16 February 2019

News Flash

धोकटी

भक्ताच्या रूपात परमात्म्यानं वा सद्गुरूनं जाऊन व्यवहारातली चाकरी करून येण्याच्या प्रसंगावर ज्ञानेंद्र बोलत होता

| July 17, 2015 02:40 am

भक्ताच्या रूपात परमात्म्यानं वा सद्गुरूनं जाऊन व्यवहारातली चाकरी करून येण्याच्या प्रसंगावर ज्ञानेंद्र बोलत होता.. अशा चमत्कारांची वर्णनं वाचून साधारण साधकाची आध्यात्मिक प्रगती होईल की त्याच्या मनातला गोंधळ वाढेल? चुकीच्या अपेक्षा निर्माण होतील? असे प्रश्न त्यानं उपस्थित केले होते. त्यावर कर्मेद्र हसत म्हणाला..

कर्मेद्र – पण मला बुवा माझ्या रूपात कुणी जाऊन सर्व कामं पार पाडणार असेल तर फार आवडेल!
योगेंद्र – (हसत) पण त्यासाठी जगाचं भान विसरून भगवंताच्या भक्तीत तल्लीनही व्हावं लागतं!
हृदयेंद्र – गमतीचा भाग सोडा, पण कर्मेद्र लक्षात घे या गोष्टी वारंवार घडलेल्या नाहीत.. सेना महाराजांच्या जीवनातही हा प्रसंग एकदाच घडला आहे आणि बाबाजींच्या जीवनातही तो एकदाच नोंदला आहे.. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमात्म्यानं किंवा सद्गुरूनं त्यांना व्यवहारातलं उपजीविकेचं प्रारब्धानुसार आलेलं साधन त्यागायला सांगितलेलं नाही..
बुवा – हो.. गाथेतल्या दोनेक अभंगांत सेना महाराजांनीही सांगितलंय पहा.. ‘‘न्हावीयाचे वंशीं। जन्म दिला ऋषीकेशी। प्रतिपाळावे धर्मासी। व्यवहारासी न सांडीं।। ऐका स्वधर्मविचार। धंदा करी दोन प्रहर। सांगितलें साचार। पुराणांतरीं ऐसें हें।। करुनियां स्नान। मुखीं जपे नारायण। मागुती न जाण। शिवूं नये धोकटी।।’’ आणखी एका अभंगात म्हणतात, ‘‘जन्मलों ज्या वंशांत। धंदा दोन प्रहर नेमस्त।। सत्य पाळारे स्वधर्मासी। सेना म्हणे आज्ञा ऐसी।।’’ आता लक्षात घ्या.. हा काळ अतिशय जुना आहे.. तेव्हा जन्मानुरूप जी जात असेल त्या जातीनुरूपची कर्मे हेच उपजीविकेचं साधन असे.. त्यामुळे हा जो धंदाव्यवसाय वाटय़ाला आला आहे तो सत्याचरणाने पाळावा, अशी आज्ञा मला आहे, असं सेना महाराज सांगतात. त्याचप्रमाणे पहिला जो दाखला दिला तोही फार मार्मिक आहे. त्यात ते काय म्हणतात? तर दोन प्रहर धंद्याला द्यावेत. नंतर मग परत स्नान करून जपात उरलेला दिवस घालवावा. त्यानंतर धोकटीला शिवू नये! आता ही धोकटी म्हणजे केशकर्तनाचं साहित्य ठेवलं जाई, ती धोकटी खरंच.. पण ही धोकटीही फार व्यापक आहे बरं का! आपला धंदा, व्यवसाय, नोकरी-चाकरीच्या विचारांचं मनातलं ओझं हीसुद्धा ज्याची-त्याची धोकटीच आहे!
योगेंद्र – फार छान! खरंच आहे हे.. नोकरीतल्या बऱ्यावाईट चढउतारांचा मनावर इतका परिणाम होतो की साधनेला बसल्यावरसुद्धा त्याच विचारांच्या माशा सतत घोंगावत साधनेत व्यत्यय आणत राहातात..
बुवा – साधनेत नोकरीतील चढउतार, जवळच्या माणसांच्या प्रकृतीतला चढउतार आणि स्वत:च्या प्रकृतीतला चढउतार यांचा फार पटकन परिणाम होतो, पण त्यातही नोकरीतल्या चढउताराचा परिणाम अधिक पटकन होतो, याचं मुख्य कारण म्हणजे त्या नोकरीवर आपली उपजीविका अवलंबून असते.. दरमहा ठरावीक रक्कम मिळण्याचं ते माध्यम असतं..
हृदयेंद्र – माझ्याही मनात प्रथम या गोष्टींचा फार प्रभाव होताच, पण एक दिवस मला जाणवलं की मी नोकरी करतो ती कंपनी काही मला पगार देत नाही, पगार मला सद्गुरू देत आहेत! मग मला पगार किती मिळावा आणि मिळालेल्या पगारात माझं कसं भागावं, हे तेच बघतील! हे जेव्हा तीव्रपणे जाणवलं ना तेव्हा नोकरीतलं काम उत्तम करूनही जे नको ते हेवेदावे, स्पर्धा, डावपेच यात पडावं लागतं किंवा ते पहावं लागतं, त्या साऱ्याची किंमतच उरली नाही.. सगळं खेळासारखं वाटू लागलं.. मनावरचं किती मोठं ओझं उतरलं.. याचा अर्थ असा नाही, की मला व्यवहाराची काळजीच नाही, पण सद्गुरुंच्या कृपेनं त्याचा परिणाम मर्यादेपलीकडे कधीच जात नाही..
योगेंद्र – तुझं ठीक आहे रे, पण आमच्यासारख्या संसारी माणसांना ते जमणं कठीण आहे..
बुवा – पण खरं सांगू का? इथे मानसिकतेचाच प्रश्न आहे. त्यांनी मनातून व्यवहाराची काळजी सोडली आहे, व्यवहार सोडलेला नाही. आपण व्यवहारही सोडलेला नाही आणि व्यवहाराची काळजीही सोडलेली नाही. ती इतकी वेगानं वाढत आहे की त्याचीही आपल्याला जाणीव नाही.. ती काळजीच हळुहळू साधनेचा घास घेत आहे, हे लक्षात येत नाही. त्यासाठी त्या काळजीची धोकटी बाजूला ठेवता आलीच पाहिजे!
ल्ल चैतन्य प्रेम

First Published on July 17, 2015 2:40 am

Web Title: abhang dhara dhokti