नाही म्हटलं तरी गप्पांना वेगळंच वळण लागलं खरं. योगेंद्र मात्र जणू या चर्चेत नसल्यागत वेगळ्याच तंद्रीत होता. कर्मेद्रच्या शब्दप्रहारानं हृदयेंद्र दुखावला होता तर ज्ञानेंद्र अंतर्मुख झाला होता. थिजलेल्या शब्दांत जीव ओतत तो म्हणाला..
ज्ञानेंद्र – खरं आहे तुझं म्हणणं..
कर्मेद्र – तुम्हाला राग आला असेल तर सॉरी..
ज्ञानेंद्र – नाही राग नाही.. आम्हाला आमच्याच ज्ञानपरंपरेची चाड उरलेली नाही, हेच खरं..
हृदयेंद्र – मला ‘तृषार्त पथिक’ या पुस्तकाची आठवण झाली. जिप्सी जीवन जगत असलेला कुठला कोण अमेरिकी तरुण.. धबधब्याखाली जलक्रीडेत दंग असताना ‘भारतात जा’ असा स्वर त्याला ऐकू आला.. जगाच्या नकाशातून त्यानं भारताचा ठिपका शोधून काढला.. वाहनानं, बोटीनं आणि अनेकदा तर गाववस्त्या, वाळवंट, जंगलं पायी तुडवतदेखील त्यानं वाघा सीमा गाठली.. त्याचं बाह्य़ जिप्सी रूप आणि जवळ असलेली तुटपुंजी रक्कम पाहून भारतीय चौकीतल्या अधिकाऱ्याने, ‘आम्हाला आणखी एका भिकाऱ्याची गरज नाही,’ असं सुनावून त्याला हाकललं. संध्याकाळपर्यंत तो वारंवार चौकीवर येऊन भारतात येऊ देण्याची विनवणी करीत होता.. त्याच्या मनात आलं की, या पवित्र भूमीवर पाऊल ठेवता येऊ नये इतका मी पापी आहे! हा अधिकारी नव्हे, माझं पूर्वपापच या पवित्र भूमीवर पाऊल ठेवण्यापासून मला रोखत आहे! या आपल्या देशाच्या भूमीचं हे पावित्र्य आम्हाला आजवर एकदा तरी जाणवलं का, असा प्रश्न हा प्रसंग वाचताच माझ्या मनात आला.. याच भूमीवर आम्ही किती नंगानाच घालतो! अध्यात्मज्ञानाच्या गप्पा खूप आहेत, पण खरी तृप्ती कुणालाच नाही.. का व्हावं असं?
ज्ञानेंद्र – खरंच आहे.. त्या तृप्तीसाठी तरी खऱ्या साधकानं प्रामाणिक कळकळीनं प्रयत्न केलेच पाहिजेत.. त्याची सुरुवात ज्ञान आपल्या जगण्यात आणण्याच्या अभ्यासाने झाली पाहिजे. तेव्हा अंत:करणरूपी कावळ्याचे पाय शाब्दिक ज्ञानानं नव्हे तर आचरणसिद्ध ज्ञानानं मढवले पाहिजेत.. ज्याला उंच व्हायचं आहे, उन्नत व्हायचं आहे, त्याचे पाय मातीचे राहाता कामा नयेत.. त्याचे पाय म्हणजे त्याचं चालणंही योग्य वाटेनं, योग्य दिशेनं आणि योग्य प्रकारचंच असलं पाहिजे, हेच माउली ‘उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानं मढीनं पाऊ’ या शब्दांतून सांगत आहेत..
हृदयेंद्र – हो रामकृष्ण परमहंसही म्हणायचे ना? गिधाड उडतं खूप उंच पण त्याचं लक्ष असतं जमिनीवर पडलेल्या सडक्या प्रेतांकडे.. तसं नुसतं आभासी उन्नत होऊन काय लाभ? लक्ष्य कुठे आहे, काय आहे आणि त्या दिशेनं प्रामाणिक वाटचाल होत आहे का, यालाच महत्त्व आहे! योगा तू गप्प का?
योगेंद्र – अरे मी काय सांगणार? मी तुमचं बोलणं नीटसं ऐकतच नव्हतो..
ज्ञानेंद्र – अरे असं काय करतोस? पैलतीरावरून कोहम्ची हाक आली, जाग आली आता सोहम्चा तीर गाठायचा, आत्मज्ञान प्राप्त करायचं तर पायांची म्हणजे चालण्याची दिशाही त्या लक्ष्याशी सुसंगत आणि सन्मुखच असली पाहिजे.. अंत:करणावर शुद्ध ज्ञानाचे संस्कार होत राहिले पाहिजेत.. पाहुणे पंढरीराऊ घरा कै येती, म्हणजे तो परमात्मा कसा प्राप्त होईल, या प्रश्नाचं हे उत्तर आहे, प्रथम ज्ञानानुरूप आचरण सुरू कर!
योगेंद्र – ते कळलं रे पण तुझ्या केन मंत्रांच्या अनुषंगानं मी जे बोललो होतो ना, त्याच विचारात गर्क होतो..
हृदयेंद्र – काय बोलला होतास तू?
योगेंद्र – ज्ञानेंद्र म्हणाला ना की ते परब्रह्म या देहानं जाणता येत नाही. खरं आहे ते. पण या इंद्रियांशिवाय दुसरं साधन तरी या घडीला कुठे आहे? सुरुवातीला लक्षात नव्हतं आलं, पण या अभंगाचा साधनेच्या अंगानं विचार करू लागलो तेव्हा वेगळाच अर्थ जाणवू लागला.. तो सांगायला शब्द मात्र सुचत नाहीत..
कर्मेद्र – बाबा रे, सिद्धीवहिनींसारखं शब्दांशिवाय तुझ्या भावना जाणून घेण्याची कला आम्हाला अवगत नाही!
हृदयेंद्र – का रे त्याला घराची आठवण करून देतोस?
कर्मेद्र – घराची कितीही आठवण आली तरी या यात्रेत ‘घरवापसी’ नाही बरं का!
योगेंद्र – (हसून) थांबा रे.. अगदी मुळापासून सुरू करतो..
ज्ञानेंद्र – की अगदी मूलाधारापासून सुरू करतोस?
चैतन्य प्रेम