उद्यापन या शब्दाचा रोख ‘उद्या पण’ आहे, हा विचारही मनात हास्याची लकेर उमटवत गेला..
अचलदादा – आपलं काय होतं? फार भक्तीभावानं पूजा करतो आणि पूजा आटोपताच खुजे बनतो! आता थोडं आणखी खोल जाऊ.. अशी कोणती सकृतांची जोडी असेल हो, ज्यामुळे सद्गुरुंची आवड मनात निर्माण होत असेल? हृदय तू सांग..
हृदयेंद्र – ते सांगतात त्याप्रमाणे वागणं..
अचलदादा – पण यात सकृतांची जोडी कुठली आली? बरं चालेल, आता सांग सद्गुरुंची प्रमुख आज्ञा काय?
हृदयेंद्र – आपण गोंदवल्यात आहोत ना, म्हणून उत्तर सुचतंय बघा.. नाम जपा श्वासोश्वास.. सदोदित नामात राहाणं हीच त्यांची खरी आज्ञा आहे..
कर्मेद्र – आता हे आणखीनच कठीण होतंय दादा.. नामात रहायचं म्हणजे काय?
अचलदादा – हृदय नामाचं महत्त्व काय, नामात का राहायचं आणि नाम नेमकं काय करतं.. तू सांग हे..
हृदयेंद्र – दादा हल्ली नामाबद्दल बोलायलाही मला लाज वाटते.. कसं होतं ना? नामाचं खरं ज्ञान नाही, नामाचा खरा नेम नाही आणि तरी लोक नामाबद्दल बोलण्यात वेळ नुसता घालवतात..
अचलदादा – (हसून) खरं आहे ते.. पण इथे आवश्यक आहे.. सांग..
हृदयेंद्र – दादा नाम एकतर सहजसोपं आणि सार्वत्रिक आहे.. बघा सर्वच धर्माचे लोक नामाला पवित्र मानतात आणि नामोपासनाही करतात..  व्यवहारातही नाम किती मोठं काम करतं, हे लक्षात येतं.. आपलं सगळं जगणं शब्दांनीच भरून आहे ना? जन्मत:च आपल्या कानात आपलं नाव सांगितलं जातं.. वय वाढतं तसं घास भरवावेत तसे शब्द भरवले जातात.. आपल्याही मनातलं मनन, चिंतन, बुद्धीला होणारा बोध, कल्पना, विचार हे सारं काही शब्दांच्याच माध्यमातून सुरू असतं. हे सारं मनन, चिंतन तसंच सर्व विचार, कल्पना या देहबुद्धीतूनच प्रसवतात आणि देहबुद्धीचीच जपणूक आणि जोपासना करतात. त्यातून ‘मी’ आणि ‘माझे’चा पसारा वाढत जातो आणि हृदयात घट्ट होत जातो.. आता मनातला शब्दांच्या आधारावर पसरत चाललेला हा पसारा आवरण्यासाठी ‘नाम’ काम करू लागतं. ‘नाम’ हे सुरुवातीला शब्दमयच तर वाटत असतं! त्यामुळे काटय़ानं काटा काढावा तसं शब्दमय नाम शब्दांच्याच आधारे वाढत असलेल्या मनातल्या पसाऱ्याला धक्का लावतं! शब्दांच्याच माध्यमातून आपण तासन्तास विचार करीत राहातो, त्याचा कंटाळा येत नाही, पण शब्दमय नामाचा कंटाळा येऊ लागतो. नामाच्या माऱ्यामुळे मनात खळबळ उडू लागते.
अचलदादा – तरीही नामाला चिकटून राहीलं तर हेच नाम गोडी निर्माण करतं.
कर्मेद्र – आता जे घ्यायचाच कंटाळा येतो, तेच गोडी कसं लावेल?
अचलदादा – आपण आजारी असलो आणि जिभेला चव नसली तर आपल्याला पदार्थातली गोडी कळत नाही. त्यामुळे औषध घेतल्यावर जसजसं बरं वाटू लागतं तसतशी पदार्थाची चव कळू लागते. इथे तर भवरोग्यासाठी नाम हेच औषध आहे! ते नाम घेत गेलं तर प्रकृती सुधारत जाईल आणि मग नाम हेच पक्वान्न होईल! प्रत्येक नामाबरोबर सद्गुरूंचं स्मरण मनात दरवळेल आणि नामाची गोडी जाणवू लागेल. तेव्हा प्रत्येक नामाला सद्गुरूस्मरणाची जोड मिळते ना तेव्हाच सद्गुरुंची आवड मनात निर्माण होते! तेव्हा नाम आणि त्याबरोबरच स्मरण, हीच ‘बहुत सकृतांची जोडी’ आहे!
हृदयेंद्र – वा! नाम आणि स्मरण या सकृतांची जेव्हा बहुत.. अत्यंत जोड मिळू लागेल तेव्हाच सद्गुरुंची आवड निर्माण होईल..
अचलदादा – आणि आवड नसेल तर काय हो उपयोग? सद्गुरू जीवनात आले, त्यांचा सहवासही लाभला, पण तरी त्यांची आवडच नसेल तर त्या सहवासाचा खरा लाभ मी घेऊ शकेन का? तेव्हा त्यांचं माझ्या जीवनात येणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकीच त्यांची आवड माझ्या मनात निर्माण होणंही महत्त्वाचं आहे.
योगेंद्र – पण सद्गुरुंची आवड म्हणजे नेमकी कसली आवड?
अचलदादा – त्यांची आवड म्हणजे त्यांना जे आवडतं ते मला आवडणं! त्यांची आणि माझी आवड एकच होणं, हीच त्यांची खरी आवड आहे!
चैतन्य प्रेम