गप्पा तात्त्विक अंगानं अशा उंचीवर गेल्या होत्या की ही रात्र लवकर संपूच नये, असं वाटत होतं! खरंच जे अध्यात्म आपण वाचतो, ऐकतो, सांगतो ते अनुभवत का नाही? त्याची गोडी अनुभवात का येत नाही? पोथ्यांपासून अनंत आध्यात्मिक ग्रंथांत जे वाचलं जातं, सद्गुरू आणि सत्पुरुषांच्या तोंडून जे ऐकलं जातं आणि चर्चेची संधी मिळताच हिरिरीनं जे दुसऱ्याला सांगितलं जातं, ते जगरहाटीच्या झंझावातात जरा प्रतिकूल परिस्थिती उद्भवताच निसटून का जातं? हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात उमटला. परमात्म्याचा साक्षात्कार आणि त्याच्या अखंड कृपेची अनुभूती ही हृदयेंद्रच्या मते जीवनाची खरी प्राप्ती, तर परमशक्तीची अखंड अनुभूती हे योगेंद्रच्या दृष्टीनं आणि परमतत्त्वाची ज्ञानानुभूती हे ज्ञानेंद्रच्या दृष्टीनं जीवनध्येय होतं. त्या ध्येयाकडे वाटचाल, हीच तर साधना! ‘‘पण साधना करायला लागल्यापासून जसजसा एकेक दिवस, एकेक महिना, एकेक वर्ष मागे पडू लागतं तसतसं आपण ध्येयाच्या जवळ आलो आहोत, असं जाणवतं का?’’ हाच प्रश्न उपस्थित करीत ज्ञानेंद्रनं विचारलं..
ज्ञानेंद्र – परमात्म्याचा साक्षात्कार, आत्मशक्ती जागी होणं किंवा परमतत्त्वाची अनुभूती हे सारं कुठे होतं?
हृदयेंद्र – हृदयातच नाही का! गोंदवलेकर महाराजही म्हणतात, ‘मला तुमच्या हृदयात तुम्ही जागाच ठेवलेली नाहीत!’ आपलं हृदय सांसारिक गोष्टींनी इतकं व्यापलं आहे की त्यांना जागाच नाही.. आणि म्हणूनच मी मघाशी काय म्हटलं? तीन चक्रांनंतर उंबरठा येतो..
योगेंद्र – मलाही तेव्हाच वाटलं की, हा उंबरठा कोणता?
हृदयेंद्र – घरात जायला उंबरठा ओलांडावाच लागतो ना?
कर्मेद्र – आता हे घर कोणतं?
हृदयेंद्र – सद्गुरूंचं हृदय!
कर्मेद्र – झालं! प्रत्येकाचं हृदय काय वेगवेगळं असतं का?
ज्ञानेंद्र – अरे तू शब्दश: घेऊ नकोस..
हृदयेंद्र- आपल्या हृदयात ज्याला स्थान असतं, त्याच्यासाठीच आपण सर्व काही करतो ना?
कर्मेद्र – हो..
हृदयेंद्र – तसं सद्गुरूंच्या हृदयात मी प्रवेश करू शकलो तरच ‘त्या हृदयीचे या हृदयी’ येणार ना? तेव्हाच ज्या परमतत्त्वाच्या परम अनुभवात ते सदा निमग्न असतात त्याची गोडी मला अनुभवता येईल ना?
योगेंद्र – व्वा! पण हा प्रवेश कसा करायचा? हा उंबरठा कसला?
हृदयेंद्र – नीट लक्षात घ्या.. पहिल्या तीन चक्रांनंतर हा उंबरठा आहे आणि मग थेट चौथं अनाहत चक्र हे हृदयातच आहे! पहिली तिन्ही चक्रं ही वासनेच्या पकडीत आहेत. त्या वासनेची तृप्ती जगात होते, असं मला वाटत असतं. त्यामुळे त्या वासनेच्या ओढीनं मी त्या जगाचा गुलाम झालो आहे.. वासनापूर्तीचा जो जो आधार मला भासतो त्याच्या सेवेत मी दिवसरात्र रत आहे.. आता ज्ञानेश्वरीच्या ओवीचा विराट अर्थ मला कळतोय..
ज्ञानेंद्र – कोणती रे ओवी?
हृदयेंद्र – ते ज्ञानाचा कुरुठा। तेथ सेवा हाचि दारवंठा! सद्गुरू हे आत्मज्ञानाचं घर आहेत. सद्गुरूंचं हृदय आत्मज्ञानानं पूर्ण आहे. तिथे पूर्ण परमानंद आहे. त्या घरात प्रवेश करायचा तर सेवा हाच उंबरठा आहे. या घराचा उंबरठा झिजवायचा तर सेवेत तन-मन आणि भौतिकाच्या ओढीचं धनही झिजवावं लागेल! जर मी जगाच्या सेवेत रत असेन तर जगातच भरकटत राहीन.. त्यांच्या सेवेत राहिलो तर तिन्ही चक्रांनंतरच्या चौथ्या अनाहत चक्रात प्रवेश करीन.. हृदय शाश्वत अशा आत्मज्ञानासाठी मोकळं करीन.. या हृदयात त्यांचंच प्रेम, त्यांचीच प्रतिमा, त्यांचीच जाणीव अखंड राहील.
ज्ञानेंद्र – वा! फार छान.. पण एक शंका मनात येते.. आपल्या हृदयात सद्गुरूंना स्थान दिलं पाहिजे, असं आपण म्हणतो.. प्रेमाचं प्रतीक म्हणून पाश्चिमात्य जगही हृदयालाच प्रतीकरूपात पाहतं.. ‘ते हृदय कसे आईचे’ असं विचारत कवीही मातृहृदयाची थोरवी गातात.. तेव्हा प्रेम, वात्सल्य, करुणा अशा भावनांचा आपण हृदयाशी संबंध जोडतो.. डॉक्टरसाहेब सहा चक्रांच्या जागी शरीरशास्त्रानुसार काय आहे, हे तुम्ही सांगितलंत.. आता प्रश्न असा की अध्यात्म काय, प्रेमाचं जग काय, हृदयाचा जो संबंध भावनिकतेशी जोडला जातो त्यात शरीरशास्त्रदृष्टय़ा तथ्य आहे का?
या प्रश्नावर डॉक्टरसाहेब काय सांगतात, हे ऐकायला सर्वाचीच हृदयं कशी आतुर झाली!
चैतन्य प्रेम