विश्वचषक आता चार आठवडय़ांवर येऊन ठेपला असताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए बी डी’व्हिलियर्सने जोहान्सबर्गवर ऐतिहासिक खेळी साकारून क्रिकेटजगताला थक्क केले. डी’व्हिलियर्सने रविवारी दुबळ्या वेस्ट इंडिजवर हल्लाबोल करीत फक्त ३१ चेंडूंत साकारलेल्या वेगवान शतकी खेळीने कोरे अँडरसनचा विश्वविक्रम मोडीत निघाला, याशिवाय रोहित शर्माच्या विश्वविक्रमी १६ षटकारांशीही त्याने बरोबरी साधली. २०१०मध्ये डी’व्हिलियर्सने भारताविरुद्ध ५८ चेंडूंत १०२ धावा काढून वेगवान शतकांच्या पंक्तीत स्थान मिळवले होते. त्याच वेळी या अवलियाने सर्वाना दखल घ्यायला लावली होती.
२०११च्या विश्वचषकानंतर ग्रॅमी स्मिथकडून आफ्रिकेच्या नेतृत्वाची धुरा डी’व्हिलियर्सकडे चालत आली आणि त्याने ती समर्थपणे सांभाळली. आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या आणि एकदिवसीय क्रमवारीत तो पहिल्या स्थानावर विराजमान आहे. डिसेंबर २०१३मध्ये दोन्ही क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करणारा तो क्रिकेटजगतातील नवा खेळाडू ठरला.  मदानांवर चौफेर वर्चस्व गाजवणारे त्याचे ड्राइव्हज, पुल्स आणि कट्स डोळ्यांचे पारणे फेडतात. त्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाज हतबल होतात. सलामीवीर ते मधल्या फळीतील फलंदाज तसेच यष्टिरक्षणाची जबाबदारी तो लीलया पेलतो.  वयाच्या विसाव्या वर्षी त्याने राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधले. पोर्ट एलिझाबेथला इंग्लंडविरुद्ध अर्धशतकी खेळी साकारून त्याने आपले पदार्पण साजरे केले. मग त्याच मालिकेत सेंच्युरिअनच्या घरच्या मैदानावर डी’व्हिलियर्सने पहिलेवहिले शतक साकारले. २००८मध्ये डी’व्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेकडून द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.  कसोटी कारकीर्दीत प्रथमच शून्यावर बाद होण्यापूर्वी अनेक कसोटी डाव खेळण्याचा विक्रम आजही त्याच्या नावावर आहे. गतवर्षी आयसीसीचा सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार त्याने पटकावला. त्या वेळी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅडम गिलख्रिस्टने पृथ्वीतलावरील सर्वात मौल्यवान क्रिकेटपटू अशा शब्दांत डी’व्हिलियर्सचा गौरव केला होता. सध्या दक्षिण आफ्रिका कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, तर एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. या यशात डी’व्हिलियर्सचा सिंहाचा वाटा आहे. तूर्तास, झंझावाती फॉर्मात असलेला कर्णधार डी’व्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेवर बसलेला ‘चोकर्स’ हा शिक्का पुसून संघाला विश्वचषक जिंकून देईल, अशी आशा बाळगू या!