X

परीक्षेचा काळ!

१५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले ते केवळ इंग्रजांपासून नाही. ते आचार, विचार आणि उच्चाराचेही स्वातंत्र्य होते. ते नसेल तर मग राज्य करणारे कोण आहेत याने फरक पडतो नसतो.

१५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले ते केवळ इंग्रजांपासून नाही. ते आचार, विचार आणि उच्चाराचेही स्वातंत्र्य होते. ते नसेल तर मग राज्य करणारे कोण आहेत याने फरक पडतो नसतो. कारण बोळा आपल्या माणसांनी कोंबला म्हणून गोड लागतो अशातला भाग नसतो. अशा कोंबलेल्या बोळ्यांमुळे न्याय, समता, बंधुता या मूल्यांना काही अर्थच राहात नाही.

१५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०१५. तब्बल ६८ वष्रे. या काळात एक शतक बदलले. समाज बदलले. संस्कृती बदलली. राजकीय-सामाजिक व्यवहारांत फरक पडला. अर्थकारणाला तर पंख फुटले. मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरणातून आलेली नवभांडवलशाही असा हा प्रवास आहे आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या मार्गाने तो कोठे जाणार आहे याचे भाकीत करणेही कठीण आहे. एका विचित्र टप्प्यावर आपण सारे उभे आहोत. स्वातंत्र्यलढय़ाशी केवळ इतिहासाच्या पाठय़पुस्तकांतूनच संबंध आलेली आपली ही पिढी. देशाचे पंतप्रधान हेही याच, स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. अशा काळात १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री हिंदुस्थान नावाच्या या हजारो वर्षांच्या घटिताने नियतीशी केलेल्या कराराचा अर्थ पुसट होणे साहजिकच म्हणावयास हवे. अशा काळात १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपण स्वतंत्र झालो म्हणजे नेमके काय झाले हे विसरले जाणे स्वाभाविकच म्हणावयास हवे. ज्यांचा जन्मच मोकळ्या हवेत गेला त्यांना गुदमरणे म्हणजे नेमके काय याचा स्वानुभव असण्याचे कारणच नसते. परंतु अशा प्रकारे भूतकाळाचे भान सुटले की  वर्तमानावरची मांडही सुटते. म्हणूनच इतिहास समजून घेणे गरजेचे असते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपण स्वतंत्र झालो याचा अर्थ आपण केवळ परदास्याच्या शृंखला तोडल्या इतपतच मर्यादित आहे का हा खरा प्रश्न आहे. सत्तेचाळीसच्या या प्रश्नाचे उत्तर आपणच पन्नासमध्ये दिले होते. राज्यघटनेमधून. तिच्या प्रस्तावनेतून आपणच आपल्याला एक दृढवचन दिले होते. सामाजिक, आíथक आणि राजकीय न्यायाचे, विचार, उच्चार, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याचे आणि दर्जा आणि संधीच्या समानतेचे. या वचनाचे आज काय झाले? ते स्वातंत्र्य कुठे गेले? ते शाबूत आहे म्हणावे तर आज वारंवार दुसऱ्या आणि तिसऱ्या स्वातंत्र्याच्या हाका का दिल्या जात आहेत? सत्तेच्या शिलेदारांनाच  सातत्याने आणीबाणीची आठवण का येत आहे? या देशात बोलणेही आताशा धाडसाचे का वाटू लागले आहे? काही तरी नक्कीच बिनसले आहे.

या देशास विचारांचे, त्यातून होणाऱ्या वादचर्चाचे वावडे कधीही नव्हते. ‘वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवाद: वादे वादे जायते तत्त्वबोध:’ – शहाण्या जाणत्यांच्या एकत्र चच्रेने तत्त्वांचा अर्थ स्पष्ट होतो. चच्रेतून तत्त्वांचा बोध होतो – ही येथील परंपरा. पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, खंडन-मंडन ही येथील चर्चा पद्धत. त्यातून जो मिळतो तो न्याय असे भारतीय परंपरा मानते. त्या न्यायासाठी आधुनिक भारताच्या सार्वभौम जनतेने एक सार्वभौम व्यासपीठ निर्माण केले. त्याचे नाव संसद. तेथे वादचर्चा व्हावी, त्यातून तत्त्वबोध व्हावा, न्याय मिळावा ही साधी अपेक्षा होती. गेल्या २४ दिवसांत संसदेत जे झाले ते या अपेक्षेच्या जवळपासही येणारे नव्हते. संसद हा फुफ्फुसबळ आजमावण्याचा आखाडा नव्हे. पण याचे भान ना विरोधकांना होते, ना सत्ताधाऱ्यांना. गोंधळाने मुद्दे खोडता येतात, समोरच्यास नामोहरम करता येते असे एक नवेच वादशास्त्र जणू आपल्या या सन्माननीय संसद सदस्यांनी संशोधित केले आहे. संसदेच्या पायऱ्यांवर मस्तक टेकवून ज्यांनी त्या पवित्र भवनात प्रवेश केला त्या आपल्या प्रधानसेवकांनी तर या सगळ्या गोंधळात संसदेच्या सभागृहाकडे ढुंकूनही पाहिले नाही. चच्रेने प्रश्न सोडविण्याप्रति त्यांची ही जी आस्था आहे ती वर्णनातीत आहे. वस्तुत: नरेंद्र मोदी हे एक उत्कृष्ट वक्ते आहेत. उपरोध, उपहासादी अस्त्रांनी समोरच्यास घायाळ करण्यात तर त्यांचा हातखंडा. असे असताना त्यांनी सभागृहात फिरकूही नये हे काही त्यांच्यातील लोकशाहीप्रेमाचे लक्षण मानता येणार नाही. विरोधकांच्या बाजूने तर याबाबतीतही अवघी बोंब. संख्याबळ कमी म्हणून आवाज उंचावण्यासाठी ओरडावे लागते असे म्हणावे तर अशाच परिस्थितीत आणि तेही समोर पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासारखा उत्तुंग राष्ट्रनेता उभा असताना डॉ. राममनोहर लोहिया, मिनू मसानी यांच्यासारख्या नेत्यांनी केवळ आपल्या कुशल वादपटुत्वाने संसद गाजवून सोडली होती. मधु लिमये, अटलबिहारी वाजपेयी, बॅ. नाथ प असे सत्त्वधीरही त्याच फळीतील. आज त्यांची वानवा आहे आणि गोंधळ, गदारोळ हेच संसदेचे, विधिमंडळांचे भागधेय बनले आहे. याचे कारण केवळ संसद सदस्यांतील अभ्यासाचा अभाव वा बेशिस्त असे म्हणून चालणार नाही. त्याची कारणे आणखी खोल आहेत आणि ती गेल्या काही वर्षांत येथे फोफावलेल्या सामाजिक विकृतीत आहेत.

ही विकृती आहे वैचारिक झुंडशाहीची. झुंड ही नेहमीच असहिष्णू असते. तिला वेगळे मत मानवत नसते. विरोधी विचार खपत नसतो. उदारमतवाद हा तिच्या दृष्टीने दुबळेपणा असतो आणि दहशत हा तिचा आक्रमक सत्तास्रोत. तसे झुंडशाही हे काही आजचेच वास्तव नाही. हिटलरी राष्ट्रवादाच्या वेशात जगाने ती यापूर्वीही पाहिली आहे. अलीकडच्या काळात तिचा हिंस्र चेहरा दिसला तो अमेरिकेतील ९/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर. त्या हल्ल्याचा धक्का एवढा मोठा होता की त्याने जणू जगाचा वैचारिक तोलच ढळला. जे आमच्याबरोबर नाहीत ते आमचे शत्रू ही केवळ जॉर्ज डब्ल्यू बुश यांची घोषणा राहिली नाही. ती येथील संस्कृती बनली. अशा काळात समाजप्रिय मतांहून वेगळे काही बोलणे ही देहान्त प्रायश्चित्तायोग्य शिक्षा बनली नसती तर नवलच. या आक्रमकपणामागे एक वैचारिक भित्रेपणा दडलेला असतो. झुंडीच्या आडोशाने त्याची जाणीव राहात नाही, हे खरे. पण तो असतो. तो झाकण्यासाठीच माणसे अधिकाधिक हिंस्र अभिनिवेशी बनतात हे आता रोजच या ना त्या निमित्ताने दिसत आहे. एखाद्या मतावर, विचारावर गिधाडाप्रमाणे तुटून पडणारे समाजमाध्यमांतील जल्पकांचे – ट्रोलचे थवे हे याचे एक किळसवाणे उदाहरण. न पटणाऱ्या मताचा प्रतिवाद करणे हा गुन्हा नाही. गुन्हा मुस्कटदाबी करणे हा आहे. गुन्हा भिन्नविचारी व्यक्तीला तडीपार करा असे सांगण्यात आहे. गुन्हा भारतीय वादपरंपरेचे असे धिंडवडे काढणे हा आहे. कारण त्यातून मतविभिन्नता, बहुसांस्कृतिकता यांच्या नरडीलाच नख लागत नसते, तर स्वातंत्र्याचाही गळा घोटला जात असतो. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले ते केवळ इंग्रजांपासून नाही. ते आचार, विचार आणि उच्चाराचेही स्वातंत्र्य होते. ते नसेल तर मग राज्य करणारे कोण आहेत याने फरक पडतो नसतो. कारण बोळा आपल्या माणसांनी कोंबला म्हणून गोड लागतो अशातला भाग नसतो. अशा कोंबलेल्या बोळ्यांमुळे न्याय, समता, बंधुता

या मूल्यांना काही अर्थच राहात नाही. कारण शेवटी शेवटी ते मागण्याचेही स्वातंत्र्य कोणाजवळ उरलेले नसते. आज स्वातंत्र्य दिन साजरा करताना विचार करायचा आहे तो या धोक्यात आलेल्या स्वातंत्र्याचा.

मुळात आजच्या माहितीयुगात माहितीचा  भरमसाट कचरा आपल्या डोक्यावर मारला जात आहे. ज्ञान आणि माहिती यातील फरकच काढून घेतला जात आहे. प्रचार -प्रपोगंडा, जाहिराती यातून दाखविले जाते तेच सत्य असे सांगितले जात आहे आणि अशा सत्याचे सौदागर हे मसीहा बनून फिरत आहेत. अशा वेळी स्वतंत्र विचार करणे ही कष्टप्रदच गोष्ट असणार. तो विचार चुकीचा की बरोबर हा नंतरचा प्रश्न. चुकीचा असेल तर त्याचा प्रतिवादही करता येईल. परंतु आधी तो करण्यासाठीचे स्वातंत्र्य तरी असले पाहिजे. आपण ते देणार आणि घेणार का   की प्रत्येक वेगळ्या मतांवर दगड भिरकावणार हा आजच्या आणि यापुढील प्रत्येक स्वातंत्र्य दिनाचा प्रश्न असणार आहे. कारण काळच तसा परीक्षेचा आहे.

  • Tags: independence-day, independence-day-celebrations,