आधी शुद्ध परमार्थ उमगला पाहिजे आणि तो उमगायचा तर ज्याचं जगणं हाच शुद्ध परमार्थ आहे अशाचा संग लाभला पाहिजे. तेव्हाचं व्यवधानातूनही खरं अवधान येत जाईल, असं हृदयेंद्र म्हणाला.
ज्ञानेंद्र – पण जसा शुद्ध परमार्थही कळत नाही, तसा शुद्ध पारमार्थिक तरी कुठे कळतो? तेव्हा त्याचा संगही लाभणं कठीण..
हृदयेंद्र – मग अशा वेळी संतांचे अभंग, होऊन गेलेल्या सत्पुरुषांचा बोध, त्यांची चरित्रं हाच सत्संग आहे..
बुवा – पण बरेचदा होतं काय, की लोक गोष्टीसारखी ती पुस्तकं वाचतात.. त्यांचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध तपासत नाहीत. त्यातून काय बोध आपल्याला आचरणात आणला पाहिजे, ते लक्षात घेत नाहीत. त्यामुळे ती पुस्तकं वाचताना तेवढय़ापुरतं बरं वाटतं, आचरणात काही सुधारणा होत नाही. तेव्हा हृदयेंद्र तुमचं बरोबर आहे की अभंग, बोध, चरित्रं, आठवणी यातून उपदेश मिळतो, पण तो समजून तर घेतला पाहिजे? त्यासाठीचा उपाय काय?
योगेंद्र – पूर्वी हृदू जे करायचा त्याचं मला तेव्हाही कौतुक वाटायचं..
बुवा – काय करायचे?
हृदयेंद्र – (संकोचून) तसं काही नाही.. पण मी तेव्हा गोंदवल्यास जात असे आणि रोज रात्री प्रवचनं वाचत असे.. पण मी कोणतंही पान उघडून वाचत असे आणि त्या प्रवचनात प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी  कोणती गोष्ट आहे, हे पाहात असे. त्यातली एखादी गोष्ट मनात पक्की लक्षात ठेवत असे, की ही दुसऱ्या दिवशी आपल्याला आचरणात आणायचीच आहे. मग असं होऊ लागलं की दुसऱ्या दिवशी असा प्रसंग घडत असे की त्यात मी कसं वागावं, याचं अगदी लख्खं मार्गदर्शन आदल्या रात्री वाचलेल्या प्रवचनातून झालंच असे. महाराज मला सांभाळत आहेत, मार्ग दाखवत आहेत, हे तेव्हापासून अगदी जाणवू लागलं. एकदा गंमत झाली. चातुर्मास सुरू होणार होता आणि मी तो पाळायचं ठरवलं..
बुवा – म्हणजे त्याआधी पाळत नव्हतात?
हृदयेंद्र – (ओशाळून) तशा अर्थानं मी तेव्हा धार्मिक नव्हतो किंवा नाहीही.. बरं म्हणायला उपास आणि नेहमीपेक्षा जास्त खायचं, हेदेखील मनाला पटत नाही.
बुवा – (हसत) बरं, मग कसा झाला पहिला चातुर्मास?
हृदयेंद्र – (जुन्या आठवणीत रमत हसून) तेच तर! मी तर ठरवलं, चातुर्मास करायचा. आईलाही सांगितलं. उद्यापासून कांदा-लसूण काही नाही. मग रात्री प्रवचनाचं पुस्तक उघडलं. त्यात चातुर्मासाचंच मार्गदर्शन होतं!
दादासाहेब – वा!
योगेंद्र – (हसून) पण तो चातुर्मास वेगळाच होता बरं का!
कुशाभाऊ – वेगळा म्हंजे?
हृदयेंद्र – श्रीमहाराजांनी लिहिलं होतं.. लोकं ठरवतात की चातुर्मास पाळायचा. मग माझ्या माणसानं चातुर्मास कसा पाळावा? तर आपल्यातला एक दुर्गुण पकडावा. तो चार महिने सोडायचा प्रयत्न करावा. समजा तुम्ही खूप रागावता. तर चार महिने रागावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा. बरं तुम्ही कुठे नोकरीत वरच्या पदावर असाल, तर नोकरांवर रागवावं लागेल. वडील असाल तर मुलांवर रागवावं लागेल. फक्त ते रागावताना राग चेहऱ्यावर असू दे, मनात नको! चातुर्मासात लोकांकडे गेल्यावर त्यांनी काही खायला दिलं तर आपण म्हणतो ना? यात कांदा नाही ना? माझा चातुर्मास आहे! तसं रागाचा प्रसंग आलाच तर मनाला आठवण करून द्यावी की आपला चातुर्मास आहे! (सर्वाचेच चेहरे फुलतात) मग जर असा एखादा दुर्गुण चार महिने सोडता आला, तर तो वर्षभर सोडायचा प्रयत्न करावा. वर्षभर साधलं तर जन्मभर सोडावा! असा चातुर्मास करणाऱ्या माझ्या माणसानं कांदा खाल्ला काय आणि न खाल्ला काय!
नाना – वा! फार वेगळाच बोध आहे हो!
योगेंद्र – आणि गंमत म्हणा की योगायोग म्हणा.. जो कांदा, लसूण अध्यात्मानं वज्र्य ठरवला आहे, असं मानतात त्या कांद्यापासूनच आपला पुढला अभंग सुरू होतो! ‘‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी!!’’
कर्मेद्र – पण बुवा, एकादशीच्या दिवशी हा अभंग वज्र्य नाही ना?
बुवा – (हसतात) अहो जो सदा अखंड एकाच भावदशेत आहे, त्याला वेगळी एकादशी कसली?
चैतन्य प्रेम