ऑक्टोबरचा उष्मा म्हणजेच ‘ऑक्टोबर हीट’ ही सर्वाच्या परिचयाची बाब. पावसाळा संपल्यावर ऑक्टोबर महिन्यात हा उष्मा सुरू होतो, पुढे दिवाळीत थंडी सुरू होते. मग हा उष्मा मागे पडतो. हे सर्वसाधारण ऋतुचक्र या वर्षी दिसले नाही. म्हणूनच तर दिवाळीला सुरुवात होऊनही थंडीचा मौसम मात्र सुरू झालेला नाही. इतकेच नव्हे, तर ढगाळ हवामानामुळे काही भागातील उकाडासुद्धा हटलेला नाही. नोव्हेंबर महिना उजाडल्यावर आता कुठे सकाळी धुके दिसू लागले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच स्थिती आहे.. या वर्षी असं काय झालंय की अजूनही थंडीचा पत्ता नाही? हवामानातील चढउतार ही बाब नित्याचीच आहे, पण त्यात इतकी तफावत दिसणे हे मोठय़ा बदलाचे संकेत तर नाहीत ना? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. हवामानशास्त्र हे गुंतागुंतीचे विज्ञान असल्याने या बदलांवरून लगेच काही निष्कर्ष काढता येत नाही, पण त्याबाबत काही संकेत मात्र निश्चितपणे मिळतात. ऑक्टोबर महिन्यातील उष्मा ही ऋतुचक्रातील एक नियमित बाब आहे. पावसाळा हा आपण स्वतंत्र ऋतू मानत असलो, तरी तो आपल्या उन्हाळ्याचाच एक भाग आहे. या काळात ढगांचे आवरण आणि पाऊस असल्याने उन्हाळा जाणवत नाही. मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाळा संपल्यावर ढग निघून जातात आणि सूर्यकिरणांचा थेट सामना करावा लागतो. त्यामुळे उष्मा जाणवतो, हीच आपली ऑक्टोबर हीट! म्हणजे पावसाळा आणि पुढे येणारा हिवाळा या दोन ऋतूंमधील हा स्थित्यंतराचा काळ. त्यामुळे त्याचे अनेक परिणाम जाणवतात, ते या वेळीही पाहायला मिळाले. तापाच्या साथी तसेच, डेंग्यूसारख्या आजारांचे रुग्ण या ऑक्टोबरमध्ये मोठय़ा संख्येने आढळले. मुंबई-पुण्याबरोबरच राज्याच्या इतर भागांतही हेच चित्र होते. थंडी लवकर सुरू न झाल्यामुळे या साथींचा कालावधीही वाढला. गेल्या काही वर्षांच्या नोंदी आणि हवामानाचा अनुभव पाहता, आपल्याकडे दिवाळीतील थंडी हरवू लागली आहे. गेली सलग काही वर्षे हेच चित्र होते. या वर्षी कडाक्याची थंडी अपेक्षित होती, मात्र अजून तरी त्याची शक्यता नाही. उकाडा नसला तरी चांगली थंडी मात्र या दिवाळीत नसेल, हे निश्चित. मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा आणि त्याच्यामुळे पडणाऱ्या पावसाचा कालावधी जून ते सप्टेंबर असा मानला जातो. अलीकडेच झालेल्या अभ्यासानुसार, हा कालावधी वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सप्टेंबरनंतरही ढग कायम राहून त्यांचे  ऑक्टोबर हीटवर अतिक्रमण झाले तरी आश्चर्य वाटायला नको. मग ऑक्टोबरचा उष्माही या वेळप्रमाणे काहीसा उशिरानेच जाणवेल. स्वाभाविकपणे त्याच्यासोबत येणारे आजार-साथी यांचे वेळापत्रकही बदलेल. ऋतुचक्रातील हे बदल नेमक्या कोणत्या कारणांमुळे होत आहेत, हे आता ठामपणे       सांगणे कठीण आहे. कारण काहीही असो, या बदलांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होणार असल्याने त्यांच्याकडे गांभीर्याने पाहावे लागणार हे निश्चित! सध्या तरी हवामानातील या बदलांकडे बारकाईने पाहत नाही.. लांबलेल्या ‘ऑक्टोबर हीट’च्या निमित्ताने हे बदल टिपण्याची सवय    लावून घेऊ या. हाच आताच्या हवामानाचा धडा असेल.