अचलदादांच्या भावप्रवाही बोलण्यानं जणू आजूबाजूची जाणीवच लोपली होती.. मन कसं वेगळ्याच उंचीवर पोहोचलं होतं.. हाच खरा सत्संग आहे, या भावनेनं हृदयेंद्रचं मन उचंबळून आलं.. अचलदादा मोबाइलमध्ये काहीतरी शोधू लागले.. हृदयेंद्रनं कुतूहलानं त्यांना विचारलं..

हृदयेंद्र – काय शोधता आहात?
अचलदादा – मगाशी नामदेवांचा, त्यांच्या मुलांपैकी विठा महाराजांचा उल्लेख झाला ना? त्या विठा महाराजांचाच एक फार छान अभंग मागे एकानं पाठवला होता.. हं मिळाला.. ऐका हं.. काहीतरी विलक्षण आहे यात..
मरण हें पेरणें जन्म हें उगवणें।
हे मायेची खूण जाणीतली।।
संग तुझा पुरे संग तुझा पुरे।
संग तुझा पुरे नारायणा।।
तूं तरी न मरें मी तरी न मरें।
भक्ति हे संचरे हाचि लाभू।।
विठा म्हणे केशवा ठाईचा मी नेणें।
गर्भवास भोगणें तुझी लाज।।
हा अभंग ऐकताच हृदयेंद्रच्या मनात अनेकानेक विचार तरंग उमटू लागले.. त्याच्या पारदर्शक चेहऱ्यावर त्याचीच जणू बिंबं-प्रतिबिंबं उमटत होती.. त्याच्या भावनिरागस चेहऱ्याकडे पाहात अचलदादा म्हणाले..
अचलदादा – काय? आहे की नाही विलक्षण? कितीतरी चकवे आहेत यात बरं का!
हृदयेंद्र – (हसत) खरंच दादा.. मला तर वाटतंय आत्ता माझे तीनही मित्रं इथे हवे होते.. त्यांनाही या चर्चेत किती आनंद वाटला असता..
अचलदादा – (गंभीर होत) तुमचे मित्र खरंच चांगले आहेत, पण हृदय.. कोणतीही गोष्ट कायमची आयुष्यात राहाते, असं कधीच मनानं धरू नका.. आयुष्य म्हणजे एक प्रवाह आहे.. अनंत काळापासून चालत आलेला.. त्या प्रवाहात लाकडाचे ओंडके वाहात असतात.. काही क्षण एकत्र असतात.. काही क्षणांत एकमेकांपासून दुरावतात.. पण वाहाणं थांबत नाही.. तसं जीवन आहे.. माणसं येतात.. जातात.. असून दुरावतात, नसून हृदयात ठाण मांडतात.. गुरुजींचं भजन आहे ना? ‘‘अभी संग जिसका करमबस मिला है। रहेगा हमेशा नहीं संग ये तेरा।।’’ कर्मप्रारब्धामुळं आपण एकत्र आलो.. ते प्रारब्ध संपताच हा संगही संपतोच.. पण त्या एकत्र येण्यात जे भगवद्चिंतन साधलं, तेच लक्षात ठेवायचं.. जो भक्तीप्रेमाचा आनंद वाटला तोच आठवायचा.. (हृदयेंद्रच्या डोळ्यांत पाणी तरळतं) तुम्ही फार भावनिक आहात.. हे अष्टसात्त्विक भाव केवळ भगवंतासाठी असतात, जगासाठी नव्हेत! बरं असो.. इथून परतल्यावर भेटतीलच ना तुमचे मित्रं? तेव्हा जरुर आपली चर्चा सांगा त्यांना.. (हृदयेंद्र आपलं मन सावरायचा प्रयत्न करत आहे, त्याला अधिक दिलासा देण्यासाठी..) बरं असंच का कराना? आपलं बोलणं मोबाइलवर ध्वनिमुद्रितच करा.. (हृदयेंद्रचा चेहरा उजळतो)
हृदयेंद्र – वा! ही गोष्ट मला सुचलीच नव्हती.. एकच आहे, गाडीचा आवाजही मधेच येईल.. पण असो.. थांबा हं, हं.. बोला होतंय टेप..
अचलदादा – मला आधी सांगा.. हं हेसुद्धा टेप झालं चालेल.. तर आधी सांगा, तुम्हाला या अभंगात काय वेगळं जाणवतंय?
हृदयेंद्र – बरंच काही! मरण हे पेरणं आहे आणि जन्म हे उगवणं आहे, किती वेगळंच आहे.. आणि ज्या भगवंताचा संग कायमचा हवा, त्यालाच विठा महाराज हा संग पुरे सांगताहेत? किती हा संग! मी मरत नाही, की तूसुद्धा मरत नाहीस, इतकं बेधडकपणे ते नारायणाला सांगताहेत!! खरंच दादा तुम्ही म्हणता ना, तसे चकवेच चकवे आहेत या अभंगात!! दादा तुम्हीच सांगा, माझी उत्सुकता तर अगदी शिगेला पोहोचलीय..
अचलदादा – (हसतात) हा अभंग पहिल्यांदा वाचला ना, तेव्हा माझीही अशीच अवस्था झाली होती.. मग रोज वारंवार हाच अभंग वाचू लागलो.. एखाद्या माणसाशी आपली मैत्री कशी होते? वारंवार भेटूनच ना? वारंवार भेटून विश्वास निर्माण होतो, मग एकमेकांना गुह्य़ गोष्टीही सांगितल्या जातात.. तसं वारंवार भेटून हा अभंग त्यातली गुपितं सांगू लागला.. गुपितं कसली? अर्थ कळत नाही, तोवर गुह्य़ वाटतं, अर्थ समजताच वाटतं, अरे हे तर कळलंच होतं की!