News Flash

९१. देहाची भट्टी

दादासाहेब जो अर्थ सांगत होते त्यानं हृदयेंद्रचा चेहरा आनंदानं उजळला होता. आपल्या वडिलांनीही हा अर्थ ऐकला होता आणि त्यावर त्यांनी जी चर्चा केली तिचाही संस्कार

| May 11, 2015 12:13 pm

दादासाहेब जो अर्थ सांगत होते त्यानं हृदयेंद्रचा चेहरा आनंदानं उजळला होता. आपल्या वडिलांनीही हा अर्थ ऐकला होता आणि त्यावर त्यांनी जी चर्चा केली तिचाही संस्कार दादासाहेबांच्या आताच्या बोलण्यावर आहे, या जाणिवेनं ज्ञानेंद्रही भावुक झाला होता. योगेंद्रलाही काहीतरी नवं गवसत असल्यागत वाटत होतं.. कर्मेद्रही थोडं मन लावून चर्चा ऐकत होता.. नाना आणि कुशाभाऊही मित्राचं बोलणं ऐकण्यात दंग होतेच..
दादासाहेब – देह बागेसरी जाणे!
योगेंद्र – बागेसरी म्हणजे वागेश्वरी..
हृदयेंद्र – दादासाहेब.. वागेश्वरी म्हणजे शारदाच! अर्थात प्रज्ञा, प्रतिभा, आत्मशक्ती.. या देहातदेखील तिचंच अधिष्ठान आहे.. हाडामांसाच्या या देहातच ज्ञानेंद्रियं आहेत.. कर्मेद्रियं आहेत..  
योगेंद्र – याच देहातली कुंडलिनी शक्तीही शारदाच आहे..
हृदयेंद्र – तेव्हा या देहाला वागेश्वरीची शक्ती आहे.. इथे वाक्  हा मूळ शब्द आहे. वाक्  म्हणजे वाणी.. तेव्हा हा नामशक्तीचाही संकेत वाटतो..
ज्ञानेंद्र – पण दादा यापलीकडेही काही अर्थ असलाच पाहिजे..
दादासाहेब – आहेच!
हृदयेंद्र – सांगा ना! उत्सुकता तर कमालीची वाढली आहे.
दादासाहेब – अरे हो.. पण आम्हाला रात्री हॉटेलला जायला हवं.. तेव्हा अगदी थोडक्यात सांगतो..
ज्ञानेंद्र – दादासाहेब इथंच राहा ना..
कर्मेद्र – कोणतं हॉटेल आहे? मी कळवतो त्यांना हवं तर.. वाटलं तर उद्या जाता येईल..
कुशाभाऊ – पण असं चालतं का? बुकिंग तर झालं आहे.. आता आमची अजून काही लोकं आहेत म्हणा तिथे..
ज्ञानेंद्र – मग काय! उलट मग त्यांनाही अगदी ऐसपैस झोपता येईल.. (दादासाहेबांचा चेहराही मग थोडा खुलला. तोच काहीसं आठवून ज्ञानेंद्रनं सखारामला हाक मारली. त्याला चांगला कडक चहा बनवायला सांगितलं तसंच रात्रीच्या जेवणाबाबतही सूचना केल्या आणि मग तो दादासाहेबांकडे वळला) हं सांगा आता!
दादासाहेब – तर ‘देह बागेसरी जाणे’.. म्हणजे देह ही भट्टी आहे.. आता ही जी सोनं चळवणारी म्हणजे द्रवरूप करणारी बागेसरी आहे ना ते बिडाचं भांडं असतं. त्याला भिडाचं भांडं असंही म्हणतात बरं का.. तर बिडाचा प्रमुख गुणधर्म असा की कितीही उष्णता असली तरी ते वितळत नाही! लोखंड काय किंवा अन्य धातू काय एवढी उष्णता सोसूच शकत नाही. त्यांच्या आकारमानात फरक झाल्याशिवाय राहाणार नाही. बिडाचं तसं नाही.
हृदयेंद्र – ओहो! आता लक्षात येताय ‘देह बागेसरी जाणे’ म्हणजे अनेक संकटांना कणखरपणे तोंड देऊ शकेल, अशी ही देहाची भट्टी आहे! खरंच कितीतरी आघात, भावनिक ताण, वैचारिक द्वंद्व माणूस सहन करतो आणि त्यातून वाटही काढतो.. श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत, ‘आधी शक्ती येते मग भोग येतो!’ म्हणजे दु:खाचा भोग वाटय़ाला येण्याआधी तो सहन करण्याची शक्तीही परमात्मा देतोच. सहन झालं नसतं तर सांगायलाच कुणी उरला नसता.. तेव्हा अनंत प्रारब्धभोग भोगताना जीवनाचा हा जो दागिना घडवायचा आहे त्यासाठी भट्टीही तशीच सक्षम हवी!
दादासाहेब – आता भट्टीचं काम काय तर सोनं तापवणं. पण ते सोनं असतं मुशीमध्ये. ही जी मूस आहे ना ती या अभंगात कशाची आहे?
हृदयेंद्र – ‘त्रिगुणाची करुनी मूस..’
दादासाहेब – बरोबर.. हे त्रिगुण कोणते?
योगेंद्र – सत, रज आणि तम..
हृदयेंद्र – आपल्या प्रत्येकाच्या जीवनात या तिन्ही गुणांचंच मिश्रण असतं. या तिन्ही गुणांपलीकडे जो गेला तोच त्रिगुणातीत झाला.. तोच खऱ्या अर्थानं मुक्त झाला.. तमोगुण हा निव्वळ स्वार्थासाठी दुसऱ्याचं सुख हडप करायला तयार असतो, रजोगुण हा स्वकर्तृत्वानं सुखी होण्यासाठी प्रयत्न करायला प्रेरणा देतो तर सत्त्वगुण हा मी दु:खी राहिलो चालेल पण दुसरा सुखी झाला पाहिजे, अशी प्रेरणा देणारा असतो..
दादासाहेब – अगदी छान! आता नीट लक्षात घ्या.. अंत:करण त्रिगुणांच्या कचाटय़ात आहे.. त्रिगुणांची करुनी मूस!
काही लक्षात येतंय का?
-चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2015 12:13 pm

Web Title: abhandhara human body
टॅग : Human Body
Next Stories
1 ९०. भट्टी
2 ४. मौनाभ्यास / संघटित..
3 ८३. मौनाभ्यास -४ / हट्ट.. मनाचा आणि साधनेचा
Just Now!
X