आगामी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून केजरीवाल यांनी स्वत:च्या हातानेच आपल्या सरकारची मुंडी पिरगाळली. एकदा का सर्व व्यवस्थाच भ्रष्ट ठरवली की आपण व्यवस्थेचा भाग बनून बदल घडवून दाखवण्याची गरजच उरत नाही. म्हणजे स्वत: व्यवस्था होऊन काही करून दाखवायचे नाही आणि व्यवस्थेच्या नावे मात्र बोटे मोडत राहावयाचे हा खेळ खेळता येतो. आता लोकसभा निवडणुकांत नव्या दमाने अधिक बेताल आणि बेजबाबदार आरोप करायला ते पुन्हा तयार.
अरविंद केजरीवाल हे अत्यंत भंपक गृहस्थ आहेत हे आमचे मत याआधीही होते. याबाबत त्यांनी त्यांचे गुरू अण्णा हजारे यांनाही निश्चितच मागे टाकले असे म्हणता येईल. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे पहिलेवहिले मंत्रिमंडळ सत्तेवर आल्यापासूनच कधीही पडेल अशाच अवस्थेत होते. कारण सरकार चालवावे ही केजरीवाल आणि कंपनीची मानसिकताच नव्हती आणि त्यात बदल व्हावा अशी त्यांची इच्छाही नाही. ही मंडळी कायम विरोधकाच्या मानसिकतेतच आहेत. अशा विरोधी पक्षीय मानसिकतेचा एक फायदा असतो. तो म्हणजे प्रस्थापितांच्या नावे सतत बोटे मोडता येतात आणि काहीच सिद्ध करून दाखवावयाचे नसल्यामुळे सर्व व्यवस्थाच कशी भ्रष्ट आहे हे तुणतुणे अव्याहत वाजवता येते. त्यात कर्जे न फेडता आल्याने खड्डय़ात गेलेले काही उद्योगपती, कलावंत, लेखक चेतन भगत आदींसारख्या वर्तमानपत्रांच्या तृतीयपानी अर्धवटरावांनी या मंडळींना सुरुवातीला झाडावर चढवले. आम आदमी पक्ष आणि तो चालवणारे जणू संतमहंतांचे अवतार आहेत आणि भारताच्या पुनरुत्थानासाठीच जणू या भूतलावर अवतरले आहेत, असेच चित्र निर्माण झाले. परिणामी आम आदमीयांना अधिकच चेव आला. अशांच्या मानसिकतेस चटकन लोकप्रियता मिळते. कारण आपल्यासारख्या निमसाक्षर समाजव्यवस्थेत प्रत्येकास आपण सोडून सर्वच भ्रष्ट आहेत आणि आपली जी काही अवस्था आहे ती सत्ताधारी बदमाशांमुळे आहे ही कहाणी गळी उतरवणे सोपे जाते. एकदा का सर्व व्यवस्थाच भ्रष्ट ठरवली की आपण व्यवस्थेचा भाग बनून बदल घडवून दाखवण्याची गरजच उरत नाही. म्हणजे स्वत: व्यवस्था होऊन काही करून दाखवायचे नाही आणि व्यवस्थेच्या नावे मात्र बोटे मोडत राहावयाचे हा खेळ खेळता येतो.  त्यात आचरट आरोप करणाऱ्यांच्या आणि तितकीच आचरट आश्वासने देणाऱ्यांच्या मागे आपल्याकडे काही काळ का होईना जनता जाते. त्या आश्वासनांची व्यवहार्यता तपासून पाहण्याइतके शहाणपण आपल्या समाजात अद्याप यावयाचे आहे. आम आदमी पक्षाच्या बाबतीत हेच झाले. स्विस बँकांत दडवून ठेवलेला काळा पैसा आम्ही परत आणू असे सांगणारे भगवे वस्त्रांकित बाबा रामदेव आणि आर्थिक आघाडीवर भरमसाट घोषणा करणारे मफलरांकित केजरीवाल या दोघांत वस्तुत: फरक नाही. त्यातल्या त्यात बाबा रामदेव यांना शहाणपणाचे दोन गुण अधिक देता येतील. कारण ते व्यवस्था चालवण्याच्या फंदात पडले नाहीत. केजरीवाल यांनी तो प्रयत्न करून पाहिला. परंतु त्यांच्या आम आदमी पक्षास दिल्ली विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या सर्व अडचणींसाठी काँग्रेस वा भारतीय जनता पक्षास दोष देण्याची सोय उपलब्ध राहिली. खरे तर आम आदमी पक्षास स्पष्ट बहुमत मिळाले नाही याबद्दल केजरीवाल कंपूने दिल्लीतील जनतेचे आभार मानावयास हवेत. कारण पूर्ण बहुमत मिळाले असते तर केजरीवाल यांच्या स्वप्नाळू राजकारणाचा आणि मागास अर्थकारणाचा फुगा लवकर.. आणि कायमचाही.. फुटला असता. तसे न झाल्यामुळे आगामी काही काळ या पक्षाचे शेपूट वळवळत राहील.
भिकार आणि मागास अर्थकारणाच्या जोडीस केजरीवालीय कंपूस नैतिकतेचा दंभ होता. या दंभाची बाधा झालेले समाजासाठी नेहमीच मोठा उपद्रव ठरत असतात. आम्ही नैतिकदृष्टय़ा सरस आहोत, त्यामुळे आम्हास कोणतेही नीतिनियम लागू होत नाहीत असा त्यांचा सूर असतो. ही मंडळी व्यवस्थाही पाळत नाहीत. कारण ही व्यवस्था अनैतिकांनीच बनवलेली असल्यामुळे ती न पाळणे हेच आमचे कर्तव्य आहे असे त्यांचे म्हणणे असते. केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांचे सत्तेच्या ४८ दिवसांतील वर्तन हे या मानसिकतेतून आले होते. मग ते शाळांवर घातलेले छापे असोत वा परदेशी महिलांवर देहविक्रयाचा आरोप करणे असो. स्वत:स नैतिकदृष्टय़ा o्रेष्ठ म्हणवणारे ज्या पद्धतीने परदेशी महिलांशी वागले ते पाहता कोणाही सभ्याचा संतापच होईल. युगांडा या देशातून दिल्लीत वास्तव्यास आलेल्या काही महिला देहविक्रय करीत असल्याचा संशय होता. म्हणून केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी स्वत:च छापे घातले आणि या महिलांना रात्रभर त्यांच्या वाहनांतच डांबून ठेवले. या कारवाईचा तपशील प्रसिद्ध झाला असून त्यावरून केजरीवाल आणि साथीदारांची मानसिकता लक्षात यावी. या महिलांना केजरीवाल सहकाऱ्याने नैसर्गिक विधीपुरतेही मुक्त केले नाही आणि परिणामी त्यांना भर रस्त्यात कार्यभाग उरकावा लागला. ही यांची नैतिकता. जे काही झाले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्यही या मंडळींनी कधी दाखवले नाही. खुद्द केजरीवाल यांच्या वागण्यातून आपण एका लोकशाहीप्रधान देशातील महत्त्वाच्या प्रदेशाचे जबाबदार मुख्यमंत्री आहोत अशी जाणीव कधीही दिसली नाही. मुख्यमंत्री स्वत:च रस्त्यावर उतरून निदर्शने करीत असेल तर कोणी कोणास दोष द्यावा? त्यामुळे केजरीवाल आणि त्यांचे मंत्री हे नि:संशय एकाच माळेचे मणी होते. लोकशाही व्यवस्थेत एखाद्या कायद्याबद्दल दुमत असेल तर तो बदलण्यासाठी स्वत: कायदा मोडण्याचा पर्याय मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तींना तरी निदान उपलब्ध नाही. याचे त्यांना भान नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून आपण अपयशी ठरू याची पूर्ण खात्री पटलेल्या केजरीवाल यांनी आपले सरकार कसे हुतात्मा होईल यासाठी प्रयत्न चालवले होते. मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स पेट्रोलियमविरोधात नैसर्गिक वायू दराबाबत केजरीवाल यांची कारवाई ही याच प्रयत्नांचा भाग होती. केंद्र सरकारनेही अंबानी यांच्या कंपनीच्या फायद्यासाठी दामदुप्पट इंधन दर करण्याचे सौजन्य दाखवण्याची काहीच गरज नव्हती, हे मान्य. सरकारच्या या लबाडीचे विश्लेषण आम्हीही यापूर्वी केले आहे. खासदार गुरुदास दासगुप्ता यांनीही सरकारच्या रिलायन्सधार्जिण्या दरवाढीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. असला कोणताही संसदीय मार्ग न चोखाळता केजरीवाल यांनी मुकेश अंबानी आणि तेलमंत्री वीरप्पा मोईली यांच्याच विरोधात गुन्हे दाखल केले. अशा कृत्यांमुळे नि:संशय लोकप्रियता मिळत असली तरी भरीव काही हाती लागत नाही.
तेव्हा अशा वेळी केजरीवाल सरकारचे बारा वाजणार हे उघड होते. त्यातही त्यांचे चातुर्य हे की अकार्यक्षमतेच्या कारणावरून सरकार पडले असते तर त्याचा राजकीय लाभ हवा तितका आम आदमी पक्षास झाला नसता. त्यामुळे केजरीवाल यांनी जनलोकपालाच्या मुद्दय़ावर हे सरकार पडेल अशी स्वत:च व्यवस्था केली. या प्रश्नावर ताठर भूमिका घेण्यात त्यांचा दोन्ही बाजूंनी फायदा होता. हे विधेयक मंजूर झाले असते तर त्याचे श्रेय घेता आले असते आणि मांडले गेले नसते तर पाहा भ्रष्टाचारी पक्ष हे करू देत नाहीत, असे रडगाणे गाण्याची सोय त्यांना होती. यातील दुसरा पर्याय त्यांनी स्वीकारला आणि आगामी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून स्वत:च्या हातानेच आपल्या सरकारची मुंडी त्यांनी पिरगाळली. आता लोकसभा निवडणुकांत नव्या दमाने अधिक बेताल आणि बेजबाबदार आरोप करायला ते पुन्हा तयार.
राजकारण असो वा समाजकारण. बदल करावयाचा असेल तर अशा माथेफिरू पद्धतीने तो घडत नाही. त्यासाठी सातत्य आणि समजूतदारपणा लागतो. हजारोंच्या छावणीवर सात सैनिकांना घेऊन आत्मघातकी हल्ला करू पाहणाऱ्या कुडतोजी गुजरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात.. छाप कृत्याने काहीही साध्य होत नाही. हौतात्म्य तेवढे येते. साडेतीनशे वर्षांपूर्वी असे कृत्य करणाऱ्या कुडतोजी गुजर यांना शिवाजी महाराजांनी प्रतापराव अशा नामकरणाने गौरवले. अरविंद केजरीवाल मात्र आधुनिक राजकारणातील कुडमुडे कुडतोजीच राहतील.