या घडीला दुखरूप असलेला प्रपंच सुखरूप होईल तो केवळ अभ्यासाने. हा अभ्यास काय आहे? श्रीगोंदवलेकर महाराज हा अभ्यास सूचित करतात. ते म्हणतात, ‘‘ज्याने प्रपंच जिंकला त्याने जग जिंकले. ज्याने आपल्याला जिंकले त्याने प्रपंच जिंकला’’ (बोधवचने, क्र. ८६२). तेव्हा हा अभ्यास आहे प्रपंच जिंकण्याचा. तो साधण्यासाठी आधी स्वतला जिंकायला हवे! हा अभ्यास घरदार सोडून शक्य नाही. महाराजही सांगतात, ‘‘माणूस प्रपंचात जसा तयार होईल तसा जंगलात जाऊन तयार होणार नाही. प्रपंच शिक्षणाकरिता आहे’’ (बोधवचने, क्र. ८६४). घरातच माणसाला आपल्या आंतरिक स्थितीचा, आपल्यातील उणिवांचा शोध घेता येतो. तसा शोध जंगलात कुठून लागणार? आता या अभ्यासासाठी सुरुवात स्वत:पासूनच करायला हवी. आपल्या क्षमता आणि त्या मला मिळण्यामागचा मूळ हेतू, याचाही शोध घ्यायला हवा. आज ‘ज्ञाना’मुळे मी प्रपंचाचा दृश्य विकास कितीतरी साधला आहे. त्या पसाऱ्याने मी स्वतंत्र न होता तो पसारा टिकविण्याच्या बंधनात मी अडकून आहे. मग जे बंधनाला कारण होतं ते ज्ञान म्हणावं की अज्ञान? मला बुद्धीची देणगी आहे, मनाची देणगी आहे. त्यामुळे मी विचार करतो, कल्पना करतो, भावना करतो. पण या सर्व गोष्टी मला व्यापक न करता उलट संकुचित करीत आहेत. मी विचार जसा करतो तसाच अविचार आणि कुविचारही करतो. चांगल्या कल्पनांप्रमाणेच वाईट कल्पनाही करतो. चांगल्या भावनेला मागे टाकेल इतक्या कुभावनांनीही माझं मन आंदोलित होतं. मग विचार, भावना, कल्पना या गोष्टी क्षमता असतानाही त्यांच्याच योगे मी चुकीच्या, भ्रामक कल्पना, अविचार, दुराशा यात जखडत असेन आणि अधिकच अस्वस्थ, अस्थिर होत असेन तर त्या क्षमता म्हणाव्यात की उणिवा? तेव्हा ज्या गोष्टी प्रत्यक्षात मला उच्च ध्येयाकडे नेण्याकरिता बहुमोल क्षमता आहेत त्या आज सापळ्यासारख्या मला स्वार्थकेंद्रित प्रपंचात अडकवत आहेत. तेव्हा स्वत:ला जिंकण्याआधी मी कसा, कुठे आणि कुणाकडून पराभूत आहे, त्याचाही शोध घेतला पाहिजे. आपल्या स्वार्थामुळे आपण कुठेकुठे भावनिकदृष्टय़ा, मानसिकदृष्टय़ा, शारीरिकदृष्टय़ा अवलंबून आहोत आणि त्यामुळे मानसिकदृष्टय़ा पंगू आहोत, हे तपासले पाहिजे. आज आपण या अवलंबण्याच्या गरजेतून आधार मिळविण्याची आणि टिकविण्याची अव्याहत धडपड करीत आहोत. एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग झाला की लगेच आपण दुसऱ्या व्यक्तीच्या आधारासाठी धावतो. वारंवार अशा गोष्टी घडूनही जगाचं, दुनियेचं, माणसांचं खरं रूप आपण जाणत नाही. मायेनं त्याच चक्रात गुंतून राहातो. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘‘अनुभव दु:खाचा असला तरी सुटत नाही हीच माया!’’(बोधवचने, क्र. ३८०) प्रपंचात वारंवार दु:ख भोगूनही आपण आशा सोडत नाही. प्रत्यक्षात दुनिया, प्रपंच मला अखंड सुख देऊ शकत नाही. श्रीमहाराज सांगतात, ‘‘इतर गोष्टी तात्पुरतं सुख देतात पण समाधान देत नाहीत’’ (बोधवचने, क्र. ९५).