बोगदा असलेला घाटरस्ता पाहताना सर्वचजण मुग्ध झाले होते. योगेंद्रनं विचारलं..

योगेंद्र – डॉक्टरसाहेब, या दोन डोळ्यांच्या भुवयांच्यामध्ये दोन छोटे गोळे एकावर एक उभे आहेत, ते कसले?
डॉ. नरेंद्र – याला हायपोथलामो पिटय़ुटरी अॅक्सीस म्हणतात. एक आहे पिटय़ुटरी, दुसरा आहे हायपोथलामस. पूर्ण शरीरावर या पिटय़ुटरीचं नियमन आहे. शरीरावर म्हणजे शरीराच्या तापमानावरसुद्धा बरं का! हा सर्व मोठय़ा मेंदूचाच भाग आहे.
योगेंद्र – या दोन गोलकांच्या खालून येऊन उजव्या आणि डाव्या भुवईवर आणि दोन्ही भुवयांच्या मधल्या टोकांना स्पर्श करीत डोईवर या मुख्य नाडय़ा जात आहेत आणि याच डहाळीसारख्या भासत आहेत, नाही का?
डॉ. नरेंद्र – अगदी खरं आहे. तुम्ही जर हे त्रिमितिचित्र पाहिलंत ना, तर या डहाळ्या अगदी स्पष्ट जाणवतील.
योगेंद्र – या डहाळ्यांमध्ये आहे आम्रफळ! पिटय़ुटरी! मनाचं केंद्र!! या आज्ञाचक्रापर्यंत पोहोचणं म्हणजे ‘आंबया डहाळी फळे चुंबी रसाळी’ हाच शकुन आहे.. आजिचेरे काळी शकुन सांगे! यापुढे सहस्रार चक्र! तिथे तर जीवाशिवाचं ऐक्य.. परमस्थिती.. तो केवळ जाणण्याचा, अनुभवण्याचा भाग. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात, ‘‘ज्ञानदेव म्हणे जाणिवे ये खुणें। भेटती पंढरीराणे शकुन सांगे।।’’
ज्ञानेंद्र – वा! फार छान! हृदू मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर आणि अनाहत चक्रांपर्यंत भक्तीमार्गाच्या अनुषंगानंही तू अर्थ सांगितलास. आता विशुद्ध आणि आज्ञाचक्राबद्दल विशेषत: ‘आंबया डहाळी’बद्दल काही गूढार्थ भासतो का?
हृदयेंद्र – तो तर अगदी तीव्रपणे आतून जाणवतोय..
ज्ञानेंद्र – मग सांग ना!
सर्वाच्याच नजरा हृदयेंद्रकडे खिळल्या. डॉक्टरसाहेबांनी काढलेलं रेखाचित्र पुन्हा एकवार न्याहाळत आणि योगेंद्रच्या बोलण्याचा संदर्भ घेत हृदयेंद्र बोलू लागला..
हृदयेंद्र – अनाहतपर्यंतचा अर्थ जसा जाणवला तसा सांगितला. ज्याच्या जीवनात सद्गुरूबोध पूर्ण उतरला त्याच्या शरीरात म्हणजे ‘कायीं’ तो परमात्मा म्हणजे ‘विठू’ प्रकटणार आहे म्हणजे ‘येईल’ ही सत्य गोष्ट अर्थात ‘सत्य गोठी’ माउली सांगत आहेत. मग योगेंद्र म्हणतो, तेही अगदी समर्पक आहे. इथे विशुद्ध चक्राचा घाटरस्ता आहे! ‘विशुद्ध’ या शब्दाचा थोडा खोलवर विचार करा. ‘शुद्ध’पेक्षाही यात आणखी काहीतरी भरीव आहे.. विशुद्ध भक्ती हीच खरी भक्ती आहे. हा घाट पार करता आला तर आज्ञाचक्रात प्रवेश! नाहीतर पूर्ण घसरण!! इथवर आलेली गाडी पार खोल दरीत, मूलाधारात कोसळण्याचा आणि तिथूनही खाली घसरण्याचाच धोका सर्वात मोठा.. पर्वत वेगानं चढून जाता येत नाही, पर्वतमाथ्यावर जायला तासभर लागत असेल, पण तिथून पाय सटकला तर पायथ्याशी कोसळायला दहा मिनिटंही लागणार नाहीत!
ज्ञानेंद्र – ओहो.. ही घसरण आहे तरी कसली?
हृदयेंद्र – अशी कल्पना करा की मातीचा एक उंच रांजण आहे. त्यावर काचेचा वर्तुळाकार घडा पालथा आहे. त्या घडय़ाला माणसाच्या दोन डोळ्यांसारखी छीद्रही आहेत. आता त्या रांजणाच्या आत, तळाशी एक ज्योत पेटवली आहे. तर तिचा प्रकाश काही त्याच तीव्रतेनं वरच्या घडय़ातून बाहेर फाकणार नाही. मातीच्या रांजणातून तर तो कणभरही बाहेर पडणार नाही. आता असा विचार करा, की ती ज्योत वर आणण्याची सोय आतमध्येच आहे. मग ती ज्योत जसजशी वर येईल तसतसा तो काचेचा पारदर्शक घडा प्रकाशमान होऊ लागेल! ज्योत त्या घडय़ात आल्यावर तर तो अधिकच दैदिप्यमान दिसेल. अगदी त्याप्रमाणे माणसातही आत्मज्ञानाची ज्योत अर्थात आत्मशक्ती जागी होऊन उध्र्वगामी होत गेली आणि विशुद्धचक्रापर्यंत म्हणजे कंठापर्यंत आली की साधकाच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज विलसू लागतं. त्याच्या दृष्टीतही तेजस्वीपणा येतो. मुख्य म्हणजे त्याचं बोलणं लोकांना आकर्षून घेऊ लागतं! किती मोठा धोका आहे, विचार करा! अशा साधकाच्या मनात लोकेषणा उफाळण्याचा धोका असतो.
कर्मेद्र – लोकेषणा? म्हणजे?
हृदयेंद्र – लोकेषणा म्हणजे लोकांमध्ये नावलौकिक व्हावा, लोकांकडून मानसन्मान मिळत रहावा, अशी इषणा म्हणजे आस, इच्छा. ही फार घातक असते. तिच्यापाठोपाठ भौतिक संपदेची ओढ येतेच.
चैतन्य प्रेम