30 March 2020

News Flash

६७. दत्तक!

‘आई’ आणि ‘मूल’ या रुपकानं ज्ञानेंद्रच्या अंत:करणात ठेच लागल्याची जाणीव झाल्यानं हृदयेंद्र संकोचला होता. तोच सखारामनं वाफाळलेल्या कॉफीसह अभ्यासिकेत प्रवेश केल्यानं त्याला किंचित दिलासा मिळाला.

| April 7, 2015 01:01 am

‘आई’ आणि ‘मूल’ या रुपकानं ज्ञानेंद्रच्या अंत:करणात ठेच लागल्याची जाणीव झाल्यानं हृदयेंद्र संकोचला होता. तोच सखारामनं वाफाळलेल्या कॉफीसह अभ्यासिकेत प्रवेश केल्यानं त्याला किंचित दिलासा मिळाला. हृदयेंद्रच्या मनाची चलबिचल जाणून कॉफीचा घुटका घेत-घेत ज्ञानेंद्र म्हणाला..
ज्ञानेंद्र – इट्स ओके हृदू.. पूर्वी मलाही फार वाईट वाटायचं.. पण एके दिवशी मी जे. कृष्णमूर्तीच्या जीवनातली एक घटना वाचली. ब्रिटनमध्ये त्यांची विचार प्रकटनं होत असतं. बरीच गर्दी होत असे. त्यात एक प्रौढ ब्रिटिश इसम हटकून येत असे. काही दिवस तो येईनासा झाला, तेव्हा त्याच्या मित्राला कृष्णमूर्तीनी कारण विचारलं. मित्र म्हणाला, ‘‘त्याचा एकुलता एक तरुण मुलगा मृत्यू पावला आहे. त्या दु:खामुळे तो कुठेच जात-येत नाही.’’ कृष्णमूर्ती म्हणाले, ‘‘मी त्याला बोलावलाय, असं सांगा आणि घेऊन या.’’ दुसऱ्या दिवशी कृष्णमूर्ती बोलू लागले तेव्हा त्या गर्दीतला त्याचा खिन्न व्याकुळ चेहरा ठळकपणे दिसत होताच. कृष्णमूर्तीच्या विचारधारेत जो-तो तल्लीन झाला असतानाच तो एकदम उसळून उभा राहीला आणि म्हणाला, ‘‘‘या ज्ञानाच्या गप्पा पुरे झाल्या. माझा एकुलता एक मुलगा गेला आहे, त्याचं सांगा..’’ कृष्णमूर्तीनी त्याच्याकडे एकटक करुणाद्र्र दृष्टीनं पाहिलं आणि विचारलं, ‘‘कोणत्या मेलेल्या मुलाबद्दल बोलताय तुम्ही?’’ त्या नजरेशी नजर भिडताच त्याचं जणू देहभानच हरपलं आणि त्याला आापले कित्येक जन्मं आठवू लागले! तोसुद्धा कुणाचा कर्तासवरता मुलगा असतानाच अनेक जन्मांत दगावला होता.. कित्येक जन्मांत त्याचीही कित्येक मुलं जन्मली होती आणि मेली होती! नेमक्या कोणत्या मेलेल्या मुलाबद्दल शोक करावा, नेमक्या कोणत्या मुलाच्या मृत्यूचं दु:खं अधिक तीव्र आहे, हे त्याला कळेना! हे वाचलं आणि मी स्तब्ध झालो.. अरे एखाद्या जन्मात एखादं मूल नाही जन्मलं तर अख्खा जन्म वेदनांचे व्रण बाळगत का जगावा? का अपूर्णता वाटावी? प्रत्येक गोष्ट आपापल्या जागी पूर्णच नसते का? कोणत्याही गोष्टीच्या असण्यानं किंवा नसण्यानं माझ्या ‘आहे’पणात काही अडसर आहे का? जे नाही त्याच्या दु:खापेक्षा जे आहे त्याकडे अधिक सजगतेनं का पाहू नये?
कर्मेद्र – पण प्रत्येकजण तुझ्याइतक्या वरच्या पातळीवरुन विचार नाही करू शकत.. प्रत्येकाचं जाऊ दे.. प्रज्ञा तरी तसा विचार करू शकते का?
ज्ञानेंद्र – मला दु:ख केवळ तिच्याच दु:खाचं वाटतं.. पण स्त्रीला पूर्णतेचं प्रमाणपत्र आईपणामुळेच का मिळावं? मूल जन्माला घालणं, हीच स्त्रीजन्माची इतिकर्तव्यता आहे का? स्त्रीच कशाला कोणाच्याही जन्माची ती परिपूर्ती का असावी? आम्ही दुर्गेला मानतो, सरस्वतीला मानतो, लक्ष्मीला मानतो.. त्यांच्या मुलाबाळांची नावं माहीत आहेत का? मी काही पुराणं वाचत नाही, त्यामुळे मला त्याची काही माहिती नाही, पण त्या मुलांची नावं माहीत नाहीत किंवा आठवत नाहीत, याचाच अर्थ दुर्गेचं पूर्णत्व आईपणामुळे नाही..
कर्मेद्र – उलट तीच खरी युगानुयुगांची माँ आहे! पण ज्ञान्या देवाधिकांच्या गोष्टी जाऊ दे.. मूल दत्तक घेणं, हा उत्तम पर्याय नाही का?
ज्ञानेंद्र – मी मूल दत्तक घेण्याविरोधात नाही, पण मला अजून तसं वाटत नाही. प्रज्ञाचंही या बाबतीत एकमत आहे. उलट तिच्या सामाजिक कार्यात ती आजही आईच्या मायेनंच तर वावरत आहे.. पण कुठेही नवी ओळख होऊ दे.. पहिला प्रश्न असतो, मुलं काय करतात? मग ‘काय मूल नाही?’ हा दुसरा प्रश्न आणि त्याला ‘सॉरी हं’चं अस्तर, मग तिसरा ठरलेला प्रश्न ‘मूल दत्तक का घेत नाही?’ अरे! आमची मर्जी! या प्रश्नांची उत्तरं देताना तिला अधिक वेदना होतात. तिला वाटतं, माझं दु:खं मी पुस्तकांत डोकं खुपसून लपवतो, पण मला भीती वाटते.. आता ती शेगावला काय जायला लागल्ये.. पोथी काय वाचते.. मूल नसलेलं परवडलं, पण हे भक्तीचं लोढणं नको..
हृदयेंद्र – पण तिनं काय करावं, याचं स्वातंत्र्य तिला का नसावं? उलट आपण अशाश्वतासाठीच झुरतो आणि अशाश्वताचा आधार मिळवण्यासाठीच धडपडतो. ती शाश्वत आधारच चाचपडत आहे, ही फार चांगली गोष्ट आहे. यालाच तर तुकाराम महाराज ‘अवघा तो शकुन’ म्हणतात.. देहाच्या पोटी जन्माला येऊन देवाला दत्तक जाणंच तर या जन्मात साधायचं आहे!
चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2015 1:01 am

Web Title: adoption
टॅग God
Next Stories
1 ६६. ‘मूल’ आणि ‘आई’पण..
2 ६५. एके कळते दुसरे
3 ६४. आहे ऐसा.. नाही ऐसा!
Just Now!
X