देशातल्या महानगरांमध्ये सर्वाधिक मृत्यू अपघातांमुळे होतात, ही वस्तुस्थिती म्हणजे महानगरांमधील दु:स्थितीचे परिणाम आहेत. मुंबईसारख्या महानगरात मृत पावणाऱ्यांच्या एकूण संख्येत उपनगरीय रेल्वे अपघातात मृत पावणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. त्या खालोखाल हृदयविकाराने मृत होणाऱ्यांची संख्या आहे. याचा अर्थ नैसर्गिक मृत्यूपेक्षाही अपघाती मृत्यू अधिक प्रमाणात होतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो या संस्थेच्या पाहणीत आढळून आलेली ही मुंबईतील स्थिती देशातील अनेक महानगरांमध्ये अशीच आहे आणि झपाटय़ाने होत असलेल्या नागरीकरणामुळे ती सर्वत्र वेगाने पसरते आहे. शहरांकडे धावणाऱ्या सर्वानाच कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याची जी घाई असते, त्यामुळे असे अपघात घडतात. शहरांमधील वैद्यकीय सुविधा कितीही चांगल्या असल्या, तरीही अपघातच इतके भयावह होतात, की त्यामध्ये जागेवरच मृत्यूला निमंत्रण मिळते. नागरीकरणामुळे येणारे ताणतणाव हृदयविकाराचे कारण ठरतात, हे तर यापूर्वीही अनेक पाहण्यांमध्ये आढळून आले आहे. जगण्यासाठीची धावपळ आणि त्यातून उद्भवणारे आजार एका बाजूला आणि या धावपळीमुळे येणाऱ्या संकटात थेट मृत्यूलाच कवटाळणे दुसऱ्या बाजूला असे हे चित्र देशातील नागरीकरणाचे विपरीत परिणाम दर्शवणारे आहे. २०१२ या एकाच वर्षांत मुंबईत रेल्वे अपघातात मृत पावलेल्यांची संख्या ७,६६३ आहे. हृदयविकाराने निधन झालेल्यांची संख्या ९६३ असून हे प्रमाण साडेबारा टक्के आहे. रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात जीव गमावणाऱ्यांचा क्रमांक त्यानंतर लागतो. इमारती पडून होणाऱ्या दुर्घटना, बुडून किंवा वाहून जाणे, गॅस सिलिंडरचा स्फोट, उंचावरून पडणे, औद्योगिक अपघात, आग, दारूसारखे व्यसन, विषबाधा यांसारख्या अनेक कारणांमुळे माणसाला मृत्यू येतो. या कारणांमध्ये अपघात सर्वाधिक नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढतात, हे अधिक धोकादायक आहे. देशातील एकूण अपघातांमध्ये ५३ महानगरांमधील अपघातांचे प्रमाण पंधरा टक्केअसेल, तर हा विकास कोणासाठी आहे, असाच प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. या ५३ शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक पहिला येणे निश्चितच भूषणावह नाही. केवळ ट्रक अपघातात मरण पावलेल्यांचे प्रमाण गाझियाबाद शहरात सर्वाधिक असल्याचे याच पाहणीत आढळून आले आहे. मुंबईसारख्या शहरात उपनगरीय रेल्वे हे कामावर वा अन्य कोणत्याही ठिकाणी जाण्याचे अतिशय महत्त्वाचे साधन आहे.  रस्ते वाहतुकीला पडणाऱ्या मर्यादा आणि वाहतुकीच्या ताणामुळे होणारी कोंडी यामुळे रेल्वेलाच प्राधान्य मिळते. देशातील सर्व राज्यांमध्ये रस्त्यावरील अपघातांचे सर्वाधिक प्रमाण तामिळनाडूमध्ये आहे. त्या राज्याने या क्षेत्रातील आपला पहिला क्रमांक गेली दहा वर्षे टिकवून ठेवला आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. सुरक्षित सार्वजनिक वाहतूक आणि रस्त्यांवरील सुरक्षितता याबाबत कोणतीच दूरदृष्टी न दाखवल्याने नागरीकरणामुळे अपघाती निधन ही एक अपरिहार्य आणि अटळ गोष्ट बनते आहे. हे चित्र बदलायचे, तर त्यासाठी सर्वच पातळ्यांवर सुरक्षिततेचे उपाय योजणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती आणि व्यावहारिक शहाणपण यांचाच अभाव आहे.