आरसा हातात घेतल्यावर आपण आरशाला पाहात नाही, त्यात स्वत:ला पाहातो आणि आपला चेहरा स्वच्छ करतो, त्याप्रमाणे सद्गुरू माझ्याकडे पाहाताना माझं आवरणस्वरूप पाहात नाहीत तर आत्मस्वरूपच पाहातात. त्यात स्वत:लाच पाहातात आणि माझ्यातले दोष दूर करण्याची अखंड प्रक्रिया सुरू करतात! अचलानंद दादांनी ‘रूप पाहता लोचनी। सुख झाले वो साजणी’चा अर्थ आता सद्गुरुंच्या बाजूनं सांगताना आरशाची जी उपमा वापरली ती कशी अगदी मनात पक्की बसली. दादाच सांगू लागले..
अचलदादा – श्रीगोंदवलेकर महाराज कर्नाटकात गेले होते तेव्हा त्यांचे पट्टशिष्य ब्रह्मानंदबुवा हे दिवसाढवळ्या मशाली घेऊन त्यांच्यासमोरून चालत..
कर्मेद्र – दिवसा मशाली कशाला?
अचलदादा – अगदी हाच अचंबा लोकांना वाटावा आणि त्यांनी घरातून बाहेर यावं! त्यातल्या कुणातरी भाग्यवंतावर श्रीमहाराजांची अमृतदृष्टी पडावी आणि त्याचं कल्याण व्हावं, असा ब्रह्मानंदबुवांचा दिव्य हेतू होता! असं विलक्षण पाहाणं असतं सद्गुरूंचं.. मी म्हटलं ना? ते स्वत:लाच पाहातात.. हृदय तुला आठवतं का? गुरुजी महाराष्ट्रात आले होते आणि आपण त्यांच्या बरोबर होतो..
हृदयेंद्र – हो.. पण नक्की कोणत्या दौऱ्यात?
अचलदादा – आम्ही तेव्हा एका लहानशा गावात होतो. सकाळी गुरुजींचं स्नान झालं आणि ते त्रिपुण्ड गंध लावण्यासाठी आरसा घेऊन बसले आम्ही पंधरा-वीसजण त्यांच्याभोवती कोंडाळं करून बसलो होतो. दृष्टी त्यांच्यावरून हटतच नव्हती जणू. आरशात पाहातानाच मंदस्मित करत हसत गुरुजींनी विचारलं, ‘‘तुम्ही एवढे सगळेजण एकटक माझ्याकडे पाहात आहात, मला कसं वाटत असेल?’’ आम्ही सर्वचजण हसलो. खरंच कुणी आपल्याकडे रोखून पाहात बसलं तर आपल्याला कसं वाटेल? आमच्या मनात असेच साधे विचार येत होते, तोच गुरुजींनी पुन्हा विचारलं, ‘‘मला तुम्ही कसे दिसता माहीत आहे?’’ आम्ही म्हणालो, ‘‘नाही..’’ ते उद्गारले, ‘‘मी तुम्हाला रामरूपातच पाहातो!’’
हृदयेंद्र – हो.. मला तेव्हा गोंदवलेकर महाराजांचंच वाक्य आठवलं की अनुग्रह देतानादेखील मी शिष्याला रामरुपातच पाहातो!
अचलदादा – तर असं असतं त्यांचं पाहणं!
हृदयेंद्र – मला गोंदवलेकर महाराजांचीच गोष्ट आठवते.. पुण्यात एक म्हातारा राहात होता. जुन्या वळणाचा आणि मोठा ताठय़ाचा मानी माणूस होता तो. म्हातारपणी परिस्थितीपायी त्याला लेकीच्या घरी राहायला जावं लागलं. लेकीचं सासर श्रीमंत होतं. तेव्हा महाराज पुण्यात येणार होते. या म्हाताऱ्याचा जावई महाराजांचा भक्त होता. महाराज त्यांच्याकडेही जाणार होते. त्यानं सासरेबुवांना सांगितलं, उद्या माझे सद्गुरू घरी येणार आहेत. तुम्हीही दर्शनाच्यावेळी थांबा. म्हातारा म्हणाला, ‘‘मी काही अशा साधूबिधूंना मानत नाही. मी हवंतर समोर येईन, पण नमस्कार वगैरे काही करणार नाही.’’ जावयानंही काहीशा नाराजीनं होकार भरला. दुसऱ्या दिवशी महाराज आले. सर्वानी दर्शन घेतलं. दूरवर म्हातारा उभाच होता. जावयानं सांगितलं, ‘‘हे माझे सासरेबुवा.’’ सासरेबुवांनी उभ्या-उभ्याच रिकाम्या मनानं हात जोडला. श्रीमहाराज त्यांच्याकडे पाहात उद्गारले, ‘‘अरे वा! परत तुम्हाला पाहण्याचा योग आला!!’’ सासरेबुवा स्पष्टपणे म्हणाले, ‘‘तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी आयुष्यात कधीच कोणा बाबा-बुवाच्या दर्शनाला गेलो नाही.’’ श्रीमहाराज हसून म्हणाले, ‘‘अहो असं काय करता? तुम्ही लहानपणी तुमच्या आजीबरोबर गोंदवल्याला आला नव्हता का? तुम्ही मुलं-मुलं अंगणात खेळत होतात. तोच चेंडू आत येऊन पडला. तिथे मी लोकांशी बोलत होतो, तुम्ही तो चेंडू घ्यायला आत आलात. तुमची-माझी नजरानजर झाली. मग तुम्ही गेलात..’’ सासरेबुवांना तो प्रसंग अगदी लख्ख आठवला. त्यांना फार आश्चर्य वाटलं. इतक्या वर्षांत आपलं रंग-रूप बदललं असूनही अवघ्या काही क्षणांच्या नजरभेटीतूनही महाराजांनी आपल्याला ओळखलं, याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यानंतर ते आठवडाभरच जगले, पण अगदी महाराजमय आणि नाममय झाले होते!
अचलदादा – असं ज्याचं पाहणं आहे, त्या सद्गुरूंनी मला पाहिल्यावर जगणं सुखमय का होणार नाही?
चैतन्य प्रेम