संतान म्हणजे सातत्य.. सावता माळी महाराज भक्तीचं सातत्य मागत आहेत आणि मला नि:संतान कर, या मागण्यात भवविषयाकडील ओढीचं अनंत जन्मांचं सातत्य तोडायला सांगत आहेत, या मुद्दय़ावरून चर्चा माणसाला मन:शांतीचं जे सातत्य हवं असतं, त्याकडे वळली होती आणि मुळात मन:शांती अशी काही गोष्टच अस्तित्वात असू शकत नाही, या ज्ञानेंद्रनं श्रीनिसर्गदत्त महाराज यांच्या बोधानुरूप मांडलेल्या मुद्दय़ाशी ठेपली होती. या मुद्दय़ानं हृदयेंद्र आणि योगेंद्र काहीसे अचंबित झाले होते खरे, तर इतरांची उत्सुकता ताणली गेली होती. त्यांच्याकडे पाहात ज्ञानेंद्र वाचू लागला..
ज्ञानेंद्र – तुमचा मन:शांतीचा शोध संपला काय, तुम्हाला मन:शांती मिळाली काय, तुमचं मन शांत झालं आहे का, या प्रश्नांवर तो साधक म्हणाला, माझा शोध अजून संपलेला नाही..
नाना – तसंही मन शांत झालं, असं कायमसाठी कोण बोलू शकेल?
ज्ञानेंद्र – बरोबर.. तो साधकही सांगतो, माझा शोध संपलेला नाही. मग महाराज सांगतात, ‘‘मन:शांतीचा तुमचा शोध संपणारही नाही. कारण मन:शांती अशी  काही गोष्टच नाही. मन म्हणजे खळबळ, खळबळ म्हणजे मन. योग हा मनाचा गुण नाही किंवा ती मनाची अवस्था नाही.’’ त्यावर साधक म्हणतो की, ‘‘योगामुळे मला काही अंशी शांती जरुर मिळाली.’’ बघा हं! काही अंशी, पूर्ण नव्हे!! म्हणून महाराज सांगतात की, शांत केलेलं मन स्वस्थ राहात नाही. कारण ज्याला मन शांत करायचं आहे तोच शांत नाही! महाराज सांगतात की, ‘‘तुमची शांती फार ठिसूळ आहे. कोणत्याही अल्प कारणानं ती बिघडू शकते. तुम्ही म्हणता ती शांती म्हणजे फक्त अस्वस्थतेचा अभाव आहे. शांती हे नाव तिला शोभत नाही. खरी शांती कधी ढळत नाही.’’
योगेंद्र – पण मग साधकानं करावं तरी काय? मी शांत नाही, म्हणून माझं मन शांत करणं माझ्या आवाक्यात नाही, हे ऐकायला ठीक आहे, पण मी शांत कसं व्हावं?
ज्ञानेंद्र – अगदी बरोबर! त्या साधकालाही असा प्रश्न पडतो की मग जी काही थोडीफार शांती मी मिळवली आहे, तीसुद्धा मी गमावू काय? यावर महाराज सांगतात, जे मिळवलं जातं ते गमावलंही जाऊ शकतं! जे मूळचं तुमचंच आहे ते कायम तुमचंच राहातं. तुमची खरी निश्चळ स्थिती हीच खरी आहे. ती अनुभवली की खरी निश्चळ शांतीही तुमचीच आहे!
हृदयेंद्र – पण अशा स्थितीचा अनुभव तरी कसा यावा?
ज्ञानेंद्र – तुम्ही जणू या पुस्तकातल्या साधकाचेच प्रश्न विचारत आहात! ऐका.. याच प्रश्नावर महाराज सांगतात, ‘‘अडथळ्यांवर मात केल्याशिवाय जीवनात काहीच साधू शकत नाही. आपलं सत्यस्वरूप जाणताना जे अडथळे येतात त्यावर मात करावीच लागते. हे अडथळे म्हणजे सुखाची इच्छा आणि दु:खाची भीती! सुखदु:खविषयक हेतूच हे सत्यस्वरूप जाणण्याच्या आड येतात. सर्व हेतूंपासून मुक्तता, ज्या स्थितीत कोणतीही इच्छा उत्पन्नच होत नाही, तीच सहजस्थिती!’’ मग हा साधक विचारतो की, इच्छांचा त्याग करायला किती कालावधी लागतो? महाराज त्यावर सांगतात, ‘‘तुम्ही ते काळावर सोपविलंत तर लक्षावधी र्वष लागतील. इच्छेमागून इच्छेचा त्याग करीत बसणं ही दीर्घ प्रक्रिया आहे. तिचा शेवट कधीच दिसत नाही. तुमच्या इच्छा आणि भीती यांच्याकडे दुर्लक्ष करा, त्यांच्याबद्दल चिंता करू नका. इच्छा आणि भीती यांच्या अनुभवामागे जो आहे, त्याच्याकडे संपूर्ण लक्ष पुरवा.’’
हृदयेंद्र – पण इच्छा आणि भीतीकडे दुर्लक्ष करणं काही सोपं नाही.. इच्छा आणि भीतीला दूर सारून त्या ज्याच्या अंत:करणात आहे त्या ‘मी’कडे निर्लिप्तपणे पाहणं काही माझ्या आवाक्यातलं नाही.. त्यासाठी खंबीर आधार हवाच आणि केवळ सद्गुरू हाच तो आधार आहे! माझ्यातल्या इच्छांचा निरास केवळ तेच करू शकतात, माझ्यातल्या भीतीचा निरास तेच करू शकतात.. माझ्या जीवनाचा धुरीण सद्गुरू आहेत, हे जाणवलं तर मग निश्चिंतीनं जगणं सुरू होईल.. माझ्या अंतरंगात भक्तीचं, उपासनेचं सातत्य तोच निर्माण करू शकतो. माझ्या अंतरंगात असलेल्या भवविषयांच्या ओढीच्या सातत्याचं खंडण तोच करू शकतो..
चैतन्य प्रेम