अचलानंद दादांच्या बोलण्यात एक आश्वासकता होती. बोलणं थेट, सरळ, प्रवाही, सखोल आणि मनाला स्पर्शणारं होतं. चेहऱ्यावरील सात्त्विकतेची जोड शब्दांना जणू वेगळंच तेज देत होती. हृदयेंद्र म्हणाला.
हृदयेंद्र – तुम्ही एकदा सांगितलं होतंत की हा अभंग ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यावर गायला गेला आहे..
अचलदादा – अगदी खरं. अहो माउलींनी ‘ज्ञानेश्वरी’ला वाक् यज्ञ म्हंटलंय ना? पण हा यज्ञ काय त्यांच्या इच्छेनं सुरू झाला होता का? नाही! सद्गुरू निवृत्तीनाथांची ती आज्ञा होती. त्यांच्याच कृपेनं मी बोलत आहे, हा माउलींचा भाव होता. म्हणून तर ‘ज्ञानेश्वरी’त जिथे जिथे सद्गुरुंचा उल्लेख येतो तिथे तिथे त्यांना भावावेग आवरत नाही. तुम्हाला ‘गुरुगीता’ माहित आहे ना?
कर्मेद्र – ही कोणती नवी गीता?
हृदयेंद्र – भगवान शिवांनी पार्वतीमातेला सद्गुरूतत्त्वाचं दिव्य स्वरूप या गीतेत सांगितलं आहे..
अचलदादा – आणि म्हणून ‘ज्ञानेश्वरी’तल्या सद्गुरू वर्णनाच्या ओव्या वेचल्यात ना, तर ‘गुरुगीते’ची प्राकृत आवृत्तीच तयार होईल! याचं कारण माउलींच्या परंपरेचे आदिपुरुषही शिवच आहेत! ‘‘आदिनाथ गुरू सकल सिद्धांचा। मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य। मच्छिंद्रानं बोध गोरक्षासी केला। गोरक्ष वोळला गहिनीप्रती।। गहिनी प्रसादे निवृत्ती दातार। ज्ञानदेवा सार चोजविले।।’’ अशी परंपरा आहे. इथे ही परंपरा कसकशी प्रवाहित झाली ते एकेका शब्दानं कसं सुरेख सांगितलंय. मच्छिंद्रनाथांना ‘मुख्य’ शब्द वापरलाय. मुख्य म्हणजे प्रमुख. प्रमुख हा शब्द मुखापासून आलाय. मानवी देहात मुखाचं महत्त्व फार आहे. एकतर डोळे, कान, नाक, तोंड ही चार महत्त्वाची इंद्रियं या भागात आहेत आणि अन्न खाल्ल्याशिवाय माणसाला जगताच येत नाही. अन्न हे जगण्याचा मुख्य आधार आहे आणि त्यासाठी मुखाला महत्त्व आहेच. तर हा जो मुख्य शिष्य असतो ना तो या मुखासारखा असतो.. मुखियाच म्हणा की!
हृदयेंद्र – तुलसीदासांचा दोहाही आहे ना? ‘मुखिया मुखु सो चाहिए खान पान कहुँ एक। पालइ पोषइ सकल अंग तुलसी सहित बिबेक।।’ मुख जसं एकटंच खातं पण सर्व अवयवांचं पालनपोषण करतं तसा हा मुख्य शिष्य सद्गुरूंचा बोध पचवतोच पण पुढच्या शिष्यांकडे पोहोचवतोही!
अचलदादा – म्हणूनच मच्छिंद्रानं गोरक्षांना बोध केला!  कारण खाणं तसंच बोलणंही तोंडाचंच काम! मग  हा बोधाचा प्रवाह गोरक्षांनी गहिनीनाथांकडे वळवला. गहिनींच्या कृपाप्रसादानं निवृत्तीनाथही सिद्धच झाले. ‘ज्ञानेश्वरी’तच ओवी आहे ना? ‘‘हृदया हृदय एक जालें। ये हृदयींचें ते हृदयीं घातलें। द्वैत न मोडितां केलें। आपणाऐसें अर्जुना।।’’ सद्गुरूंनी आपल्या हृदयात शिष्याचं हृदय मिसळून टाकलं! वर वर पाहता गहिनी आणि निवृत्ती ही दोन रूपं कायम राहिली, पण आतून एकच स्वरूप होतं.. द्वैत न मोडिता केले आपणाऐसे!! सद्गुरू हाच खरा दाता असतो. या निवृत्तीदातारानं काय केलं? पक्षिणी पिल्लाला चोचीतून जसे अन्नकण भरवते ना? तसं या निवृत्तीमायेनं बोधाच्या चोचीतून ज्ञानोबांना ज्ञानाचे कण चोजवले!! सद्गुरुंकडे पाहण्याची ही दृष्टी जोवर कळणार नाही, तोवर हा अभंगही कळणार नाही! सद्गुरुंकडे पाहण्याची माउलींची ही दृष्टी हाच या अभंगाचा प्राण आहे हो!
योगेंद्र – हा अभंग ‘ज्ञानेश्वरी’ पूर्ण झाल्यानंतरचा आहे?
अचलदादा – हो तिकडेच येतोय मी.. तर त्या सद्गुरुंनी आज्ञा केली म्हणून ज्ञानेश्वरी सांगतोय, हा माउलींचा भाव होता. अन्नधान्य बापानंच आणलं, बापानंच जेवण बनवलं, बापानंच ताट वाढलं, पण त्या ताटातला घास आपल्या चिमुकल्या हातानं मूल जेव्हा बापाला भरवतं तेव्हा बापाला कोण आनंद होतो! तसं सारं काही सद्गुरूंचंच आहे. त्यातलाच हा घास मी त्यांना भरवतोय, हा भाव होता माउलींचा! म्हणून पसायदानही कसं विराट आहे पहा! हे सारं झालं तरी भावावेग काही आवरेना. जिथं ज्ञानेश्वरी सांगितली गेली तिथं माउलींसमोरच निवृत्तीनाथही बसले होते. त्यांच्याकडे पाहताना त्यांच्या कृपेच्या जाणिवेनं माउलींचं अंत:करण उचंबळून आलं. डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. तो जो परमात्मा म्हणतात ना तोच माझ्यासमोर बसला आहे हो! या भावावेगात आकाशाकडे हात करीत माउली म्हणाल्या ‘तो’ मग समोर निवृत्तीनाथांकडे हात पसरत म्हणाल्या ‘हा’.. ‘तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा’!!
 चैतन्य प्रेम