गप्पा किती उत्कंठापूर्ण वळणावर आल्या होत्या.. त्यामुळे ‘मथुरा येतंय,’ हे ऐकताच डॉक्टरांचा सहवास संपणार आणि या गप्पांमध्ये खंड पडणार, या विचारानं योगेंद्र, ज्ञानेंद्र आणि हृदयेंद्रला किचिंत धक्काही बसला.. त्यांच्या चेहऱ्यावरील आर्ततेची छटा जाणून डॉक्टर म्हणाले..
डॉ. नरेंद्र – मला आधी माझ्या डब्यात गेलं पाहिजे.. स्थानकावर उतरल्यावर भेटेन तुम्हाला.. आमचं काही इथल्या हॉटेलचं वगैरे रिझव्‍‌र्हेशन. आपलं आरक्षण झालेलं नाही..
योगेंद्र – आमचंही नाही! फक्त एका परिचयाच्या मिठाईवाल्यानं त्याच्या मित्राला कळवलंय.. तो स्थानकात येणार आहे.. त्यानंच चांगल्याशा हॉटेलात सोय केली असावी.. तुमचीही होऊ शकेल..
डॉ. नरेंद्र – वा! मग फारच छान. एकाच ठिकाणी राहाता आलं, तर रात्र आपलीच आहे!
कर्मेद्रवगळता तिघांनाही ही चर्चा पूर्ण होणार, या विचारानं आनंद झाला. कर्मेद्रलाही काही अगदीच वाईट वाटलं, असं नाही. शरीरावर बोलून बोलून कितीसं बोलणार? फार तर एखाद तास. ते सहन केलं की अवांतर गप्पांना डॉक्टरसाहेब फार छान माणूस आहेत, असा त्याचा ओझरत्या ओळखीतला अनुभव होता. त्यामुळे एकतर छान गप्पा मारता येतील, नाहीतर ताणून देता येईल, असा आशेचा एक किरणही कर्मेद्रच्या मनात उगवला होता. डॉक्टरसाहेब त्यांच्या डब्याकडे गेले. चौघांनी आपापल्या बॅगा भराभर काढल्या. रिकाम्या पिशवीत घडवंचीच्या मेजावरचे फराळाचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्या टाकल्या. कर्मेद्रनं चारही बर्थवरचा कोपरान् कोपरा तपासला आणि काही राहिलेलं नाही, याची खातरजमा केली. चौघांनीही आपापले मोबाइल, चार्जर वगैरे घेतल्याचीही खात्री करून घेतली. मग चौघे दाराशी आले. गाडी अलगद स्थानकात शिरू लागली. नजरेसमोर सरत असलेल्या फलाटाकडे हृदयेंद्र पाहात होता.. ‘मथुरा जंक्शन’ अशी वळणदार हिंदी, इंग्रजी आणि ऊर्दूतली पाटी.. पाठोपाठ एक फलक ‘पुण्यभूमी मथुरा में आपका स्वागत हैं। वृंदावन धाम तथा गोवर्धन पर्बत जाने के लिए यहाँ उतरिए।’ ही पाटी वाचताच हृदयेंद्रचं मन भावतन्मय झालं.. फलाटावर पाऊल ठेवताना भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र जन्मभूमीवर आपण पाऊल ठेवत आहोत, या भावनेनं तो गहिवरला. स्थानकाबाहेर पडताच चिमूटभर मातीही त्यानं मस्तकी लावली. तोच, ‘भाईसाब ऑटो’.. ‘भाईसाब तांगा’.. ‘भाईसाब अच्छा होटल चाहिए क्या?’ अशा प्रश्नांचा कलकलाट करत कितीतरीजण घोंगावू लागले. ‘नहीं भाई, कही नहीं जाना है!’ असं कातावून सांगत ज्ञानेंद्रनं त्यांना हाकारलं तोच योगेंद्रचं लक्ष त्यांच्याच दिशेनं येत असलेल्या एका काहीशा स्थूल, मध्यमवयीन गृहस्थाकडे गेलं. काही तासांपूर्वीच दूरध्वनीवरून बोलणं झालेल्या माणसानं स्वत:चं जे वर्णन केलं होतं त्याच्याशी यांचं रूप आणि पेहराव जुळला होताच. योगेंद्र उजळत्या चेहऱ्यानं म्हणाला..
योगेंद्र – अगरवालजी?
अगरवालजी – जी! आ गए आप चारों! भाईसाबने भी थोडीही देर पहले कॉल किया था। आप कुछ चिंता न करें, सब प्रबंध हो गया है..
योगेंद्र – एक छोटीसी अडचन है..
अगरवालजी – नि:संकोच होकर कहिए.. क्या सेवा कर सकता हूँ आप की?
योगेंद्रनं सोबत डॉक्टर आणि त्यांची माणसं असल्याचं सांगितलं. ‘अतिथीसेवे’त भर पडल्याने अगरवालजी आनंदलेच. ‘आप भाईसाब के दोस्त हो, तो मेरे भी तो दोस्तही हो गये..’ असं सांगून त्यांनी दिलासाच दिला. तोच डॉक्टरसाहेबही तिघांसह आले.. अगरवालजींनी रिक्षांना हाक दिली..
संध्याकाळ झाली होती. गार वारं सुटलं होतं. तीन रिक्षा स्थानकाबाहेरच्या सवारी अड्डय़ावरून निघाल्या. रस्त्यावर वर्दळही नव्हती. ‘राधाकृष्ण विश्रामधामा’च्या फुलवेलीच्या कमानीशी रिक्षा थबकल्या. त्या कमानीखालून प्रवेश करताना वेलीवरचं नाजूक पुष्प डोक्यावर पडलं आणि हृदयेंद्रला हा मुरलीधराचा आशीर्वादच वाटला. त्यानं मोठय़ा प्रेमानं मथुराभेटीची ही नाजूक खूण अलगद खिशात ठेवली.. आता रात्र होईल, त्यामुळे जन्मभूमीचं दर्शन उद्याच होणार, हे ठरलंच होतं.. ही रात्र मात्र नव्या विचारांनी उजळणार होती, या जाणिवेनं हृदयेंद्रचं मन आनंदलं होतं..