प्रारब्धानुरूप जन्मजात आर्थिक सुबत्ता असेल किंवा प्रयत्नपूर्वक आर्थिक सुस्थिती वाटय़ाला आली असेल तर अशा धनवंत साधकानं कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे? साधना जसजशी वाढत जाते तसतसा सत्त्वगुण वाढू लागतो. हा सत्त्वगुणसुद्धा तितकाच बाधक आणि घातक ठरू शकतो! ‘तुम्ही साधू मग तुम्हाला इतकी जमीन कशाला हवी,’ असा प्रश्न करत साक्षात श्रीमहाराजांचे नातेवाईकही ती जमीन मिळवायची धडपड करायचे तिथे आपल्यासारख्या साधकांचा काय पाड? तेव्हा तुमच्या सत्त्वगुणाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करून आपला स्वार्थ साधायचा प्रयत्न दुनिया हमखास करू शकते. श्रीमहाराजांना एकानं विचारलं, महाराज व्यवहारात लबाडी करावी लागते. ती करावी की करू नये? श्रीमहाराजांनी सांगितलं, दुसऱ्याची लबाडी ओळखण्याइतकी लबाडी आपल्यात असावी! तेव्हा आपल्या सत्त्वगुणाचा गैरफायदा कुणी घेत असेल तर आपल्यालाही ती लबाडी ओळखण्याइतपत व्यवहारी राहावं लागेल. हा कंजूष किंवा कद्रू होण्याचा सल्ला नाही. पैशाचा ओघ मग तो क्षीण असो की मोठा, तो सुरू असेल तर तो पैसा त्यात न गुंतता आणि अनाठायी खर्च न करता वाचवला पाहिजे. त्या पैशावर डोळा ठेवून कुणी जर तुमच्या सात्त्विकतेचा फायदा उचलू पाहात असेल तर असा गैरफायदाही कुणाला घेऊ देता कामा नये. अर्थात या गोष्टी वाचून कमी कळतात अनुभवानंतर अधिक कळतात. पण अनुभवानेही आपल्याला समज न येण्याचा धोका उरतोच! या बाबतीतही श्रीमहाराजांनी अत्यंत व्यावहारिक बोध केला आहे. श्रीमहाराज सांगतात, ‘‘आपल्याला कोणी पैसे मागितले तर लगेच देऊ नयेत आणि तो मागेल इतके देऊ नयेत.’’(चरित्रातील पैसाविषयक बोधवचने, क्र. २६). कोणी पैसे मागितले आणि भारावून आपण लगेच दिले तर काय होतं? कधीही मागा हा पैसा देतोच, असा समजही निर्माण होतो. दुसरी गोष्ट, मागितल्याइतके पैसे देऊ नयेत. याचंही कारण तेच. मागू तेवढे पैसे मिळतात, असाही भ्रम होतो. त्यातही एक गोष्ट अशी की दिलेले पैसे बुडाले तर, बरं झालं मागितले तेवढे तरी दिले नाहीत, हे त्यातल्या त्यात एक समाधान मिळतं! दुसरी गोष्ट म्हणजे या निर्णयाची वाच्यता किंवा जाहिरात करू नये. कारण मग मागणारा हवे होते त्यापेक्षा जास्तच पैसे मागेल मग आपल्यालाही कमी दिल्याचं आणि त्यालाही जेवढे हवे होते तेवढे मिळाल्याचे समाधान मिळेल! गमतीचा भाग सोडा. असं आहे, जगातले सर्व व्यवहार पैशाच्याच आधारे चालतात आणि व्यवहारात राहूनच परमार्थ साधायचा असेल तर व्यावहारिक गरजा पूर्ण व्हाव्यात इतपत पैसा गाठीला बांधला पाहिजे. कारण ही दुनिया अडचणीत धावून येईलच, याची काही शाश्वती नाही. जोवर परमात्म्याचा आधार मनानं पूर्ण पकडलेला नाही तोवर पैशाचा आधार तोडता येत नाही. पण खरा शाश्वत आधार कोणता, याबाबत गफलत मात्र असता कामा नये. आता एवढं वाचूनही काहीजणांच्या मनात एक प्रश्न येईलच. कुणाला मदत करण्यात काही गैर आहे काय?