आपली मूळस्थिती मुक्त हीच आहे, असं हृदयेंद्रनं सांगितलं आणि सखारामनं अभ्यासिकेत प्रवेश करीत भोजनाची तयारी झाल्याची वर्दी दिली.
कर्मेद्र – चला सुटलो बुवा! मी तरी माझ्या मूळस्थितीला परतलो.. मुक्त झालो तुमच्या चर्चेतून..
योगेंद्र – (हसत) मुक्त होणं काही एवढं सोपं नाही! एवढय़ात बरा मुक्त होशील आमच्या तावडीतून!
चौघं मित्र खाली उतरले. टेबलावर भोजनाची मांडामांड सुरू होती तोवर दिवाणखान्यातील ऐसपैस चौकोनी कोचांवर चौघं विसावले. भल्यामोठय़ा फिशटँकमधील माशांची सळसळही मनोहारी वाटत होती. त्यांना खाद्य टाकून ज्ञानेंद्रनं सीडी लावली. मालिनी राजूरकर यांच्या आत्मतृप्तीनं ओथंबलेल्या धीरगंभीर अन् आत्मीय स्वरातला ‘चाल पहचानी’ हा टप्पा खमाज सुरू झाला.  त्यातील ताना आणि स्वरातील फेक यांच्याशी त्या माशांच्या सळसळीची जणू लय जुळली होती! त्या माशांकडे हृदयेंद्र एकटक पहात होता.
ज्ञानेंद्र – काय खणखणीत आवाज आहे मालिनीताईंचा! माझे काका अजमेरला मेयो कॉलेजमध्ये शिकवायचे. कॉलेजच्या आवारात प्रासादतुल्य बंगलीत रहायचे. लहानपणी सुटीत जायचो. कॉलेज कसलं, स्वतंत्र गावच होतं ते. अजमेरची एक बाजू पूर्ण या कॉलेजनं व्यापलेली. दुसऱ्या बाजूला वस्ती. मालिनीताई अजमेरच्याच. आता वाटतं, थोडी समज असती तर त्यांच्या घरावरून कितीदा चकरा मारल्या असत्या. कानावर त्यांच्या रियाझाचे संस्कार झाले असते..
हृदयेंद्र – या माशांची सळसळ पाहा, जणू त्यांनाही रागदारी समजत्ये! (क्षणभर थांबून) हे मासे पाण्याशिवाय राहातात का? नाही! पाणी आणि मासा यांचं घनिष्ठ नातं आहे. अगदी तसाच माणूस आनंदाशिवाय राहू शकत नाही! पाण्याबाहेर काढलेली मासळी जशी तडफडते, तसाच तर माणूस आनंदावस्थेच्या बाहेर तडफडत असतो. म्हणूनच तर म्हणतात मुक्त हीच आपली मूळ स्थिती आहे..
कर्मेद्र – मग मुक्त हीच जर मूळ स्थिती आहे, तर माणूस मुक्त नाही, मुक्ती मिळवण्यासाठीच माणसाचा जन्म आहे, ही ओरड कशाला?
योगेंद्र – माणूस मुक्त नाही, हे तर स्पष्टच आहे. साध्या आपल्या जीवनाकडे पाहा ना. काळ-वेळ, परिस्थितीच्या किती मर्यादा असतात. आर्थिक, सामाजिक परिस्थितीच्या किती मर्यादा असतात.
हृदयेंद्र – एकवेळ या मर्यादा, ही बंधनं परवडली. पण आमचं मनच अनंत भ्रामक गोष्टींत अडकून असतं. आम्हीच कित्येक भ्रामक बंधनं, अडथळे निर्माण केले असतात. ते तोडणं फार कठीण जातं मनाला. एकवेळ बाहेरची बंधन तोडता येतील, मनानं स्वत: निर्माण केलेली बंधनं तोडणं फार कठीण!
योगेंद्र – ज्ञानेश्वरीत ती ओवी आहे ना? मोठमोठी लाकडं पोखरणारा भुंगा कमळाच्या पाकळ्या मिटल्या की त्या पाकळ्या चिरून बाहेर पडत नाही, त्यातच अडकून राहातो! तसं बाहेर मोठय़ा धैर्यानं अनेक संकटं पेलणारा माणूस आपलेपणानं जिथं गुंतला असतो तिथं फार असहाय्य असतो! मनानंच तो अवलंबून असतो आणि त्या आधाराशिवाय जगण्याची त्याला कल्पनाही करवत नाही..
ज्ञानेंद्र – निसर्गदत्त महाराज म्हणत ना, मनानं ज्याची निर्मिती केली आहे, त्याचा नाश मनानंच होऊ शकतो! अर्थात ते एवढं सोपंही नसतं..
हृदयेंद्र – म्हणून तर साधना आहे. अभ्यास आहे.
कर्मेद्र – ध्येय एकच आहे, तर साधना वेगवेगळ्या का?
हृदयेंद्र – बाह्य़ांगानं त्या वेगवेगळ्या आहेत. मंदिरात जायला अनेक दरवाजे असतात. अखेरीस गाभाऱ्यात एकाच दारानं जावं लागतं ना? तसं आहे हे. वरकरणी साधना वेगवेगळ्या वाटतात. अखेरीस सर्व काही एकच आहे, एकासाठीच आहे, हे उमगतं. सर्वच साधनांची परिपूर्ती संपूर्ण समर्पणात असते. नदी, नाले, ओढे, ओहोळ जोवर समुद्रात विलीन होत नाहीत, तोवर वेगवेगळे भासतात. एकदा सर्व काही समुद्रार्पण झालं की वेगळेपण उरतंच कुठे? समुद्रातलं कोणतं पाणी कोणत्या नदीचं आहे, कसं ओळखावं? ‘मी’ आणि ‘माझे’चीच जपणूक सुरू असते तेव्हाच द्वैत आहे. द्वंद्व आहे. थोडंसंच मिळवू पाहाणारा, टिकवू पाहाणारा जेव्हा त्या थोडय़ाचा त्याग करतो तेव्हा सगळं काही त्याचंच तर होतं!
कर्मेद्र – काय डेंजरस विचार आहे!