06 July 2020

News Flash

अंधार.. आतला, बाहेरचा

दिवाळीला उजेड हमखास असतो आणि प्रकाशाचीच पूजा केली जाते. सगळीकडे पेटलेले दिवे. अशा वेळी अंधारात चाचपडणाऱ्या आणि उजेडासाठी आसुसलेल्या अभागी जीवांचे अस्तित्व जवळपास बेदखलच असते.

| October 27, 2014 12:47 pm

दिवाळीला उजेड हमखास असतो आणि प्रकाशाचीच पूजा केली जाते. सगळीकडे पेटलेले दिवे. अशा वेळी अंधारात चाचपडणाऱ्या आणि उजेडासाठी आसुसलेल्या अभागी जीवांचे अस्तित्व जवळपास बेदखलच असते. कोणतीही किंमत चुकवून जिथे कवडसाही पडत नाही असे एक जग आणि वाट्टेल ती किंमत मोजून उजेडांचे लोळ खरेदी करणारे एक जग, अशी ही विभागणी करता येते..
दिवाळीच्या दिवशी दिवटी करून गाई-गोऱ्ह्य़ांना ओवाळले जायचे. नदीकाठी वाढलेले लव्हाळे असायचे ते कापून त्याची दिवटी केली जायची. (महापुरे झाडे जाती, तिथे लव्हाळे वाचती, ती लव्हाळी) या लव्हाळीची केलेली दिवटी आणि त्या दिवटीत शेणाचा खड्डा केला जायचा. त्यात तेल टाकायचे आणि दिवटीच्या उजेडात गाई-गोऱ्ह्य़ांना ओवाळले जायचे. दररोज त्या दिवटीचे थर वाढत असत. म्हणजे पहिल्या दिवशी ती फक्त एकाच थराची, नंतर दररोज तीन-चार दिवसांत चढय़ा क्रमाने ती दिवटी वाढत जायची. शेवटच्या दिवशी ही दिवटी चार थरांची. ‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी’ असे म्हणत गोठय़ातल्या जनावरांना ओवाळले जायचे. भाऊबिजेला शेतकरी भावांना ओवाळताना खेडय़ापाडय़ांतील बायका ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ असे आवर्जून बोलले जायचे. एका अर्थाने हे मातीत राबणाऱ्यांचे पसायदान. सर्वाचे भले होवो, संकटे जावोत, आपत्ती नष्ट होवो, अशा प्रकारची भावना भाऊबिजेला ओवाळताना व्यक्त केली जायची. अजूनही बाया-बापडय़ा प्रार्थना करीत राहतात. ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ ही भावना कायम असते. प्रत्यक्षात बळीच्या वारसांचे राज्य आले तरीही बळी पाताळातच अशी परिस्थिती. म्हणजे बळीच्या लेकरांचे राज्य आले, पण बळीचे नाही, ही विदारक वस्तुस्थिती. sam09दिवाळी दरवर्षीच येते आणि ही दिवाळी साजरी करण्याची रीतही प्रत्येकाची वेगवेगळी. ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ असे म्हणण्याची परंपरा आणि ‘राजाला काय दिवाळी’ अशीही जनसामान्यांची भावना. एक मात्र खरे, की दिवाळीला उजेड हमखास असतो आणि प्रकाशाचीच पूजा केली जाते. मोठा झगमगाटच असतो सगळीकडे. आकाशकंदिलापासून भुईनळ्यापर्यंत सगळी प्रकाशाचीच उधळण आणि उजेडाचीच पखरण. सगळीकडे पेटलेले दिवे. अशा वेळी अंधारात चाचपडणाऱ्या आणि उजेडासाठी आसुसलेल्या अभागी जीवांचे अस्तित्व जवळपास बेदखलच असते. कोणतीही किंमत चुकवून जिथे कवडसाही पडत नाही असे एक जग आणि वाट्टेल ती किंमत मोजून उजेडांचे लोळ खरेदी करणारे एक जग अशी ही विभागणी करता येते. गरज असते ती ज्यांच्या नशिबी अंधार आहे त्यांच्या आयुष्यात उजेड पेरण्याची.
 हा उजेड केवळ डोळ्यांना दिसणारा नाही आणि भोवताल उजळून टाकणाराही नाही. अंधार अनेक रूपांनी असतो. तो केवळ गडद काळ्या रंगातच आपले अस्तित्व दाखवतो असे नाही. तो कितीही भयाण असू शकतो. मुख्य म्हणजे हा अंधार सगळ्यांच्याच डोळ्यांना दिसतो असेही नाही. जिथे आजही किमान गरजा भागलेल्या नाहीत, शिक्षण पोहोचले नाही, जिथे अजूनही सत्ता-संपत्तीच्या बळावर कोणाला तरी तळाशीच ठेवले जाते तिथेही अंधारच असतो. जिथे अडवणूक होते, फसवले जाते, शोषण होते, तिथेही अंधारच आणि माणसाला नसíगक हक्कांपासूनही कोसो दूर ठेवले जाते तिथेही अंधारच. फक्त दिवाळीच्या दिवसांत पणती पेटवायची आणि आपले घर तेवढे लख्ख करायचे, एवढय़ाने हा अंधार दूर होणार नाही. फक्त मिट्ट काळोखात काही तरी पेटविणे म्हणजेही अंधारावर मात करणे नाही. जसा उजेड अनेक रूपांत दिसतो तसाच अंधारही अनेक रूपांत दिसतो. sam10 हे खूपच संकुचित अर्थाने घ्यायचे ठरले, तर डोळे बंद केले की अंधार आणि डोळे उघडले की उजेड, असेही आपण म्हणू शकतो, म्हणजे हा झाला आपल्यापुरता उजेड आणि आपल्यापुरता अंधार. तो दूरही होऊ शकतो एखाद्या ठिणगीने, पण एवढय़ाने भागणार नाही. दिवाळीत अनेकदा दिसतो तो डोळ्यासमोर अंधारी आणणारा उजेड. या उजेडाने कितीसा अंधार दूर होणार? नेहमी डोळ्यांना दिसणारा अंधार दूर होईलही, पण असंख्य अज्ञात कोपऱ्यांमध्ये असलेल्या अंधाराचे काय?
कुठे तरी अडगळीला एखादे मडके पडलेले असते. कोणताच उजेडाचा कवडसा पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत. काठोकाठ अंधार भरलेला असतो त्याच्यात. आधीच रिकामे मडके, तेही अडगळीला पडलेले आणि त्यात काठोकाठ भरलेला अंधार. अनेकांच्या आयुष्याचे प्रतीकही मानता येईल त्याला. असा अंधार जिथे कुठे दिसेल तो सगळा अंधार संपवून टाकल्याशिवाय खरी दिवाळी कशी साजरी होणार?
उजेड कुठे कुठे दिसायला हवा? तर जिथे त्याची गरज आहे अशा सगळ्याच ठिकाणी. न्यायासाठी वणवणत फिरणाऱ्यांच्या आयुष्यात, राबराब राबणाऱ्या माणसांच्या जगात, जमिनीत धान्य पिकवून मातीमोल भावाने विकणाऱ्यांच्या नशिबी, सर्वच समाजात कोणाच्या तरी दहशतीची, जुलमाची शिकार झालेल्या अभागी स्त्रियांच्या आयुष्यात, सुखाचे, समाधानाचे आयुष्य सोडून वंचनाच भोगणाऱ्या सर्वाच्याच जगात अशा उजेडाची गरज आहे. केवळ दान म्हणून या उजेडाने काही तरी पदरात टाकावे असे नाही, तर हा उजेड ठाम अशा निग्रहाने यायला हवा. अन्यथा दिवाळीच्या दिवसांत केवळ आसमंत उजळून टाकायचा आणि अंधाराच्या जागा तशाच ठेवायच्या याला कोणताच अर्थ उरणार नाही.
आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या अशा अंधाराला चूड लावण्यासाठी गरज हवी ती प्रत्येकाच्या आतल्या दिव्याला वात लावण्याची. एकदा ही आतली विवेकाची वात पेटली, तर मग वेगवेगळ्या रूपांतला अंधार नष्ट होण्याच्या दिशेने सुरुवात होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2014 12:47 pm

Web Title: a great disparity in two classes comes out while celebrating diwali
Next Stories
1 सत्तेचे रंग-रूप
2 रयत आणि (आजचे) राजे!
3 ‘सामाजिक बांधीलकी’च्या नावाने..
Just Now!
X