News Flash

३२. लाभ आणि हानी

कर्मेद्रच्या बोलण्यातून त्याचा खटय़ाळ स्वभाव उघड होत होता. सर्वचजण हसले, पण डॉक्टरसाहेब गंभीर झाले. म्हणाले..

| February 16, 2015 12:11 pm

कर्मेद्रच्या बोलण्यातून त्याचा खटय़ाळ स्वभाव उघड होत होता. सर्वचजण हसले, पण डॉक्टरसाहेब गंभीर झाले. म्हणाले..
डॉ. नरेंद्र – माझ्याकडे एका खेडय़ातून एक रुग्ण आला होता. त्याची दृष्टी जात चालली होती. त्याला दहा टक्केच दिसत होतं आणि आहे ती दृष्टीही जाईल, असं त्याला दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. मोठय़ा शहरातल्या डॉक्टरला दाखवावं, म्हणून त्याचा गरीब भाऊ त्याला घेऊन आला होता. आमच्या रुग्णालयातली माझ्या ओळखीच्या नेत्रतज्ज्ञांची तपासणीही तेच सांगत होती. दृष्टी जाण्याची अनेक कारणं असू शकतात. तुम्ही सर्वचजण जाणता, हे ज्ञानतंतू आहेत. काय पाहिलं, ते मेंदूला कळवणारा ऑप्टिक हा जो ज्ञानतंतू आहे त्याला जंतूसंसर्ग होऊ शकतो, ती दबू शकते किंवा त्यात खपलीसारखा भाग उत्पन्न होऊन तो वाढत जाऊ शकतो. तो जसजसा वाढतो तसतशी दृष्टी अधू होत माणूस पूर्ण दृष्टीहीन होऊ शकतो. यातल्या अनेक गोष्टी आणि अनेकदा या पलीकडील अद्याप ज्ञात न झालेल्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. त्याचा भाऊ माझ्यापाशी हमसाहमशी रडला. मी त्याला म्हणालो, ‘‘भाऊ, जे त्यांना झालंय ना ते उद्या मला-तुम्हाला कुणालाही होऊ शकतं. लाखात एखाद्याला होतं, पण तो एक आपणही असू शकतो..’’ त्याच्या पाठीवर थोपटत मी म्हणालो, ‘‘आपला एखादा हात तुटला तर कृत्रिम बसवायला लाखो रुपये खर्च होतात. प्रत्येक अवयवाची हीच गोष्ट आहे. प्रत्येक अवयव निकामी झाला तर त्या ठिकाणी कृत्रिम अवयव बसवायला कित्येक लाखांचा खर्च येतो, पण हे शरीर आपल्याला किती लाखांना मिळालं? दमडी तरी मोजली का हो आपण? मग हे शरीर, या क्षमता आपल्याला फुकटात मिळाल्या, म्हणून आपल्याला त्याची पर्वा नाही का? जी गोष्ट फुकटात मिळते तिची किंमत नसते म्हणतात ना! आज तुम्ही धूम्रपान करता, तंबाखू खाता. त्यातले विषारी घटक काही अंतराळात अदृश्य होत नाहीत. ते तुमच्याच शरीरात जमा होतात, तुमच्याच शरीरावर परिणाम करतात. फार घातक परिणाम करतात. या आठ-दहा रुपयांच्या व्यसनानं भविष्यकाळातला लाखो रुपयांचा खर्च का निर्माण करता?’’ (कर्मेद्र नि:शब्द झाला. डॉक्टर प्रेमानं म्हणाले) पहा तुम्हाला अनेकांनी अनेकवार सांगितलं असेल हे. जेवढं दुसरा समजावतो ना तेवढी तल्लफ वाढते! हेका वाढतो!! मी तुमच्यापेक्षा वयानं मोठा आहे म्हणून नाही, शरीराशी माझा तुमच्यापेक्षा जास्तवेळा संबंध येतो म्हणून सांगतो की लाखमोलाच्या देहाला कवडीमोलाचं करून टाकणारं कोणतंही व्यसन हे वाईटच. ते सोडा.. (मग डॉक्टरसाहेब हृदयेंद्रकडे वळून म्हणाले) काय हो हृदयेंद्रजी एखाद्या संतानं नाही का असा अभंग लिहिला? अगदी व्यसनावर नसेल, पण या शरीरातल्या एखाद्या क्षमतेचं बोट पकडून परमात्म्याकडे नेणारी वाट दाखवली असेलच की कुणी..
हृदयेंद्र – आता तरी आठवत नाही..
डॉ. नरेंद्र – पण आठवलं की नक्की घ्या तो अभंग आणि मलाही कळवा..
ज्ञानेंद्र – डॉक्टरसाहेब आमच्या गप्पांत तुम्हीही आलात तर आम्हाला आवडेल..
डॉ. नरेंद्र – मलाही आवडलं असतं. या कर्मेद्रंची प्रथम ओळख झाली. त्याच्याकडून तुम्हा तिघांबद्दल कळलं आणि मला वाटलं, यांना भेटलं पाहिजे! पण पहा, मी निघालोय नेपाळला. पुन्हा कुठे जाईन, काही सांगता येत नाही. म्हणून मनात असूनही भेटता येणं कठीण..
योगेंद्र – पण नेपाळला काय आहे?
डॉ. नरेंद्र – मी आणि माझ्या पत्नीनं ठरवलं होतं की वयाची पन्नाशी पार केली की खाजगी व्यवसाय बंद करून सामाजिक कार्यात झोकून द्यायचं. त्यानुसार सार्क देशांत आरोग्य आणि शिक्षणाबाबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या कामासाठी आम्ही निघालो आहोत. तीन वर्ष आम्ही स्त्रीसबलीकरण, स्त्रीभ्रूणहत्या रोखणं, मुलींना किमान दहावीपर्यंत शिकवणं, व्यावसायिक प्रशिक्षण देणं, स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देणं, आरोग्यसेविका म्हणून प्रशिक्षित करणं; अशी बरीच काम सुरू होत आहेत. नेपाळमधील जनकपूर हे सीतामातेचं जन्मस्थान. तिथून या कार्याला सुरुवात होत आहे.
कर्मेद्र – ग्रेट.. तुमच्या क्षमतांचा फार सुरेख वापर आहे हा.
डॉ. नरेंद्र – तसा वापर तुम्ही कराल तेव्हा मला आवडेल!
चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2015 12:11 pm

Web Title: abhangdhara gain and loss
Next Stories
1 ३१. ज्ञानाग्नी आणि धूर..
2 अभंगधारा – ३०. आत्मप्रकाश
3 २९. खूण
Just Now!
X