच्या मुखी प्रभूचे नाम गर्जत आहे त्या भक्ताच्या शत्रूंच्या डोक्यावर प्रभूच बाण सोडतात. भक्ताला शत्रू कोण असणार? अर्थात विकारच. थोडं नाम घेऊ लागलो, सद्ग्रंथ वाचू लागलो, थोडा सत्संग करू लागलो की आपल्याला वाटतं आपण ‘चांगले’ झालो. आता काम, क्रोध, लोभ काही आपल्याला शिवत नाहीत. त्यात प्रत्यक्ष सद्गुरूंच्या सहवासात असल्यावर प्रसन्नतेचा व निर्भयतेचा जो अनुभव असतो त्यानं तर आपल्याबद्दलची ही भ्रामक समजूत अधिकच पक्की होते. प्रत्यक्षात विकार जिंकणं सोपं कसं नाहीच, तेच उघडं पडतं. श्रीमहाराजांच्या चरित्रात एक प्रसंग आहे. गोंदवल्यास श्रीमहाराजांजवळ भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणून एक सात्त्विक व एकमार्गी वृत्तीचे वृद्ध गृहस्थ राहात होते. सद्गुरू हा प्रेमानं पूर्ण भरला असतो. त्याचं प्रत्येकाशीच वागणं हे अत्यंत आत्मीय आणि कळकळीचं असतं. त्यामुळे ज्याला त्याला असं वाटतं की महाराजांचं आपल्यावर विशेष प्रेम आहे. त्यातून शिष्य मग सलगीनं सद्गुरूबरोबर वागू-वावरू लागतात आणि कधीकधी अजाणता मर्यादेचं उल्लंघनही होतं. मग शिष्याला त्याच्या स्वभावगत मर्यादांचं भान पुन्हा आणावं लागतं. त्याचाच प्रत्यय या प्रसंगात येतो. तर भाऊसाहेब फॉरेस्ट एकदा वाण्याकडून रवा-साखर घेऊन खोलीकडे जात होते तर वाटेत महाराजांचा काहीजणांशी संवाद सुरू होता. श्रीमहाराज सांगत होते, ‘परमार्थ साधायचा तर मन विशाल व्हावं लागतं आणि विकारांवर ताबा ठेवावा लागतो.’ महाराजांजवळ उभे असलेले भाऊसाहेब फॉरेस्ट पटकन म्हणाले, ‘‘महाराज आपण म्हणता तसं माझं मन विशाल झालं आहे. ही रवा-साखर मी कुणालाही देऊन टाकीन आणि मला त्याचं काही वाटणार नाही. रागाचं म्हणाल तर अलीकडे राग तर मी सर्वस्वी सोडला आहे.’’ श्रीमहाराज हसले आणि मोठय़ा कौतुकानं म्हणाले, ‘असं असेल तर उत्तमच आहे!’ भाऊसाहेब फॉरेस्टांना मोठा हुरूप आला आणि त्याच ऐटीत ते खोलीकडे गेले. अवगुणांपेक्षा मी अवगुणी असताना अवगुणांपासून मुक्त झालो, हा भ्रम अधिक वाईट आहे. तो महाराज कसा राहू देतील? महाराजांनी रूपलख नावाच्या एका उमद्या तरुणास लगेच बोलावले. महाराज जे सांगतील ते तात्काळ आणि विकल्प न आणता करायचे, अशी त्याची वृत्ती. तो येताच महाराज त्याला म्हणाले, ‘‘अरे रूपलख त्या भाऊसाहेब फॉरेस्टांचा राग हरवला आहे. काहीही कर आणि त्यांना त्यांचा राग मिळवून दे!’’