अचलानंद दादा बोलत होते, तेव्हा सर्वाच्या डोळ्यासमोर नेवाशाच्या मंदिरातलं ते वातावरण उभं राहिलं. दादा बोलत होते..
अचलदादा – तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।। बरवा म्हणजे सोपा. बरवा म्हणजे चांगला. बरवा म्हणजे सहजप्राप्य असा. त्या विठ्ठलाला, त्या माधवाला आम्ही साक्षात पाहू शकत नाही, पण या सद्गुरूरूपी परमात्म्याला आम्ही या डोळ्यांनी पाहू शकतो. त्या विठ्ठलाशी आम्ही आमची सुखदु:खं बोलू शकत नाही, किंवा ती सांगितली तरी त्याचे धीराचे शब्द ऐकू शकत नाही, या सद्गुरूरूपी विठ्ठलाशी मात्र बोलू शकतो, त्यांचं ऐकू शकतो.. या विठ्ठलाची प्रत्यक्ष सेवा करू शकतो.
योगेंद्र – किती खरं आहे! आणि कसं आहे पहा, अभंगाचा हा चरण ध्रुवपदासारखा आपण म्हणतोही, पण त्याचा खरा अर्थच जाणवत नसल्यानं या अभंगाचा गूढार्थही जाणवत नाही! एकदा परमात्मरूपी सद्गुरू हाच आमच्यासाठी सहज आहे, हे ठसलं की अभंगाचा दादा सांगतात तो अर्थ सहज लक्षात येईल. आता लक्षात आलं, ‘रूप पाहता लोचनी’मध्ये समोर बसलेल्या सद्गुरू निवृत्तीनाथांचंच रूप अभिप्रेत आहे.
ज्ञानेंद्र – आम्ही मात्र आजवर हा विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग आहे, हे मानत होतो.
हृदयेंद्र – दादा, तुमच्या तोंडून संपूर्ण अभंगाचा अर्थ ऐकण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अचलदादा – पण खरंच ऐकायची इच्छा आहे का?
योगेंद्र – हो तर! मनाचे कान करून ऐकतो आहोत आम्ही!! (दादा हसतात)
हृदयेंद्र – का हो हसलात?
अचलदादा – नाही मला एकदम जाणवलं, दुसरा बोलत असताना, त्याच्या जवळ असूनही आपल्याला त्याचं बोलणं ऐकू येत नाही.. आपण म्हणतो ना, अरे मी ते मधलंच वाक्य नीटसं ऐकलं नाही, अरे मला ऐकूच नाही आलं.. कारण तो बोलत असतानाही आमचं मन दुसरीकडेच भरकटलं असतं. मनाचे जेव्हा कान होतात ना, तेव्हाच खरं ऐकलं जातं. (हृदयेंद्रचा चेहरा उजळला) काय हृदय जाणवलंय का काही?
हृदयेंद्र – हो तर.. मनाचे कान करून जसं खरं पूर्णपणे ऐकलं जातं तसं मनाच्या डोळ्यांनी पाहिलं तरच हे रूप पूर्ण सुखाची अनुभूती देतं!!
कर्मेद्र – मनाचे डोळे?
हृदयेंद्र – म्हणजे समोर अनंत गोष्टी ‘दिसत’ असल्या तरी मन जर तिकडे नसेल तर त्या ‘पाहिल्या’च जात नाहीत.
योगेंद्र – ओ हो!
हृदयेंद्र – आई लेकराकडे मनाच्याच तर डोळ्यांनी पाहते म्हणून तिच्या मनाला लेकराशिवाय दुसरा विचारच नसतो. घरात माणसं जमली आहेत. गप्पा रंगल्या आहेत. माउली स्वयंपाकघरात आवराआवरीत गुंतली आहे. तोच पाळण्यातलं मूल अर्धवट जागं होतं क्षीण स्वरांत रडतं, कुणालाही ते जाणवत नाही, पण स्वयंपाकघरात भांडय़ाकुंडय़ांच्या आवाजातही आईला ते ऐकू येतं. ती धावतच पाळण्यापाशी येते. मुलाला थोपटते. कारण ती कुठेही असली तरी तिचं मन आणि त्या मनापाठोपाठ तिचे डोळे, तिचे कान लेकरापाशीच तर असतात!
अचलदादा – अगदी सुंदर.. अशा मनाच्या, हृदयाच्या, बुद्धीच्या, चित्ताच्या डोळ्यांना पाहण्याचा विषय केवळ सद्गुरू झाला तर काय स्थिती होते, तिचंच तर वर्णन या अभंगात आहे..
कर्मेद्र – दादा सांगूनच टाका ना पटकन अर्थ..
ज्ञानेंद्र – (हसत) का रे? तुला का बाबा एवढी उत्सुकता?
कर्मेद्र – (चेहऱ्यावर लहान मुलासारखे केविलवाणे भाव आणत) दादा सॉरी हं.. पण मला खोटं बोलता येत नाही..
योगेंद्र – अरे हे तरी खरं कुठे आहे?
कर्मेद्र – म्हणजे नेहमीच खोटं बोलता येत नाही, बस्स? अहो मगाचपासून त्या भज्यांकडे नजर वारंवार खेचली जात आहे. कधी एकदा ती खातो, असं झालंय..
अचलदादा – (हसतात, पण क्षणार्धात गंभीर होत) तुम्हीही राग मानू नका. ती भजी पाहून मन तिकडे वेधलं गेलं मग मंदिरातली महाराजांच्या डोळ्यांतली करुणार्तता पाहून नामाला लागावंस लगेच का वाटलं नाही हो? कारण तुम्ही त्यांना खरं पाहिलंच नाहीत!
चैतन्य प्रेम

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”