आत्मज्ञान्याचं वर्णन म्हणून हृदयेंद्रनं ‘खांद्या वाहोनी पोतडी। उतरला पैलथडी।।’ हा नरहरी महाराज यांच्या अभंगातला चरण उच्चारला तेव्हा योगेंद्रनं कुतूहलानं विचारलं..
योगेंद्र – यात आत्मज्ञानाचा उल्लेख तुला कुठे आढळला?
हृदयेंद्र – बाकी सगळं ज्ञान, सगळी भक्ती, सगळा योग, सगळा प्रपंच, सगळी धडपड ही ऐलथडीच तर आहे! यातच जीव भिरभिरत आहे आणि त्याच्या खांद्यावर पोतडी आहे ती प्रारब्धाची! सगळी हिणकस गोष्टींनी भरलेली!
दादासाहेब – म्हणजे जगात आपल्याला जे ज्ञानी लोक दिसतात.. मी इथे अध्यात्मज्ञानाची गोष्ट करतोय बरं.. तर हे ज्ञानी लोक.. कितीतरी योगीही दिसतात.. कितीतरी देवभक्तही दिसतात.. हे सारे पैलथडीच जाण्याचा प्रयत्न करीत नसतात का?
हृदयेंद्र – सुरुवात तर त्यासाठीच होते की दादासाहेब.. पण अखेपर्यंत पोहोचण्यासाठी जी ध्येयासक्ती सुरुवातीला होती ती टिकते का, हा खरा प्रश्न आहे.. थोडंस साधलं नाही की लोक स्वत:ला सिद्ध मानायला लागतात! श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे ना? काहीच साधलं नसताना कुणीतरी झाल्यासारखं वाटू लागणं, यासारखी घातक गोष्ट नाही..
योगेंद्र – आत्मघातच आहे तो!
हृदयेंद्र – अगदी खरं.. आत्मघातच आहे हा.. मग साधनेत जी सुरुवातीला तळमळ होती तीसुद्धा ओसरते, कारण आपण सिद्ध झालोच, हा भाव येतो ना? मग मोठमोठे आश्रम उभे राहातात, त्यांचे कोटय़वधींचे व्यवहार सुरू होतात.. जिथे पैसा खेळू लागतो तिथे गर्दी जमतेच आणि मग द्वेष, मत्सर, असूया, मानापमान हे सारं काही सुरू होतं.. मग मूळची जी आध्यात्मिक प्रेरणा होती तीच गाडली जाते.. भगवंताच्या भक्तीसाठी काही लागत नाही.. उलट आहे ते गमवावंच लागतं.. मग हा सारा व्याप ऐलथडीचाच प्रपंच वेगवेगळ्या रूपात वाढवत राहातो, मग पैलथडी जाण्याची आठवण तरी कुणाला उरणार?
नाना – पण सगळेच काय वाईट असतात का? अहो धर्माच्या रक्षणासाठी संघटनांची गरज आहेच..  
हृदयेंद्र – सगळेच वाईट आहेत किंवा सगळ्याच संघटना वाईट असतील, असं नाही, पण जिथे गर्दी आणि पैसा खेळतो तिथे वाईटाकडे घसरण्याचा धोका जास्त असतो.. आणि खरं सांगू का? जो धर्म हजारो र्वष टिकून आहे, त्याला वाचविण्यासाठी संस्था, संघटनांची गरज नाही.. धर्माच्या नावावर संस्था, संघटनांनी टिकावं हवं तर! धर्म टिकविण्यासाठी खरी गरज आहे माणसाचं माणूसपण टिकण्याची. त्यासाठी मोहभ्रमग्रस्त माणसानं आतून बदलण्याची आणि घडण्याची. हा बदल, ही घडण केवळ सद्गुरू बोधाच्या आधारानेच साधू शकते. त्यासाठीच्या प्रेरणेचं बीज तेच माझ्यात रोवतात, तेच विकसित करतात आणि त्याआड येणारे अडथळे दूरही तेच करतात.. सद्गुरू-शिष्य ही परंपरा अनादि आहे.. अध्यात्म म्हणजे आत्मज्ञानाची अखंड जाणीव आणि त्यानुसारचं आचरण.. जो स्वत: आत्मज्ञानी आहे तोच माझ्यातलं आत्मज्ञान जागृत करू शकतो.. जो स्वत: अज्ञानात अखंड बुडाला आहे, त्याच्या अखंड सहवासात राहून मला आत्मज्ञानाची जाणीव कशी होणार? जो ऐलथडीच रमलेला आहे आणि ऐलथडीचाच व्याप वाढवत आहे तो मला पैलथडी कसा नेणार?
योगेंद्र – समजा मला असा आत्मज्ञानी सद्गुरू मिळाला तरी तेवढय़ानं मी पैलथडी पोहोचेन काय?
हृदयेंद्र – त्याच्या सांगण्याप्रमाणे वागत गेलो तर पोहोचेनच.  
नाना – पण तसं वागण्याच्या आड काय येतं?
हृदयेंद्र – आसक्ती! ज्ञान्या निसर्गदत्त महाराजांचे शब्द आठवतात? ‘‘आसक्ती धैर्याचा नाश करते. दाता द्यायला तयारच असतो, पण घेणाराच कुणी मिळत नाही.’’ सद्गुरू तर केशर विकायला बसले आहेत, पण सारे हिंग-जिऱ्याचे गिऱ्हाईक! पैलथडी जायची नुसती शाब्दिक इच्छा! प्रत्यक्षात सारा सोस, सारी धडपड ऐलथडीचं बस्तान पक्कं बसवण्यासाठीच असते.. तेव्हा ऐलथडीचीच आसक्ती रोमारोमांत आहे. ही आसक्तीच, पैलथडीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकण्यासाठी जे आंतरिक धैर्य लागतं त्याच
ा नाश करत असते! मग पैलथडी डोळे लावल्यासारखे भासवत मुखी राम म्हणताना प्रत्यक्षात त्या आंतरिक धैर्यावर मोहासक्तीच्या सुरीचेच वार सुरू असतात!
चैतन्य प्रेम