समाजास ‘आप’सारख्या पक्षांची गरज आहे. मात्र निर्बुद्ध वाचाळवीरांना घेऊन करण्याइतके राजकारण उठवळ नसते, हे ध्यानात ठेवतानाच पक्षात जे काही घडले ते मान्य करून ‘आप’ ने आत्मपरीक्षण करणे आणि  योगेंद्र यादव यांच्यासारख्या स्थिरबुद्धीकडे पक्षाची धुरा देणे हिताचे ठरेल.
प्रत्यक्ष सोंगापेक्षा बोंगा जड झाला की जे होते ते आम आदमी पक्षाचे झाले आहे. या पक्षाचा नेमस्त आणि संयत चेहरा असलेले प्रा. योगेंद्र यादव यांच्यापासून केवळ वचावचा बडबड करणे म्हणजे राजकारण असे मानणाऱ्या अंजली दमानिया, शाझिया इल्मी आदींना या पक्षातून राजीनामा द्यावेसे वाटते यावरूनच या पक्षाचे किती वाटोळे झाले आहे, हे कळून यावे. राजधानी दिल्लीत या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत यातील अनेकांचे राजीनामे फेटाळण्याचा निर्णय झाला. पण ते काही खरे नाही. या पक्षाच्या नेतृत्वात ज्या काही भेगा पडल्या त्याचे रूपांतर दरींत होऊ लागले असून या दऱ्या बुजवणे आता अधिकच अवघड होईल. हे असे झाले कारण तो पक्ष चालवणाऱ्यांचा स्वत:विषयी असलेला भ्रम. या मंडळींच्या वकुबापेक्षा त्यांचा गंड कायमच मोठा होता. त्याचा अंदाज आल्यामुळेच आम्ही पहिल्या दिवसापासून आपच्या एकंदरच भवितव्याविषयी साशंक होतो. या पक्षाविषयी भाबडी आशा लावून बसलेले आमच्या आपवरील टीकेमुळे नाराज झाले. परंतु त्यास इलाज नाही. त्यांच्या दुर्दैवाने अखेर या पक्षाविषयीची भीती खरी ठरताना दिसते. परंतु हे असेच होणार होते. याचे कारण आपने सुरुवातीपासूनच आणलेला आव.
भारतीय समाजमनास भ्रष्टाचाराविरोधात कोणी आगलावी भाषा करीत असेल तर आनंद होतो आणि अशा व्यक्तीत समाज आपला तारणहार शोधू लागतो. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल आदी अचानक मोठे झाले ते या मानसिकतेमुळे. अशा व्यक्तींनी आपला लढा लढावा आणि आपली सडलेली व्यवस्था दूर करावी असे समाजातील अज्ञ जनांना वाटू लागते. यातील अडचण ही की ज्यांना असे वाटत असते त्यांना आपण म्हणजेच ही व्यवस्था आहोत आणि आपण बदलल्याखेरीज तीत सुधारणा होणार नाहीत, हे मान्य नसते. आपण सोडून सर्व भ्रष्ट आणि पापी आणि त्यांचे निर्दालन हे अण्णा, अरविंद वगैरेंनी करावे अशी या समाजाची धारणा असते. समाजाची ही मानसिकता अण्णा, अरविंदांच्या पथ्यावर पडते. कारण त्यामुळे आपण म्हणजे कोणी अवतार आहोत असा आव त्यांना आणता येतो आणि आपली नेतृत्वाची पोळी त्यावर भाजून घेता येते. अण्णा आणि अरविंद यांनी हेच केले. नैतिकतेबाबत अरविंद केजरीवाल हे अन्य कोणत्याही राजकीय नेत्यापेक्षा उजवे आहेत, असे काही अंशानेही म्हणता येणार नाही. तसे ज्यांना वाटते तो त्यांचा मूढपणा. केवळ लाच न घेणे म्हणजे नैतिकता नव्हे. आपले नियत कर्तव्य प्रामाणिकपणे आणि व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवून करणे यात राजकीय नेत्याच्या नैतिकतेचे मोजमाप असते. या दोन्ही निकषांवर अरविंद केजरीवाल परीक्षेला बसल्यापासून सातत्याने अनुत्तीर्ण होत आहेत. त्यांच्या या अपयशाची जाणीव आता सर्वानाच होत असताना ते समजून घेणे गरजेचे ठरते.
केजरीवाल प्रामाणिक असते तर सत्ता मिळवून बदल घडवणे हे माझे ध्येय आहे, हे त्यांनी लपवले नसते. राजकारणात उतरायचे आणि मी सत्तेसाठी लढत नाही म्हणायचे, हा दांभिकपणा झाला. तो इतकी वर्षे अनेक जण करीत आहेत. त्यात केजरीवाल यांची भर पडली. तेव्हा ते इतरांपेक्षा वेगळे कसे? या मुद्दय़ावर त्यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी हे अधिक प्रामाणिक म्हणावयास हवेत. मला पंतप्रधान व्हायचे आहे आणि ते पद मी मिळवणार असे ते उघडपणे म्हणत होते. केजरीवाल यांनी ही लबाडी करावयाचे कारण नव्हते आणि आपण म्हणजे कोणी त्यागमूर्ती आहोत असा आव आणण्याचीही काही गरज नव्हती. या त्यांच्या नाटकास सुरुवातीला दिल्लीतील जनता भुलली. त्यामुळेच त्यांना धक्कादायक मताधिक्य मिळाले. तरीही ते निर्णायक नव्हते. मी-नाही-बाई-त्यातली ही त्यांची भूमिका खरी असती तर त्यांनी त्या वेळी पराभूत पक्षाच्या साह्य़ाने सत्ता स्थापन केली नसती. सरकार बनवले तर बनवले पण निदान त्याचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणा आणि हिंमतही त्यांना दाखवता आली नाही. सरकार सोडण्याची लबाडी त्यांनी केली ती अधिक मोठय़ा यशासाठी. मुख्यमंत्रिपदाचा त्याग मी कसा करतो, हे दाखवणे हा डांबिसपणा होता. तो त्यांनी केला कारण त्या वेळी जनमताचा रेटा लक्षात घेता लोकसभा निवडणुकीत आपल्याला भव्य यश मिळेल असे भाकड भाकीत अनेक जण दाखवत होते म्हणून. अशा वेळी ज्यांनी आपल्याला सत्ता दिली त्या दिल्लीतील मतदारांना काय वाटेल, आपण त्यांची फसवणूक तर करीत नाही ना, अशा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता त्यांनी धाडकन लोकसभेच्या जवळपास ४०० जागा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पक्षाला विश्वासात घ्यायची गरजही त्यांना वाटली नाही. त्यात माध्यमांच्या हुच्चपणामुळे आपण खरेच विजयी होऊ असे केजरीवाल यांना वाटू लागले आणि थेट पंतप्रधानपदाचेच स्वप्न त्यांना पडू लागले. कोणत्याही राजकीय नेत्यास असे स्वप्न पडण्यात काहीही गैर नाही. परंतु एकीकडे सत्ता नको म्हणायचे आणि पंतप्रधानपदावर डोळा ठेवायचा हा कोणता प्रामाणिकपणा? या टप्प्यावर खासगी उद्योग, पत्रकारिता, समाजकारण अशा क्षेत्रांतील करून करून भागलेले अनेक जण देवपूजेला लागल्यासारखे आपकडे धाव घेत होते. त्यामुळे तर केजरीवाल आणि कंपूला आपला विजय ही काळ्या दगडावरची रेघ असे वाटू लागले. त्यातूनच त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आव्हान देऊन उंटाच्या पाश्र्वभागाचा मुका घ्यायचा प्रयत्न केला. तो अंगाशी आला. तसा तो येणारच होता. कारण मोदी हे जरी भाजपचा चेहरा असले तरी त्यांच्या मागे भरभक्कम पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखे कार्यकर्त्यांचे मोहोळ उभे होते आणि पक्ष म्हणून भाजपची अनेक वर्षांची साधना होती. हे त्यांनी काहीही लक्षात घेतले नाही आणि मोदी यांच्या चेहऱ्याला आपला चेहरा पर्याय ठरेल, असा भ्रम करून घेतला. म्हणजे त्या अर्थानेही केजरीवाल लोकशाहीवादी ठरत नाहीत. निवडणूक ही पक्ष नव्हे तर एका व्यक्तीभोवती फिरती ठेवण्याचा आरोप जर मोदी यांच्यावर होत असेल तर त्यापासून केजरीवाल यांचा अपवाद करता येणार नाही. खेरीज, वाराणसीतून मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय आपलाही महागात पडला. कारण केजरीवाल स्वत:च्याच निवडणुकीत अडकले आणि अन्य उमेदवारांचा प्रचार पूर्णपणे करू शकले नाहीत आणि त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडले. याचाच अर्थ पक्षातील अन्य उमेदवारांपेक्षा त्यांना स्वत:चा विजय हा अधिक महत्त्वाचा वाटला. म्हणजेच पक्षापेक्षा स्वत:चे हित पाहणारे अन्य राजकीय पक्षाचे स्वार्थी म्हणून ओळखले जाणारे राजकारणी आणि केजरीवाल यांच्यात कोणता फरक? आपल्याला अनुकूल वातावरण आहे की नाही याचा अंदाज घ्यावयाचा आणि तसे असेल तर त्याप्रमाणे पक्षाची मोर्चेबांधणी करावयाची हे राजकीय पक्षासाठी आवश्यकच असते. दिल्लीतील विजयाच्या जोरावर देशातही आपल्याला असेच विजयी होता येईल असे वाटून आपनेही तेच केले. तेव्हा त्याहीबाबत तो पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा ठरत नाही. केजरीवाल यांचे दुर्दैव आणि लोकशाहीचे सुदैव हे की मतदारांनी केजरीवाल यांचे पाणी योग्य वेळी जोखले आणि त्यांना जागा दाखवून दिली. त्याच वेळी शाझिया इल्मी, दमानिया, कॅप्टन गोपीनाथ, योगेंद्र यादव आदींनाही केजरीवाल यांचा खरा चेहरा उमगला आणि हे राजीनामा नाटय़ घडले.
अशा वेळी जे काही घडले ते प्रामाणिकपणे मान्य करून आपने आत्मपरीक्षण करावे. आमच्यात काहीच मतभेद नाहीत, सगळे किती छान छान असा आव आणू नये. त्याच वेळी या मंडळींनी हेही लक्षात घ्यावे की दमानियाबाई वा इल्मी असल्या निर्बुद्ध वाचाळवीरांना घेऊन करण्याइतके राजकारण उठवळ नसते. तेव्हा आपने या मंडळींना नारळ द्यावा आणि योगेंद्र यादव यांच्यासारख्या स्थिरबुद्धीकडे पक्षाची धुरा देऊन संपूर्ण मांडणी नव्याने करावी. समाजास आपसारख्या पक्षांची गरज आहे. ती लक्षात घेऊन दीर्घकालीन हिताचा विचार करीत पक्षासमोरील अडेल अरविंदचे आव्हान मोडून काढावे. त्यातच हित आहे. आपचे आणि आपले.