आपला प्रपंच प्रारब्धाच्या अदृश्य चौकटीत सुरू आहे. त्यात प्रयत्न करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण ते प्रयत्नही याच प्रपंचाच्या चौकटीतच होतात. त्यांना काळाचंही बंधन आहे. ही गोष्ट स्पष्ट होण्यासाठी सोपं उदाहरण पाहू. आपण पत्ते खेळायला बसतो तेव्हा हातात जी पानं असतात त्यांनीच खेळावं लागतं. हातात पानं काहीही आली, अगदी वाईट पानं आली तरी आपले प्रयत्न डाव जिंकण्यासाठीच सुरू असतात. शेवटच्या क्षणापर्यंत आपण जिंकण्याच्याच ईष्र्येने प्रयत्नपूर्वक खेळत असतो. या प्रयत्नांचा आधार काय असतो? तर दुसऱ्याची खेळी चुकेल किंवा आपले आडाखे बरोबर ठरतील आणि किमान शेवटच्या खेळीत आपल्याकडील पानांनी बाजी मारता येईल, असाच आपला होरा असतो. तेव्हा पत्ते खेळताना हातातल्याच पानांनी ते खेळावे लागतात. प्रपंचात आपण प्रयत्न करतो ते प्रयत्न प्राप्त परिस्थिती आणि प्राप्त प्रापंचिक स्थिती याच आधारावर करावे लागतात. पत्त्यांत जिंकण्याचा प्रयत्न डाव संपेपर्यंतच करावा लागतो. आपल्या प्रयत्नांनाही वेळेची मर्यादा असते. तेव्हा आपल्या प्रारब्धानुरूप आपल्या वाटय़ाला प्रपंच आला आहे, याचा अर्थ प्रयत्नांचं महत्त्व नाकारणं नाही. फक्त प्रयत्नांची चौकटही आपण लक्षात घेतली पाहिजे. आता जिथं प्रारब्ध आहे तिथं काही तरी बेतलेलं आहेच. हे बेतणं कशावर अवलंबून आहे? काही माणसं जणू आपली देणेकरी असल्यासारखी आपल्याला वेळीअवेळी मदत का करीत राहतात आणि काही माणसांसाठी आयुष्यभर आपण खस्ता का खात राहतो? याचं कारण प्रारब्ध. देणं-घेणं! आता तुम्हाला वाटेल की जीवनाकडे पाहण्याचा हा रूक्ष आणि नकारात्मक दृष्टिकोन आहे. तर तसं नाही. आपल्या वाटय़ाला जे जीवन आलं आहे त्याची चौकट फक्त मांडली जात आहे. त्या चौकटीत रंग भरण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहेच की! तर जीवन हे देणं-घेणंच आहे. आयुष्यभर आपण एकतर दुसऱ्यांना सुख देतो किंवा दुसऱ्यांकडून सुख घेतो, आयुष्यभर आपण एकतर दुसऱ्यांना दुख देतो किंवा दुसऱ्यांचं दुखंही घेतो, आयुष्यभर आपण कधी मान देतो, कधी घेतो, कधी अपमानाचा अनुभव दुसऱ्यांना देतो, कधी दुसऱ्यांकडून अपमानाचा अनुभव घेतो.. सारं काही जणू देणं-घेणंच आहे. या देण्याघेण्याला आपण रोजच्या जगात म्हणतो व्यवहार! तेव्हा आपला प्रपंच म्हणजे एक तऱ्हेचा व्यवहारच आहे. इथं श्रीगोंदवलेकर महाराजांचं दुसरं बोधवचन समोर येतं.. ‘‘व्यवहारात व्यसन म्हणून काही करू नये. जेथे ज्याची जितकी जरूर तितकेच केले पाहिजे. भगवंताचे व्यसन बिघडवीत नाही. बाकी कोणतेही व्यसन घात करते. व्यसन नेहमी वाढत्या प्रमाणावर असते. आजच्यापेक्षा उद्याचे प्रमाण अधिक हवेसे असते. ते घात करते.’’ (बोधवचने, क्र. १२४) आपला प्रपंच हा अखंड सुरू असलेला एक व्यवहारच असेल आणि त्यातील देणं-घेणं प्रारब्धानुसार आखलेलं असेल तर त्यात व्यसनाचा प्रश्न येतोच कुठे? कर्तव्य केलं की झालं! पण इथेच मोठी मेख आहे. प्रपंच व्यवहारमात्र असला तरी आपल्याला त्याचं पक्कं व्यसन जडलं आहे