रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी! सद्गुरू शिष्याला पाहातात आणि त्यांच्या त्या प्रेरक, परिवर्तक अमृतदृष्टीनं भक्ताचं जीवन सुखमय होतं.. या मुद्दय़ानं अचलदादा आणि हृदयेंद्रच्या मानससरोवरात अनेक विचारतरंग उमटत होते.. पुण्यातल्या म्हाताऱ्याची गोष्टही मनाला भिडणारी होतीच.. हृदयेंद्र म्हणाला..
हृदयेंद्र – तेव्हा तर श्रीमहाराज समोर होते.. पण ते देहात नसूनही त्यांची अमृतदृष्टी कसं अलौकिक कार्य करीत असते, त्याचा एक प्रसंग आठवला.. हा प्रसंग चैतन्य प्रेम यांच्या ‘चैतन्य चिंतन’ या सदरातला आहे बरं का.. एकदा लेखकाच्या परिचयातला आध्यात्मिक प्रवृत्तीचा एक वाहनचालक मोठय़ा उत्साहानं भेटीला आला आणि त्यानं हा प्रसंग सांगितला. हा वाहनचालक मोटारदुरुस्तीसाठी एका झोपडपट्टीवजा वस्तीत गेला होता. दुरुस्तीचं काम वेळखाऊ होतं आणि म्हणून सहज चहा प्यायला तो एका टपरीत शिरला. टपरी तशी कळकटच होती. टेबलं-खुच्र्या जुनाटच होती. कोपऱ्यात एक गल्लेवजा उंच स्टूल होतं त्यामागे खुर्चीवर एक शिडशिडीत बांध्याचा काळसर वर्णाचा माणूस बसला होता. तोच मालक असावा, हे त्याच्या अविर्भावावरून समजत होतं. चहा पिता पिता या वाहनचालकाचं लक्ष गल्ल्याच्या वर लटकत असलेल्या लहानशा देव्हाऱ्याकडे गेलं. या टपरीला साजेसाच तो साधासा देव्हारा होता. तो पाहाताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण या देव्हाऱ्यात देवीदेवतांच्या तसबिरी नव्हत्या. केवळ एकच साधीशी तसबीर होती ती होती, गोंदवलेकर महाराजांची! या वाहन चालकाची लेखकाच्या घरी ये-जा होती त्यामुळे महाराजांचं हिंदीतील चरित्र आणि प्रवचनंही त्यानं वाचली होती. चहा पिऊन झाल्यावर पैसे देताना त्याच्या मनातली उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. त्यानं विचारलं, ‘‘तुम्ही गोंदवल्याला जाता का?’’ त्या माणसानं मद्रासी वळणाच्या उच्चारात विचारलं, ‘‘हे गोंदवले काय आहे?’’ वाहन चालकाला आश्चर्यच वाटलं. तो म्हणाला, ‘‘तुम्ही गोंदवले किंवा गोंदवलेकर महाराजांचं नाव ऐकलेलं नाही?’’ त्या मालकानं निर्विकारपणे ‘‘नाही’’ सांगितलं! वाहन चालकानं आश्चर्यानं विचारलं, ‘‘मग ही तसबीर इथे कोणी लावली?’’ तसबिरीकडे प्रेमानं नजर टाकत मालक म्हणाला, ‘‘मी लावली!’’ आता तर आश्चर्याचा कडेलोटच झाला. ज्यांना तुम्ही ओळखतही नाही, त्यांची तसबीर तरी कशी काय आली? या तसबिरीच्या आगमनाची कहाणी मोठी भावविलक्षण होती! या मालकानं सांगितलं, ‘‘लहानपणापासून मी रस्त्यावरच वाढलो. आई-बापाचाच जिथं पत्ता नाही, तिथं घरदार तरी कुठून असणार? मिळालं तर खावं, नाही मिळालं तर चोरावं, वाटलं तर आंघोळ करावी, वाटलं तर खरखरीत अंगानं घामट कपडय़ानंच दिवस काढावेत.. मग दारू, जुगार, चरस, गांजा, मटका सर्वकाही सोबत आलंच.. जीवन असं रसातळाला गेलेलं. जगण्याला दिशा नव्हती. मरत नव्हतो म्हणून जगत होतो.. दारुच्या आहारी इतका गेलो की रस्त्यात कुठंही झिंगून पडत असे.. एकदा असाच रस्त्याच्या कडेला पडलो होतो. सकाळी लोकांची आणि वाहनांची ये-जा सुरू झाली आणि त्या आवाजानं जाग आली. उठून बसलो आणि समोरच्या झाडाकडे लक्ष गेलं. त्या झाडाच्या पायाशी ही तसबिर कोणीतरी टाकून गेलं होतं.. मी ती हातात घेतली.. हीच ती तसबीर! या तसबिरीतल्या या बाबानं माझ्याकडे अशा करुणेनं आणि दयेनं पाहिलं की असं उभ्या आयुष्यात माझ्याकडे कोणी पाहिलं नव्हतं! माझं हृदय पिळवटून निघालं.. या जगात माझं कोणीतरी आहे, या भावनेनं मला रडू आलं.. मग हा फोटो माझ्याबरोबर राहू लागला.. मग मी दारू पिऊन आलो की या बाबाला ते आवडलेलं नाही, असं फोटोत पाहाताच वाटायचं.. मग दारु सुटली.. चोऱ्या सुटल्या.. मटका सुटला.. याच्याशिवाय होतंच कोण हो माझं? सगळं सुटलं.. मी चहाचा धंदा शिकलो. तोच आता करतोय..’’ वाहनचालकही भारावून म्हणाला, ‘‘बाबा रे, सर्व काही खरं, पण ही यांची जागा नाही. त्यांना जरा चांगल्या जागी ठेव..’’ त्यावर मालक हसून म्हणाला, ‘‘ते मला माहीत नाही.. जिथे मी आहे, तिथे हे असणारच.. जिथे हे आहेत, तिथे मी असणारच..’’
अचलदादा – काय अद्भुत आहे हो! बघा कर्मेद्रजी ‘निर्जीव’ फोटोतूनही अशी अमृतदृष्टी पाझरते बरं!!
चैतन्य प्रेम