News Flash

मान्सूनसाठी उकाडय़ाच्या पायघडय़ा..

मान्सूनने संपूर्ण अंदमान-निकोबार बेटे आणि अंदमान समुद्र ओलांडला आहे. त्याची भारताच्या मुख्य भूमीच्या दिशेने आगेकूच सुरू झाली आहे.

| May 21, 2014 01:01 am

मान्सूनने संपूर्ण अंदमान-निकोबार बेटे आणि अंदमान समुद्र ओलांडला आहे. त्याची भारताच्या मुख्य भूमीच्या दिशेने आगेकूच सुरू झाली आहे. त्याचे अंदमानातील आगमन दोन दिवस आधीच झाले. आता प्रतीक्षा आहे, तो केरळमध्ये दाखल होण्याची. मान्सूनची ही हालचाल सुरू असतानाच महाराष्ट्रात काहीसे विचित्र वातावरण आहे. सध्या उन्हाळ्याचा काळ आहे. मे महिन्याचा हा काळ म्हणजे मराठवाडा, विदर्भासाठी तापमानाचा उच्चांक गाठण्याचा काळ. प्रत्यक्षात मात्र मुंबई-पुणे-औरंगाबाद-नागपूर अशा प्रमुख शहरांसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सगळीकडेच आकाशात मळभ आहे. परिणामी दुपारचे तापमान घटले असले तरी या वातावरणाने अनेकांची रात्रीची झोप मात्र उडवली आहे. विशेषत: आधीच आद्र्र असलेल्या मुंबईसह किनारी भागात उकाडय़ाने हैराण केले आहे. कमाल तापमान फारसे वाढलेले नाही, मात्र ढगाळ हवामानामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने काहीही श्रम न करता घामाच्या धारा लागत आहेत. त्यातच रात्रीसुद्धा दिलासा मिळत नसल्याने परिस्थिती अधिकच त्रासदायक बनली आहे. आताच्या या वातावरणाने मुंबईला घामाघूम केले असले तरी विदर्भ-मराठवाडय़ाला जणू उ:शाप मिळाला आहे. विदर्भात तर या दिवसांत पारा ४५ अंशांच्या पुढे जातो. या वेळी मात्र ऐन हंगामात तो ४२-४३ अंशांच्या आसपास घुटमळत असल्याने तिथे उष्णतेची लाट जाहीर करण्याची अद्याप वेळ आलेली नाही. एकाच वातावरणाचा कुठे त्रास, तर कुठे काहीसा दिलासा! आता अनेकांच्या मनात एक शंका आहे, ती या वातावरणाचा मान्सूनच्या आगमनावर आणि आगामी पावसावर काही परिणाम होणार का? या वातावरणाचे कारण समजून घेतले की त्याचा उलगडा होईल. महाराष्ट्रात हिवाळ्यापासून हवामानाचे तंत्र बिघडल्याचे पाहायला मिळाले. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये राज्याच्या अनेक भागांना गारपिटीने तडाखा दिला. त्यामुळे उन्हाळा सुरू व्हायलाच मुळी उशीर झाला. एप्रिल महिना उजाडला तरी अनेक ठिकाणी उन्हाळा सुरूच झाला नव्हता. तो सुरू झाला आणि वातावरणात उष्मा वाढायला लागला, तोच ढग आडवे आले. त्यांनी तापमानात फारशी वाढ होऊ दिली नाही. विशेष म्हणजे दुष्काळी पट्टय़ात तासगावसारख्या भागात गेला महिनाभर दररोज किंवा एक दिवसाआड पावसाच्या सरी अनुभवायला मिळत आहेत. आता गेला आठवडाभर राज्यभर हे ढगांचे मळभ. हवामानाच्या घटकांचा विचार करता असे वातावरण उन्हाळ्यात आपल्याकडे असतेच. ते इतके जास्त दिवस अनुभवायला मिळत नाही हाच काय तो फरक. सामान्यत: असे बोलले जाते की जितका जास्त उकाडा तितका चांगला पाऊस! मात्र, आताच्या ढगाळ वातावरणाचा संपूर्ण मान्सूनच्या पावसावर विशेष परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने फेटाळून लावली आहे. त्याचा परिणाम झालाच तरी तो अगदीच नाममात्र असेल. या वातावरणाचा पावसावर विशेष परिणाम होणार नसला तरी पिकांवर परिणाम झाला आहे. हवामानाच्या लहरीचा आंब्यासह इतर फळांना भरपूर फटका बसला आहे. त्यामुळे पुढेही असेच होत राहणार नाही ना, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. हवामानात झालेले बदल पुढेही असेच कायम राहणार, की ते पुन्हा पूर्वपदावर येणार हे इतक्या सहजपणे ओळखता येत नाही. म्हणजे थोडक्यात असे की, सध्या तरी ‘आहे ही स्थिती अनुभवणे’ एवढेच काय ते आपल्या हाती आहे. तिकडे मान्सूनचे आगमन आणि इकडे मात्र घामाच्या धारा, हा आपल्या हवामानातील विविधतेचाच भाग आहे. आता अवतरलेल्या ढगाळ वातावरणाने या वेळीसुद्धा तो दाखवून दिला असल्याने, उकाडय़ाच्या या पायघडय़ांवरून पर्जन्यराजांचे आगमन कधी होणार, याकडे डोळे लावायचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 1:01 am

Web Title: advancing monsoon on its natural course to hit andaman nicobar islands
Next Stories
1 व्हिएतनामची कोंडी
2 वरदहस्त: कोणाचा? कोणाला?
3 विहंगमनाचा माणूस..
Just Now!
X