रशियाची अर्थव्यवस्था खंक होऊन रसातळाला जात असतानाही अध्यक्ष पुतिन बेफिकीर राहू पाहत आहेत. या परिस्थितीत त्यांचे ‘अच्छे दिन’च्या काळातील पाठीराखे आता त्यांना साथ देणार नाहीत, अशी लक्षणे दिसू लागली आहेत. रशियातील हे स्थित्यंतर बरेच काही शिकवून जाते.

तुमच्या विरोधात बंड होण्याची शक्यता किती हा प्रश्न रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दोनच दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हसण्यावारी नेला. उलट, तो विचारणाऱ्या रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या पत्रकारासच पुतिन यांनी संभाव्य बंडखोरांची नावे तुमच्याकडे असल्यास मला द्या, असे सुनावले. या उत्तरातून त्यांचे कथित शौर्य दिसून येत असले तरी त्यामुळे वास्तव दुर्लक्षून चालणार नाही. हे वास्तव आहे रशियाच्या गंभीर आर्थिक परिस्थितीचे आणि त्यामुळे निर्माण होऊ लागलेल्या तितक्याच गंभीर समस्येचे. पाश्चात्त्य देशांनी घातलेले आर्थिक र्निबध, त्याचवेळी होत असलेली खनिज तेलाच्या किमतीतील घसरण आणि या सगळ्यामुळे प्रचंड प्रमाणावर घसरलेले रुबल हे चलन यामुळे रशिया आर्थिक मंदीच्या गत्रेत सापडला असून तीमधून तो इतक्यात बाहेर येण्याची शक्यता नाही. परिणामी आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात गंभीर आव्हानास सामोरे जाण्याचा पुतिन यांच्यावर आलेला प्रसंग आपणास बरेच काही शिकवून जाईल असा आहे. त्यामुळेच त्या परिस्थितीचा सम्यक आढावा घेणे गरजेचे ठरते.

रशियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खनिज तेलाधारित असून या तेलाचे भाव जेव्हा चढे होते तेव्हा त्या देशाची तिजोरी ओसंडून वाहत होती. हा तेलसंपत्ती योग तसाच राहावा यासाठी तेलाचे भाव किमान ११४ डॉलर्स प्रतिबॅरल वा अधिक असणे आवश्यक आहे. सध्या ते ६० डॉलर्स प्रतिबॅरलच्या आसपास आहेत. रशियाची तिजोरी वाहती नाही तरी किमान भरलेली राहण्यासाठी हे तेलाचे दर ९० डॉलर्स राहणे गरजेचे असते. तसे ते नसल्याने रशियावर सध्या श्रीशिल्लक वापरण्याची वेळ आली असून तशी ती यावी यासाठी अमेरिकादी पाश्चात्त्य देशांकडून सुनियोजित प्रयत्न सुरू आहेत. यास कारण आहे ते पुतिन यांच्या अरेरावी वर्तनाचे. युक्रेनमध्ये रशियाने केलेली बळजबरी असो वा क्रीमिआ प्रांत गिळंकृत करण्याची कृती असो. पुतिन हे एखाद्या बेधुंद हुकूमशहासारखे वागत असून कोणालाच आवरेनासे झाले आहेत. जागतिकीकरणाच्या काळात अशा प्रकारच्या सक्षम नेत्यास आवरण्यासाठी लष्करी उपाय योजणे अधिक विनाशाकडे नेणारे असेल याची जाण असल्यामुळे पाश्चात्त्यांनी रशियाविरोधात केलेली उपाययोजना आर्थिक आहे. परिणामी रशिया संकटात आला असून त्यातील रुबल घसरणीचे आव्हान अधिक गंभीर ठरेल. याचे कारण पुतिन आणि त्यांचा धनदांडगा गोतावळा. तेलाचे भाव चढे असताना या उद्योगपतींनी खच्चून कमाई केली आणि पाश्चात्त्य देशांत प्रचंड प्रमाणावर जमीनजुमला, संपत्ती आदी खरेदी केली. आजमितीला न्यूयॉर्कसकट सर्व जागतिक शहरांत आलिशान घरे खरेदी करणारे सर्व एकजात रशियन उद्योगपती आहेत. या मंडळींच्या संपत्तीतून देशात उपयुक्त अशी गुंतवणूक झाली नाही. त्याचवेळी रशियन कारखानदार आणि उद्योगपती आपल्या विस्तारासाठी डॉलर आणि युरो या चलनात, म्हणजे पाश्चात्त्य देशांतून, कर्जे घेत गेले. तेलाची सद्दी होती त्या काळात हे सर्व उद्योग खपून गेले. परंतु रुबलच्या घसरणीमुळे ते अंगाशी आले आहेत. रशियाच्या चलनाची किंमत घसरल्यामुळे पूर्वी घेतलेल्या कर्जाचे मूल्य कित्येक पटींनी वाढले असून ही जुनी कर्जे आता डोईजड होऊ लागली आहेत. परिणामी जे पुतिन हे या उद्योगपतींच्या गळ्यातील ताईत होते तेच पुतिन या उद्योगपतींना गळ्यातील धोंड वाटू लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रश्न आहे तो पुतिन यांच्या लोकप्रियतेचा लंबक दुसऱ्या दिशेस जाण्यासाठी किती काळ लागणार, इतकाच. अशा संकटास ज्या ज्या देशांना सामोरे जावे लागले त्यांच्यापुढे एकच पर्याय होता. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वा जागतिक बँकेकडे हात बांधून जाणे आणि आर्थिक शिस्त आम्ही पाळू या कबुलीच्या बदल्यात आंतरराष्ट्रीय कर्जाची पुनर्रचना करून घेणे. तसे होताना अधिक र्निबधांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. खरी मेख आहे ती येथेच. कमीपणा सहन करून हे असले जाच सहन करण्याचा पुतिन यांचा स्वभाव नाही आणि आपल्या देशाने हे असे बचावात्मक वागणे त्यांच्या प्रतिमेच्या विरोधात असल्याने तसे होण्याची शक्यता नाही.
या पाश्र्वभूमीवर शक्यता व्यक्त होते ती पुतिन यांच्या विरोधात बंड होऊन सत्तांतर होईल किंवा काय, ही. सर्व काही सुरळीत सुरू राहिल्यास पुतिन यांच्याकडे २०१४ पर्यंत रशियाची सूत्रे राहतील. आपण तहहयात अध्यक्ष वा सूत्रधार राहू शकतो अशी घटनादुरुस्ती पुतिन यांनी करून घेतलेली असल्यामुळे राजकीय व्यवस्थेत त्यांना आव्हान मिळण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत ही शक्यता दिसते ती उद्योग जगतातून. या संदर्भात नाव चर्चिले जात आहे ते अतिधनाढय़ परंतु देशत्याग करावा लागलेला उद्योगपती मिखाईल खोदोर्कोव्हस्की यांचे. युकोस या रशियातील महाप्रचंड तेल कंपनीचा हा प्रमुख एकेकाळी त्या देशातील सर्वात धनाढय़ व्यक्ती म्हणून ओळखला जात असे. पुतिन यांच्याशी असलेले त्यांचे सौहार्दाचे संबंध पुढे बिघडले आणि रशियाच्या अध्यक्षांनी त्यास दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. मरणासन्न आईच्या सेवेसाठी त्यांची अलीकडे सुटका झाली. त्यामागील अट एकच होती. ती म्हणजे आपण राजकारणात पडणार नाही, ही खोदोर्कोव्हस्की यांनी दिलेली कबुली. पुढे त्यांनी देशत्याग केला आणि स्वित्र्झलड देशात आसरा घेतला. परंतु तेथे राहून खोदोर्कोव्हस्की अलीकडे अप्रत्यक्षपणे राजकारणात लक्ष घालू लागले असून पुतिनोत्तर रशियाचे नेतृत्व करावयास आपल्याला आवडेल, अशा प्रकारच्या त्यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरून खोदोर्कोव्हस्की यांच्याभोवती पुतिनविरोधकांचे कोंडाळे जमेल अशी अटकळ बांधली जात असून जे उद्योगपती इतके दिवस पुतिन यांची तळी उचलण्यात धन्यता मानत होते, ते अर्थव्यवस्था रसातळाला जात असताना पुतिन यांना साथ देणार नाहीत, अशी लक्षणे दिसू लागली आहेत. ही परिस्थिती ओढवण्यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अर्थव्यवस्था तेजीत असताना पुतिन यांनी तेलवगळता अन्य क्षेत्रांत भरीव संपत्ती निर्मिती होत राहील यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. परिणामी रशियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेलकेंद्रितच राहिली.
यातून आपण शिकावा असा धडा हाच की अर्थव्यवस्थेस जेव्हा भरभराट असते तेव्हा चिरस्थायी राहील अशा स्वरूपाच्या योजना आणि कामे हाती घ्यायची असतात. याचे कारण अर्थचक्राचा फेरा जेव्हा उलटतो तेव्हा होत्याचे नव्हते होऊन जाते आणि घराबरोबर घराचे वासेही फिरू लागतात. शेवटी महत्त्व असते ते अर्थव्यवस्थेलाच. ती जर खंक असेल तर राष्ट्रवादाचे आवाहनदेखील निरुपयोगी ठरते. पुतिन यांना सध्या अनुभव येत आहे तो याचाच. युक्रेन या देशात त्यांनी केलेल्या हडेलहप्पीस इतके दिवस सामान्य रशियन नागरिकांचा पाठिंबाच होता. हा सामान्य रशियाई अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांच्या रशियाबाबतच्या दृष्टिकोनास विरोध करण्यासाठी आणि पुतिन यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर येत असे. तोच रशियन नागरिक आता पुतिन यांच्या विरोधात एकवटू लागला असून इतके दिवस पुतिन यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करणारे आता त्याबाबत जाहीर मतप्रदर्शन करू लागले आहेत. पुतिन यांच्या पौरुषीय, मर्दानी वागण्याचा रशियनांनाच नव्हे, तर जगात इतर अनेकांना अभिमान होता. न्यूयॉर्कचे माजी महापौर रूडी ज्युलियानी हे तर पुतिन यांच्या दंडबेटकुळ्यांना आणि वागण्यास उद्देशून, नेता असावा तर असा असे म्हणाले होते.
परंतु खजिना खंक असेल तर दंडातील बेटकुळ्या आणि राष्ट्रप्रेमाची भाषा निरुपयोगी ठरते. हे भान असणे गरजेचे. नपेक्षा ५६ इंची छातीचा बुडबुडादेखील बघता बघता फुटून जातो.