विश्रामधाम अतिशय प्रशस्त होतं. कृष्णभक्तीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार करणाऱ्या भक्त संघटनेचा हा प्रकल्प होता, त्यामुळे त्यात साधेपणा, नेटकेपणा आणि दर्जेदारपणा यांचा मिलाफ जाणवत होता. मोठं चौकोनाकृती उद्यान आणि त्याच्या मधोमध ‘प्रसादम्’   हे अल्पोपाहार गृह, या उद्यानाच्या तटबंदीसारख्या ओळीनं असलेल्या हॉटेलच्या खोल्या. त्या सर्वच खोल्यांसमोरून जाणारा प्रशस्त व्हरांडा. म्हणजे चौकोनाकृती उद्यान, त्याच्या तटबंदीसारखं चौकोनाकृती विश्रामधाम आणि त्या खोल्यांसभोवती चौकोनाकृती प्रशस्त व्हरांडा, अशी ती रचना मोठी नेटकी वाटत होती. हा सर्व परिसर सर्वानाच आवडला. चौघा मित्रांपाशी येत डॉक्टरसाहेब हळूच म्हणाले..
डॉ. नरेंद्र – आपल्या विषयात माझ्या मित्रांना काहीच रूची नाही. त्यामुळे त्यांचं जेवण ते खोलीवरच मागवतील..
ज्ञानेंद्र – आपण एक काम करू. आपापल्या खोलीवरच जेवण मागवून घेऊ.. तासभर विश्रांती घेऊ.. रात्री या हिरवळीवर कॉफीपान करत गप्पा मारू..
डॉ. नरेंद्र – हो चालेल. थोडी झोप आवश्यक आहेच. ती झाली तर जागताही येईल.
योगेंद्र – पण झोपेनं सुस्ती येऊन रात्र झोपेत सरायला नको.  
डॉ. नरेंद्र – तसं नाही व्हायचं.. तुमच्या चक्रांनी माझ्या डोक्यात विचारचक्र सुरूच आहे!
रात्री हिरवळीवर गार पण आल्हादकारक वारं सुटलं होतं. कानटोप्या, स्वेटर, हातमोजे घालून आणि छोटय़ा लांबट शाली गुंडाळून पाचहीजण थंडीचा आस्वाद घेत उबदार कॉफीचे वाफाळ घोट रिचवत गप्पांसाठी सरसावले होते. गप्पांची सुरुवात ज्ञानेंद्रनी केली.
ज्ञानेंद्र – डॉक्टरसाहेब तुमच्या त्या सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक अ‍ॅक्टिव्हिटीची माहिती छानच आहे, पण ज्या चक्रांबद्दल आपण बोलत होतो, त्यात त्यांचा काय संबंध आहे? मला ते नीटसं उलगडलं नाही..
डॉ. नरेंद्र – अहो यांनी जेव्हा त्या सहा चक्रांचा उल्लेख केला ना तेव्हा माझ्या डोळ्यासमोर शरीराची अंतर्गत रचना आली. गंमत अशी की ही जी सहा चक्रं शरीरात ज्या ज्या स्थानी आहेत ना, त्या त्या स्थानी पॅरासिम्पथेटिक अ‍ॅक्टिव्हिटीचंही केंद्र आहे! म्हणूनच कर्मेद्र जेव्हा म्हणाले की ही चक्रं खरंच आहेत का, तेव्हा मी तो ‘पण’ जोडला.. या ज्या पॅरासिम्पथेटिक अ‍ॅक्टिव्हिटी आहेत ना, त्यांना आम्ही रछवऊऊ म्हणतो. या आपल्या पूर्ण परिचयाच्या आहेत. त्या अशा ‘र’ म्हणजे सलायझेशन अर्थात लाळ निर्माण करणं, ‘छ’ म्हणजे लॅक्रिनेशन अर्थात रडणं, ‘व’ म्हणजे यूरिनेशन अर्थात लघवी करणं, ‘ऊ’ म्हणजे डायजेशन, अर्थात पचन आणि दुसरा ‘ऊ’ म्हणजे डेफिकेशन अर्थात मलत्याग.. आंतरिक भावोत्सर्गाचं नियमन शरीर या ‘रछवऊऊ ’द्वारे करीत असतं.
कर्मेद्र – पण त्यांचा या चक्रांशी काय संबंध ते सांगा ना..
डॉ. नरेंद्र – हो.. योगेंद्रजी तुम्ही चक्रं आणि त्यांची स्थानं पुन्हा सांगत जा. मी तिथे कोणती पॅरासिम्पथेटिक अ‍ॅक्टिव्हिटी आहे ते सांगतो.. (योगेंद्रनं संमतीदर्शक मान हलवली) हं, मग सांगा पहिलं चक्र कोणतं?
योगेंद्र – पहिलं चक्र आहे मूलाधार. हे गुह्य़द्वाराशी आहे.
डॉ. नरेंद्र – आणि आपण हे जाणतोच की इथे डेफिकेशन अर्थात मलत्याग ही पॅरासिम्पथेटिक अ‍ॅक्टिव्हिटी आहे.
योगेंद्र – दुसरं स्वाधिष्ठान चक्र हे लिंगमुळात आहे..
डॉ. नरेंद्र – पुरुषांमध्ये इथे प्रोस्टेट ग्रंथी आहेत. लिंगमुळात हे चक्र आहे यातच आलं की वासनेचं नियमन करणाऱ्या पॅरासिम्पथेटिक अ‍ॅक्टिव्हिटी इथे आहेत..
योगेंद्र – तिसरं मणिपूर हे नाभिस्थानी आहे.
डॉ. नरेंद्र – इथे डायजेशन अर्थात पचनाची अ‍ॅक्टिव्हिटी आहे.
योगेंद्र – डॉक्टरसाहेब या नाभीला किंवा बेंबीला योगी वासनेचं मूळ मानतात.. म्हणजे स्वाधिष्ठानात लैंगिक वासनेचं मूळ आहेही, पण मुलाची आईशी जी नाळ आहे ती या बेंबीतच आहे.. जन्म-मृत्यूच्या चक्राची ही नाळ आहे आणि या चक्रात हवे-नकोपणाच्या वासनेपायीच माणूस अनंत जन्म अडकून आहे.. तुम्ही ‘पचन’ म्हणता, मी वासनाओढीनं वाटेल तसं, भारंभार खाल्लं तर पचन नव्हे अपचनच होईल ना? अतृप्त वासना हेच ते अपचन नाही का? त्यापायीच मी परत-परत जन्मतो ना? जन्माचे ते मूळ पाहावे शोधून! अतृप्त वासनेचं हे जन्ममूळ या मणिपूर चक्रातच आहे. ही वासना शांत करण्यासाठीच ‘दहीभाताची उंडी’ आली असेल, नाही का?