कुंडलिनीचा विषय निघाला आणि गाडीचा वेग पुन्हा मंदावला. रूळ बदलत बाजूला जाऊन ती उभी राहिली. हृदयेंद्रनं अनेकदा उत्तरेत प्रवास केला होता. त्या अनुभवाच्या जोरावर तो म्हणाला, ‘‘इथे अशी गाडी कितीवेळा सायडिंगला उभी करतील, भरोसा नसतो. सुदैवाची गोष्ट इतकीच की अगदी छोटय़ाशा स्थानकावर तरी थांबली आहे.’’ कर्मेद्रनं आश्चर्यानं बाहेर पाहात विचारलं, ‘‘हे स्थानक आहे?’’ हसून हृदयेंद्र म्हणाला, ‘‘तुला फलाट दिसायचा नाही. नीट पहा..’’ कर्मेद्रनं पाहिलं खरंच जमिनीपासून किंचित उंचावर एवढय़ाच उंचीचा ‘फलाट’ होता. तोदेखील गाडीच्या लांबीइतका नव्हे. हृदयेंद्र म्हणाला, ‘‘उत्तरेत काही मोठय़ा स्थानकांचीदेखील अशीच गत आहे. अनेक गर्दीच्या स्थानकातही फलाटाची उंची अगदी कमी असते. त्या तोबा गर्दीतून डब्यात माणसं कशी शिरतात, याचंच नवल वाटावं..’’ तोच कर्मेद्र ‘‘जरा आलोच,’’ म्हणत सटकला. ज्ञानेंद्र हसून म्हणाला, ‘‘यात्रेच्या आधी किती उत्साह होता याला.. आता कंटाळलाय..’’ त्यावर योगेंद्र म्हणाला..
योगेंद्र – तो आहेच असा आरंभशूर.. एवढय़ा प्रवासात आजूबाजूच्या डब्यातल्या लोकांशीही ओळखी काय करून घेतल्यात.. कुणाबरोबर सिगारेट शेअर कर, कुणाबरोबर तंबाखू.. कुणाला आग्रहानं चहा पाज.. करमायचंच नाही त्याला.. बरं पण मी आता पुन्हा सुरू करू ना?
हृदयेंद्र – थांब ना, कर्मेद्रला येऊ दे की..
योगेंद्र – पण त्याला कुठे रस आहे यात.. येईल तेव्हा असेल कुतूहल तर पुन्हा विचारेलच, आपला वेळ का वाया घालवा.. काही तासांत मथुरा येईलही.. तर ऐका आपल्या या शरीरात मेरुदंडात इडा, पिंगला आणि सुषुम्ना आहेत. यातील इडा आणि पिंगला या ज्ञानतंतूंच्या दोन प्रवाहांद्वारे प्रत्येक इंद्रियांमार्फत मेंदूपर्यंत संवेदना पोहोचवल्या जातात आणि कोणती कृती करायची हे मेंदूकडून प्रत्येक इंद्रियाला तात्काळ प्रेरित केले जाते.. इडा आणि पिंगला अत्यंत सक्रीय आहेत आणि त्याद्वारेच शरीरात प्राणाचा प्रवाह अखंड सुरू आहे. त्याद्वारेच जिवाला बाह्य़चेतना होते, संवेदना होते आणि तो कार्यरत असतो.. सुषुम्ना बंद आहे.. गुरुकृपेनं जेव्हा गतिमान झालेली प्राणशक्ती हे बंद द्वार उघडायचा प्रयत्न करते आणि प्राण उध्र्वमुख होऊन सुषुम्नेत जाण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी मार्गावर अडथळे येतात.. या अडथळ्यांमुळे हा प्रवाह थांबला तर काय उपयोग? पण त्या प्राणशक्तीत, त्या कुंडलिनीशक्तीतच अशी शक्ती अंतर्भूत असते की तो अडथळा ती पार करून पुढे जाते.. त्यासाठी साधनाभ्यासाची मात्र जोड हवी.. हा अडथळा नष्ट करून पुढे जाण्याची जी क्रिया आहे तीच ‘चक्रां’मागची भूमिका आहे..
तोच ‘‘थांबा!’’ असं मोठय़ानं म्हणत कर्मेद्र तिघांसमोर प्रकटला. त्याच्या पाठीमागे एक उमद्या व्यक्तिमत्त्वाचा आणि किंचित प्रौढत्वाकडे झुकलेला एकजण उभा होता. या अनाहूत पाहुण्याला पाहून तिघे काहीसे गोंधळले. योगेंद्रचा चेहरा मात्र शोधक नजरेनं व्यापला होता. कर्मेद्रनं बर्थवरच्या उशा आणि ब्लँकेट वरच्या बर्थवर टाकत जागा केली आणि मोठय़ा अदबीनं त्यांना बसण्यास सांगितले..
हृदयेंद्र – इनका परिचय?
कर्मेद्र – अरे हे डॉक्टर नरेंद्र.. मराठीच आहेत..
हृदयेंद्र – म्हणजे मथुरेला दर्शनाला आलात का?
डॉ. नरेंद्र – मथुरेत दर्शन घेऊच, पण आम्ही तिथून उद्या  रस्तामार्गे नेपाळला जाणार आहोत.. अजून काहीजण आहेत बरोबर, पण आमचा पुढचा डबा आहे..
योगेंद्र – आपण याआधी कधी भेटलो आहोत का हो? होच.. तुम्ही त्या योगसाधना वर्गाला येत होतात ना?
डॉ. नरेंद्र – अरे हो की.. पण तुम्ही मला लगेच ओळखणं शक्य नाही, हे कबूल.. कारण बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.. दोघांमध्येही बराच पालट झाला आहेच..
कर्मेद्र – म्हणजे तुम्ही दोघं ओळखता? आणि डॉक्टर तुम्हीही योगसाधना वगैरे करता.. अरे देवा मला वाटलं हे कुंडलिनी वगैरे शरीरशास्त्राच्या दृष्टीनं कसं झूठ आहे, हे तुम्हीच सिद्ध कराल..
डॉ. नरेंद्र – (प्रसन्नपणे हसून) हे पहा, शरीररशास्त्रानुसार पाहिलं तर शरीरात अशी चक्रं नाहीत हे खरं, पण..
कर्मेद्र – चक्रं नाहीत खरं ना, मग तेवढंच म्हणा की.. हे ‘पण’चं दुष्टचक्र कशाला?