टाळ्या काय वाजवतोयंस? आपली चर्चा संपलेली नाही अजून किंवा या टाळ्यांमुळे ती थांबणारही नाही, असं हृदयेंद्रनं हसतच सुनावलं. कर्मेद्र म्हणाला..
कर्मेद्र – या टाळ्या तुमच्या बौद्धिक चलाखीला आहेत! ग्रेट आहात!!
ज्ञानेंद्र – बौद्धिक चलाखी?
कर्मेद्र – पूर्वी महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा असायची, आठवते? एका विषयाच्या बाजूनं आधी पाच मिनिटं बोलायचं मग त्याच्याच विरोधात पाच मिनिटं बोलायचं. जो असं दोन्ही बाजूंनी उत्तम बोलू शकतो, त्या दुतोंडय़ाला पुरस्कार मिळायचा! (सगळेच हसतात) तसं चाललंय तुमचं..
हृदयेंद्र – काय दुतोंडीपणा केला रे?
कर्मेद्र – मी जेव्हा म्हणतो ना की लोक गेले खड्डय़ात मी कसंही करून सुख मिळवणारच तेव्हा तुम्ही ओरडता की समाजाच्या दु:खाचं भान ठेवलंच पाहिजे. मी जेव्हा सामाजिक दु:खाबद्दल बोलतो तेव्हा तुम्ही लगेच नव्वद अंशात गिरकी घेऊन सांगता की आधी दु:खातून व्यक्तीनं मुक्त झालं पाहिजे.
हृदयेंद्र – तू माझं बोलणं नीट ऐकतच नाहीस कर्मू. दु:खातून नव्हे, दु:खाच्या प्रभावातून व्यक्तिनं मुक्त झालं पाहिजे, असं म्हटलं मी..
कर्मेद्र – पण दु:ख आणि त्याचा प्रभाव या काय दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? प्रभाव आहे म्हणूनच तर दु:खाची जाणीव होते ना? पुन्हा प्रत्येक व्यक्तीचं दु:ख वेगवेगळंच असणार ना?
हृदयेंद्र – दु:ख वेगवेगळं असलं तरी सर्व दु:खाचं सर्वसाधारपणे एकसमान कारण असतं.. न होता मनासारिखे दु:ख मोठे! आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत, हेच दु:खाचं मोठं कारण आहे आणि जीवनात दु:ख असूच नये, क्षणोक्षणी सुखच वाटय़ाला यावं, ही अवास्तव अपेक्षाच तर गोष्टी मनासारख्या न घडण्यामागचं कारण आहे!
ज्ञानेंद्र – निसर्गदत्त महाराजही म्हणत, गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, हे दु:खाचं कारण आहे की मुळात त्या गोष्टी मनात आहेत, हेच कारण आहे!
कर्मेद्र – म्हणजे जीवनात अपार दु:खं आहेत, यातना आहेत तरी त्यांची जाणीवच नसल्यानं मी कायम सुखात राहीन, हे सांगणं कुणाच्या तरी जगण्यात आलंय का? मी पोटदुखीनं हैराण आहे आणि डॉक्टर जर मला म्हणाला की, बाबा रे पोट हाच भ्रम आहे. पोटाची जाणीव विसर मग पोटदुखी उरलीच कुठे? तर मला तर दुसरा डॉक्टर पहावा लागेलच, पण या डॉक्टरलाही डोक्याच्या डॉक्टरकडे पाठवावं लागेल..
योगेंद्र – (हसत) कर्मू तुलाही डोकं आहे रे.. अधेमधे असे बिनतोड युक्तीवाद करून त्याची जाणीवही करून देतोस.. (कर्मेद्र त्याच्या पाठीत गुद्दा मारतो)
ज्ञानेंद्र – देहव्याधींमुळे होणारं दु:ख जाणवल्याशिवाय राहात नाहीच, पण त्यावर उपायही असतोच ना? पण हृदू म्हणतो त्याप्रमाणे दु:ख असूच नये, या हट्टातून पदोपदी जे मानसिक दु:ख वाटय़ाला येत असतं, त्यावर उपाय काय?
कर्मेद्र – मानसिक दु:ख तात्पुरतं दूर होईल, पण ते कायमचं कधीच दूर होणार नाही. सुख हवं, ही मनाची कायमची मागणी आहे आणि त्यात मला काहीच गैर वाटत नाही. वरकरणी जीवन दु:खानं भरलं असताना त्यात कोणताही बदल झाला नाही तरी त्यातच स्वत:ला सुखी समजण्याची कल्पना मला तरी भ्रामक वाटते.
अचलदादा – अहो, पण ते निश्चितच शक्य आहे. त्याचाच तर उपाय माउली सांगत आहेत! त्यासाठीचा खरा मार्ग, खरा आधार दाखवत आहेत!!
कर्मेद्र – पण जिथे आधार आला तिथे तो गमावण्याची आणि निराधार होण्याची भीतीही नाही का?
अचलदादा – अहो भौतिकात ते शक्य आहे. कारण आमचे आधारही आमच्यासारखेच अशाश्वत, संकुचित, स्वार्थकेंद्रित असतात. मग एक आधार गमावला तर दुसरा शोधण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आपण धडपडतो. पण अखेरीस सर्वच आधार आपल्यासारखे अशाश्वत नसतात का? जो शाश्वत आहे त्याचाच आधार शाश्वत समाधान, शाश्वत निश्िंचती देऊ शकतो.
कर्मेद्र – असा आधार कोणता?
अचलदादा – सद्गुरू.. त्यांची अव्यभिचारी भक्ती! जो शाश्वत आहे, नित्य आहे त्याचाच आधार अशाश्वताचं, अनित्याचं दु:खं दूर करू शकतो.
-चैतन्य प्रेम