‘डीम्ड कन्व्हेयन्सच्या कागदपत्रांचे जड झाले ओझे’  हे वृत्त (लोकसत्ता, ८ जाने.) वाचले. लोकशाहीत लोकाग्रहास्तव एखादी योजना राबवण्याची वेळ आली तर ती योजना जाहीर करायची पण तिचा प्रत्यक्ष लाभ मात्र मिळूच नये, अशा बेताने कशी ‘पाचर’ ठोकावयाची याचे उत्तम उदाहरण म्हणून या मानीव अभिहस्तांतर योजनेकडे पाहावे!
 अभिहस्तांतर प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी पाहता सरकारचे ज्ञान बांधकाम क्षेत्राबाबत अधिकच तोकडे वाटते. अर्थात एवढी ‘आदर्श यंत्रणा’ हाताशी असताना या पेक्षा वेगळी जनता अपेक्षाच कशी करू शकते. हा प्रकार म्हणजे पदवीदान समारंभासाठी येताना जन्म दाखला, शाळेत प्रवेश घेतल्याचा दाखला, पहिली ते दहावीपर्यंतचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायातीचा रहिवासी दाखला, कॉलेजमध्ये प्रत्येक तासाला हजर असल्याचे सर्व विषय शिक्षकांचे प्रमाणपत्र, कॉपी न केल्याचे प्रमाणपत्र, अभ्यास केल्याची हमी देणारे प्रतिज्ञापत्र.. अशी सर्व कागदपत्रे घेऊन येण्याची अट घालण्यासारखे होय. या सर्वाची पूर्तता केल्यानंतरदेखील त्या प्रमाणपत्राचा मालकी हक्क विद्यापीठाकडेच राहील अशी अट टाकण्यासारखा हा प्रकार होय .
जमीन अकृषी असल्याचा आदेश ते मुद्रांक शुल्क भरल्याची पावती यादरम्यान होणाऱ्या सर्व प्रक्रियांची कागदपत्रे मागण्याचे प्रयोजन काय, हे अनाकलनीय आहे. विविध टप्प्यांवर विविध यंत्रणा जमीन अकृषी करणे, इमारतीचा आराखडा मंजूर करणे ही कामे जबाबदारीनेच करत नसतात का? ती सारी कामे सरकारी यंत्रणांनी केल्यावर इमारतीचे बांधकाम सुरू होते आणि ते आवश्यक सोयींसह पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतरच ओसी दिली जाते. असे असताना सर्वच कागदपत्रांची मागणी करणे अन्याकारक ठरते.
मुळात नियमच असा असायला हवा की सर्व सदनिकांची विक्री झाली की स्वत: बिल्डरने त्या जमिनीचा ताबा सोसायटीकडे देणे अनिवार्य असावे. अर्थात, मुळातच सोसायटी होण्यासाठी शासनाच्या ज्या अटी आहेत त्या बिल्डरधार्जण्यिा आहेत. शासनाचेही हात बिल्डरांच्या दगडाखाली अडकलेले असतात हे सर्व जाणतात .
– वर्षां दाणी, नवी मुंबई.

रेल्वेमंत्र्यांच्या विधानावर ‘हक्कभंग’ हवा
रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी प्रवासी रेल्वेभाडय़ात वाढ करून सामान्यजनांचे कंबरडे मोडले आहेच; परंतु सदर भाववा जाहीर करताना येत्या रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाववाढ करण्यात येणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.
अर्थसंकल्पात काय आहे किंवा नाही, हे सभागृहात मांडण्याआधीच जाहीर करणे म्हणजे अर्थसंकल्प फोडल्यासारखेच असून संसदीय कार्यपद्धतीत जर हे चुकीचे असेल, तर विरोधी पक्षांनी याबाबत संसदेत हक्कभंग प्रस्ताव मांडणे आवश्यक आहे. अनुचित प्रथेला पायबंद घालण्यासाठी ते उपयुक्त पाऊल ठरेल.
प्रदीप करमरकर, नौपाडा, ठाणे.

‘लॉबिइंग’ म्हणजे व्यूहरचना?
‘लॉबिंग नव्हे, लॉबिइंग हवे’ हे मुकुंद काळकर यांचे पत्र (लोकमानस ५ जाने.) वाचले. लॉबिइंगला मराठीत समर्पक प्रतिशब्द व्यूहरचना’ हा असावा, असे वाटते. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण-रचना या अर्थाने जाणकार मराठी समालोचकांनी ‘व्यूहरचना’ हा शब्द वापरला आहे. तो सर्वच क्षेत्रांत विविध अर्थछटांनिशी पोहोचण्यास हरकत नसावी, असे मला वाटते.
सुनंदा हर्णे- कुलकर्णी,  मलकापूर.

हा घ्या शिवभारताच्या विश्वासार्हतेचा पुरावा!
‘शिवरायांचे दैवत परशुरामाबद्दल वाद अनावश्यक’ या माझ्या पत्रावर (९ जाने.) संजय सोनवणी यांनी ‘शिवभारत हा ऐतिहासिक पुरावा नाही’ अशी प्रतिक्रिया (लोकमानस, १० जाने.) नोंदवली आहे.  या पत्रात त्यांनी शिवभारताच्या विश्वासार्हतेवर आक्षेप घेऊन कोणीही इतिहासकार या शिवभारताचा संदर्भ देत नाहीत, असे अत्यंत चुकीचे व बेजबाबदार विधान केले आहे. बहुधा हे विधान त्यांनी इतिहासाविषयीच्या अज्ञानातून केले असावे.
महाराष्ट्र शासनाने २०१२ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथाच्या’ प्रस्तावनेत ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार लिहितात, ‘शिवाजी महाराजांच्या आदेशाने परमानंदांनी संस्कृत चरित्र शिवभारत लिहिले आहे. खुद्द महाराजांच्या आदेशाने रचलेला हा ग्रंथ म्हणजे शिवचरित्राचे एक अतिशय विश्वसनीय असे साधन आहे. म्हणून अनेक इतिहास संशोधकांनी त्याचा गौरव केला आहे.
याच शिवभारताच्या आधारे स्वत: एक संस्कृत पंडित असलेल्या डॉ. आ. ह. साळुंखे यांनी शिवरायांवर बालपणी मातापित्यांनी शिक्षणाचे संस्कार कसे केले याची चर्चा – चिकित्सा केली आहे.’
थोर इतिहासकार देवीसिंग चौहान, त्र्यं. शं. शेजवलकर, ग. ह. खरे, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. सदाशिव शिवदे इत्यादी इतिहासकारांनी मोठय़ा विश्वासाने शिवभारताचे संदर्भ दिले आहेत. शिवचरित्रकार ग. भा. मेहेंदळे तर शिवभारताला अत्यंत विश्वसनीय साधन मानतात.
परशुरामाविषयी शिवभारतातील उल्लेखाशिवाय शिवाजी महाराजांनी परशुराम क्षेत्राची लावून दिलेली पूजाअर्चा, नैवेद्य, नंदादीप इत्यादीची व्यवस्था, छ. राजाराम महाराजांनी दिलेली इनामाची सनद आणि शाहू छत्रपतींनी परशुराम क्षेत्राचा केलेला जीर्णोद्धार या मराठी राज्यकर्त्यांनी परशुरामावरील श्रद्धेपोटी केलेल्या गोष्टी पुरावा म्हणून सोनवणी यांना अपुऱ्या वाटत असतील तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वत: रचलेल्या ‘बुधभूषण’ या ग्रंथाचा अभ्यास करावा. या ग्रंथाच्या पहिल्याच अध्यायात संभाजी महाराजांनी दशावतारांना वंदन करताना भगवान परशुरामांचा केलेला उल्लेख समजून घ्यावा म्हणजे त्यांचे शंकासमाधान होईल.
पांडुरंग बलकवडे

आता लष्करी कृतीच हवी
केवळ शेजारी राष्ट्र म्हणून भारताने आजपर्यंत पाकिस्तानचे जे लाड केले त्याचे आणखी एक फळ म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमारेषेचे उल्लंघन करून पूंछ येथील भारतीय ठाण्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेला हल्ला आणि भारतीय जवानांची पाकिस्तान्यांनी गळा कापून केलेली हत्या. भारत सरकारला जाग कधी येणार? तिकडे सीमेवर भारतीय सैन्य प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असताना आपले सरकार निष्क्रियपणे (म्हणजे कडक शब्दांत) फक्त निषेध दर्शवत असते.
सापाला दूध पाजले तरी तो डंख करणारच, हे माहीत असूनही आपण तर गेली ६५ वर्षे पाकिस्ताच्या रूपातील महाविषारी साप पाळत आहोत. त्या देशाला आपण विशेष देशाचा दर्जा बहाल करतो, त्यांच्या हल्ल्याला केवळ फलक आणि मेणबत्त्यांच्या मोच्र्याने उत्तर देतो. त्यांचे सरकारी अधिकारी आले की पंचतारांकित पाहुणचारावर न थांबता पाटर्य़ा झोडतो, क्रिकेटव  संगीत क्षेत्रात त्यांच्यासाठी पायघडय़ा घालत असतो. ‘आपने हमारे शो को चार चांद लगाये’ महणून त्यांचे कौतुक करतो. हे कार्यक्रम वा क्रीडा सामन्यांच्या आयोजकांना तर देशाभिमान नसतोच, लाजही नसते. पैसा आणि ‘टीआरपी’च्या हव्यासापुढे त्यांना काही दिसत नाही.
पाकिस्तानच्या अशा कृत्यांमुळे, प्रत्येक हल्ल्यागणिक आपल्या लष्करी अधिकाऱ्यांचे रक्त उसळत असेल, पण सरकारच्या नेभळट निष्क्रियतेमुळे त्यांना चीड येत असावी. या सर्वाला जबाबदार केवळ दुबळे राष्ट्रपती, कमजोर पंतप्रधान वा राज्यकर्तेच नाहीत तर त्यांना निवडून देणारी जनताही आहे. यामुळेच नेहमी वाटत असते की स्वातंत्र्य वा लोकशाहीला आपण लायक नाही. म्हणूनच हा देश किमान दहा वर्षे तरी लष्करी राजवटीच्या ताब्यात देण्याची गरज आहे.
विजय देशपांडे, शिवाजी पार्क, मुंबई.

खतांचापरिणाम?
रासायनिक खतांचा वापर गेल्या काही दशकांत वाढला असताना, हिंसक लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आता दिसून येते आहे. आजोबा, नातू, नवरा, बायको, प्रियकर यांनी खून केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत रोजच असतात. असली ही राक्षसी वृत्ती माणसात अचानक कशी वाढली? विचार करता असे वाटले की, हा रासायनिक खतांचा तर परिणाम नसावा? संबंधित तज्ज्ञ यावर प्रकाश टाकतील का?
रा. द. पर्वते, विरार, (प.)