या शरीरात शरीरशास्त्राच्या दृष्टीनं ‘चक्रं’ वगैरे काही आढळणार नाहीत, या सत्याला पुढे डॉ. नरेंद्रांनी ‘पण’ जोडल्यानं कर्मेद्रनं कातावून जे वाक्य उच्चारलं त्यानं सर्वच जण प्रसन्नपणे हसले. निरागस लहान मुलाच्या एखाद्या कृतीनं यावं, तसं हसू होतं ते. मग योंगेंद्रनं आतापर्यंत झालेल्या चर्चेचं सार सांगितलं आणि तो म्हणाला..
योगेंद्र – मूलाधारापासून सहस्त्रारापर्यंतच्या सहा चक्रांचा नुसता उल्लेखच मी करीत होतो, एवढय़ात तुम्ही आलात..
डॉ. नरेंद्र – मग तुमचं सांगणं आधी पुरं करा ना..
योगेंद्र – मला काही चांगल्या पद्धतीनं बोलता येत नाही. तरी प्रयत्न करतो. कर्मू ही चक्रं काही दिसत नाहीत, हे खरं, पण दिसणाऱ्या इंद्रियांपासून थोडी सुरुवात करतो. घराचं दार असतं ना? त्या दारातून आपण घरात येतो किंवा घराबाहेर पडतो. ते दार बंद केलं की जगापासून आपण वेगळे होतो. तर अशी नऊ दारं आपल्या देहाला आहेत. एक मुख, दोन डोळे, दोन नाकपुडय़ा, दोन कान, एक गुह्य़स्थान आणि एक लिंगस्थान. मुखावाटे आपण बोलतो तसंच खातो, डोळ्यांनी जग पाहातो तसंच या क्षमतेमुळे जगातला आपला वावर सुकरही होतो, दोन नाकपुडय़ा गंधाचं ज्ञान जसं देतात तसंच श्वासोच्छ्वासही त्यांच्यामुळेच साधतो, कानांनी आपण ऐकतो, गुह्य़स्थानावाटे मलाचा, अतिरिक्त वायूचा निचरा होतो, लिंगस्थानाद्वारे मूत्राचा त्याग होतो तसंच प्रजनन क्रियेतही त्याचा वाटा असतो. अशा प्रकारे या नऊ द्वारांच्या आधारे आपला जगाशी संपर्क येतो, संयोग घडतो तसंच देहाची जपणूकही होते. या नऊ द्वारांच्या सहयोगानं शरीरांतर्गत प्राणाचा प्रवाह सतत बहिर्मुखी गतीनं सुरू आहे. आता घराचं दार बंद करून जसं आपण एकांतात जातो तशी शरीराची ही नऊही द्वारं ‘बंद’ करून म्हणजेच या नऊ द्वारांच्या सहयोगानं प्राणांचा जो बहिर्मुखी प्रवाह आहे तो थोपवून प्राणाच्या गतीवर नियंत्रण मिळवलं, प्राणाचा संयम साधला तर बंद असलेल्या सुषुम्नेत हा प्राण शिरतो आणि तो सहा चक्रांचं भेदन करीत सहस्त्रारापर्यंत पोहोचतो..
हृदयेंद्र – त्या सहा चक्रांबद्दल जरा सांग ना..
योगेंद्र – हो सांगतो ना.. ही चक्रं आणि शरीरातली त्यांची स्थानं अशी.. मूलाधार हे चक्र गुदद्वारापाशी आहे, दुसरं स्वाधिष्ठान लिंग मुळात, तिसरं मणिपूरचक्र नाभी मुळात, चौथं अनाहत हृदयपद्मात, पाचवं विशुद्धचक्र कंठस्थानी आणि सहावं आज्ञाचक्र हे भ्रू-मध्यात म्हणजे नाकाचा कपाळाला स्पर्श करणारा हा वरचा भाग आणि दोन भुवयांच्या मध्ये इथे आहे.. त्याच्यावर मेंदूत असलेल्या सातव्या चक्राला म्हणतात सहस्त्रार! समस्त शक्ती ही सर्वात खालच्या म्हणजे मूलाधार चक्रात वसत असून तिला या सहस्त्रारात न्यायचे आहे.
थोडा वेळ डब्यात शांतता पसरली. तिचा भंग करीत घसा खाकरून योगेंद्र परत बोलू लागला..
योगेंद्र – बरं ही चक्रं कमळांच्या आकाराची आहेत. प्रत्येक कमळचक्राच्या पाकळ्यांची संख्याही वेगवेगळी आहे. पाकळ्यांच्या या संख्येमागेही गूढ रहस्य आहेच.. पण आपला विषय लांबत जाईल..
कर्मेद्र – हो, आधीच तो नको इतका लांबलाय..
योगेंद्र – ऐक रे! तर मूलाधाराशी असलेली कुंडलिनी शक्ती जागी झाली की प्राणांचा हा प्रवाह अंतर्मुखी होऊन सुषुम्नेत शिरायचा प्रयत्न सुरू करतो. ‘योगशिखोपनिषदा’त म्हंटलं आहे की, ‘‘आत्मशक्ती जागी झाली की बहिर्मुखी असलेली प्राणांची गती अंतर्मुखी होते.’’ इथे एक गंमत घडते. प्राण मूलाधारापुढे जायचा प्रयत्न तर ताकदीनं करतात, पण त्यांना जाता येत नाही! एखाद्या बलदंड माणसाला दार लोटून थोपवायचा प्रयत्न केला तर काय होईल? तो प्रक्षुब्ध होईल आणि आपल्या पूर्ण ताकदीनिशी ते दार तोडून प्रवेश करील. तसे प्राण ‘प्रक्षुब्ध’ होतात, ‘तापतात’!  उष्णता, शक्ती आणि वेग या त्रिवेणी संगमानं पहिलं चक्र भेदण्यासाठी ते निकराची टक्कर देतात.. या प्रक्रियेत अनंत गोष्टी घडू शकतात. सर्व शरीराला कंप सुटतो.. आनंदानं नाचायला होतं..
हृदयेंद्र – ओहो! संतांचीही हीच भावावस्था होती की..
योगेंद्र – मग एक चक्र भेदलं जातं.. मग दुसरं.. मग तिसरं भेदत पुढे सहस्त्रारापर्यंत जायचं आहे.. म्हणजे एकच चक्र भेदून भागत नाही. एकदाच ‘उडून’ भागत नाही. आणखी वर.. आणखी वर झेपायचं आहे.. म्हणून नुसतं ‘उडरे’ नाही, ‘उडरे उडरे काऊ’ म्हटलं आहे!