जाणिवेचं संकुचित केंद्र बदललल्याशिवाय वैयक्तिक सुख-दु:खाच्या प्रभावापासून मुक्त होता येणार नाही, या अचलानंद दादांच्या विधानावर सर्वचजण आपापल्या पठडीनुसार विचार करू लागले. कर्मेद्र म्हणाला..
कर्मेद्र – ठीक आहे दादा. सामाजिक दु:खाचा मुद्दा थोडा बाजूला ठेवला तरी वैयक्तिक दु:ख जाणवतंच ना? त्या दु:खाच्या ओझ्याखाली जो पुरता पिचला आहे, त्याला जाणिवेचं केंद्र बदलण्याचा कोरडा सल्ला देणं, ही थट्टाच नाही का? दु:ख हे जीवनातलं वास्तवच नाही का?
हृदयेंद्र – पण हीच गोष्ट आपण कुठे मानतो? दु:ख हे वास्तव असतानाही जीवनात सुखच सुख असावं, दु:ख असूच नये, ही अवास्तव अपेक्षा प्रत्येकजण बाळगतोच ना?
योगेंद्र – आणि सुखाचा अभाव म्हणजेच दु:ख, असं मानतो आपण. हे सुख-दु:खही किती सापेक्ष असतं. आपल्याकडे दिवस-रात्र वीजपुरवठा असतो. तासभर वीज जाऊ द्या, किती बेचैन होतो आपण! पण याच देशातल्या अनेक खेडय़ांमध्ये भारनियमन आहे, तीव्र पाणीकपात आहे. तिथे तासभर वीज अखंड आली तरी किंवा तासभर सलग पाणीपुरवठा झाला तरी लोकांना कोण आनंद होतो!
हृदयेंद्र – महानगरात रेल्वे फलाटांची उंची हा एक चर्चेचा मुद्दा झालाय. पण मी उत्तर भारतात पाहतो की, अनेक स्थानकांमधील फलाटांची उंची जमिनीपासून एक-दोन फूट एवढीच असते. गाडय़ांची उद्घोषणा नसते, गाडीच्या डब्यांवर क्रमांकाची पाटी नसते, कोणता डबा कुठे येईल, हे सांगणारे इंडिकेटर्स नसतात. मग या गाडीत चढणं आणि उतरणं मोठं दिव्यच असतं. बर आपल्याकडे एक गाडी चुकली तर पाचेक मिनिटांत दुसरी गाडी येते. इथे एक गाडी चुकली तर सात-आठ तासांनी किंवा कदाचित दुसऱ्या दिवशीही दुसरी गाडी येते! पण त्या लोकांच्या दु:खाची आपल्याला कल्पना तरी आहे का? स्थानकांपासून आपल्या घरी जायला ना इथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, ना रिक्षा-टॅक्सींची रांग आहे. मग गाव जवळ, म्हणजेसुद्धा काही  मैलांवर बरं का, आलं ना की लोक साखळी ओढून गाडी थांबवून उतरतात.. या अवाढव्य देशात किती आव्हानांना तोंड देत जगतात माणसं..
कर्मेद्र – आणि वर आम्ही छाती पुढे करून फुशारक्या मारणार की, ‘सर्वे: सुखिन: सन्तु’ अशी व्यापक संकल्पना आमच्या वेदांनीच मांडली!
कर्मेद्रच्या या उद्गारांवर अचलानंत दादा हसतात. काहीतरी गवसल्याचा आनंद त्यांच्या या हसण्यातून आभासित होत असतो. त्यामुळे हृदयेंद्र त्यांच्याकडे कुतूहलानं पाहत असतानाच ज्ञानेंद्र बोलू लागतो..
ज्ञानेंद्र – मला वाटतं आपण सामाजिक अभाव आणि व्यक्तिगत अभावातून आलेली दु:खं यांची सरमिसळ करीत आहोत..
कर्मेद्र – पण ही दोन्ही दु:खं विभक्त करता येतील? दु:खाच्या भरात एखादा वैफल्यग्रस्त माणूस भर रस्त्यात गोळीबार करतो आणि त्यात अनेक निष्पाप लोक मारले जातात, मग त्या व्यक्तिगत दु:खाची किंमत समाज मोजतोच ना? ज्या समाजात दंगली, गोळीबार, स्फोट वारंवार होतात त्या सामाजिक दु:खाची किंमत व्यक्तीलाही मोजावीच लागते ना?
ज्ञानेंद्र – ते कोण नाकारेल? पण सामाजिक दु:खांचं मूळ आणि अन्याय, विषमता, अज्ञान यातच असतं. त्यासाठी जनजागृती, सामाजिक न्याय प्रस्थापित करणं, समानता आणणं हाच उपाय आहे. अनेक चळवळींतून ही प्रक्रिया सुरूच असते. सामाजिक न्यायात, समानतेत आपल्याकडून विक्षेप येणार नाही, असं वर्तन हे तर प्रत्येकाचंच नागरी कर्तव्य आहे. तेव्हा सामाजिक दु:ख आहे तसं राहू द्या, असं कुणीच म्हणणार नाही. सामाजिक अभाव, विषमता हे व्यक्तिगत दु:खाचं एक कारण आहे, हेदेखील कुणी नाकारणार नाही, पण ज्या दु:खाचं जाणिवेचं केंद्र बदलण्याची चर्चा दादा करीत आहेत ते माझ्या व्यक्तिगत जीवनापुरतं आहे!
हृदयेंद्र – समष्टिचं सुख हेच अध्यात्माचं ध्येय आहे, त्या ध्येयासाठीची वाटचाल मात्र व्यक्तीपासून सुरू होते. जोवर मी व्यक्तिगत दु:खाच्या प्रभावातून मुक्त होत नाही तोवर सामाजिक दु:खं दूर करण्यासाठी मी एक पाऊलही टाकू शकत नाही.
या बोलण्यावर कर्मेद्रनं टाळ्या वाजवल्या. त्याच्या या कृतीकडे तिघं मित्र आश्चर्यानं हसत पाहू लागले.
-चैतन्य प्रेम