काळ, काम आणि वेग यांची सांगड घालण्याची कसरत करणाऱ्या प्रत्येकालाच, आपल्यापलीकडच्या जगाकडे पाहण्यासाठी आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी पुरेसा वेळच नाही. अगोदरच बिनचेहऱ्याची, त्रयस्थपणे आसपास वावरणारी गर्दी अलीकडे अधिकच एकाकी होऊ लागली आहे..
आपण असे का झालो आहोत?.. असे नसू, तर आपण एकटे असतो तेव्हा वेगळे असतो, आणि समूह, समाज म्हणून अनेक जण असतो तेव्हा वेगळे असतो, असे का?.. समूहात वावरताना आपण आपला व्यक्तिगत समजूतदारपणा हरवलेला असतो का?.. असे अनेक प्रश्न वर्षांनुवर्षे आपल्यासमोर आक्राळपणे उभे राहिले आहेत आणि अजूनही आपण त्याची उत्तरे शोधतोच आहोत. परवा, कल्याणहून पनवेलकडे जाणाऱ्या एका एसटी बसगाडीच्या वाहक महिलेला एका मुजोर गुंडाने भर रस्त्यात, प्रवाशांच्या देखत अमानुष मारहाण केली. बसमधील सारे प्रवासी मात्र, उघडय़ा डोळ्यांनी थंडपणे हा सारा प्रकार पाहत बसून राहिले. एका असहाय तरुणीवर ओढवलेल्या अशा प्रसंगाच्या वेळी कोणत्या पराभूत मानसिकतेमुळे प्रवाशांचे हात बांधले गेले होते? .. त्या तरुणीवर ओढवलेला प्रसंग आपल्या कुटुंबातील कुणावर कोसळू शकतो, असा विचारदेखील त्या क्षणी कुणाच्याच मनात आला नसेल? विरोधाची थेट कृती तर दूरच, पण विरोधाचा साधा शब्ददेखील एकाही तोंडून फुटू नये, एवढी कोणती दहशत त्या एका गुंडाने समूहावर गाजविली होती, याची उत्तरेदेखील शोधली गेली पाहिजेत. त्या प्रकारानंतर त्या पीडित महिलेने काढलेले उद्गार त्या बसगाडीतील बघ्यांच्या जमावालाच नव्हे, तर संपूर्ण समाजाला शरमेने मान खाली घालावयास लावणारे आहेत. त्या प्रकारानंतर आणि ‘त्या हैवानापेक्षाही, बघ्यांची भीती वाटते’, या त्या असहाय तरुणीच्या उद्विग्न उद्गारांनंतर, आता, प्रत्येकालाच शरमही वाटू लागली असेल. प्रत्येकाच्याच मनात संतापाचा उद्रेक सुरू झाला असेल, कदाचित, भररस्त्यात एका महिलेला बेबंदपणे मारहाण करणाऱ्या त्या नालायकाला मनातल्या मनात शिव्याशापांची लाखोलीही वाहिली जात असेल, आणि अशा प्रसंगांमध्ये समाज किंवा समूह थंडपणे बघ्याची भूमिका घेतो, याबद्दल कदाचित मनामनात चीडही उसळू लागली असेल. पण असे विचार मनात उसळू लागतात त्या वेळी, आपण एकटे असतो. ते संतापाचे, निषेधाचे आणि शिव्याशापांचे विचार एकटय़ा मनात उमटलेले विचार असतात, आणि आपण त्या प्रवाशांच्या समूहात असतो, तर नेमके काय केले असते, याचा विचारही त्या मनाला त्या वेळी शिवलेला नसतो. समाजाची मानसिकता आणि व्यक्तीची मानसिकता यांमध्ये असलेली ही दरी घातक आहे. ती बुजविली पाहिजे, असेही कदाचित प्रत्येकालाच वाटत असते, पण या दरीची सुरुवात कुठे होते याचाच बहुधा कुणाला थांगपत्ता नसतो. या दरीत आपण आहोत का, हेही आपल्याला माहीत नसते, म्हणून त्या दरीतून बाहेर पडण्याचा किंवा ती दरीच बुजविण्याचा विचारदेखील आपल्या मनाला शिवलेला नसतो.
एकटेपणा आणि सामूहिकपणा यांच्यातील या दरीची भयानक जाणीव करून देणारे असंख्य प्रसंग आसपास घडत असतानाही, केवळ बघ्याची भूमिका घेत अशा प्रसंगांपासून दूर राहण्याची केविलवाणी धडपड करण्याची प्रवृत्ती आजची आहे, असे नाही. बघ्याची भूमिका हा अनेक प्रसंगांमधील जणू गर्दीचा स्थायीभावच ठरला आहे. अशा भूमिकेत असताना, एकटेपण विसरले जाते, आणि गर्दीच्या मानसिकतेत प्रत्येक जण बेमालूम मिसळून जातो. बाजूचा कुणी तरी पुढे येईल असा विचार बळावतो, आणि तसे झाले नाही, तर त्रयस्थपणे आपण पुन्हा गर्दीबाहेर पडून एकटे होतो. हे नेहमीच होत असते. पण अलीकडच्या काळात ही प्रवृत्ती झपाटय़ाने फोफावत चालली आहे. झपाटय़ाने गर्दीच्या कडेलोटापर्यंत पोहोचणाऱ्या शहरांमध्ये, आपल्या आसपास माणसांचे असंख्य देह वावरताना दिसत असूनही कधी कधी आपल्याला एकटेपणा वाटतो. एखादे संकट आपल्यावर कोसळले, तर ही गर्दी आपली सोबत करीलच, याची शाश्वती वाटत नाही. कारण या गर्दीला चेहरा नाही. म्हणून, गर्दीचे भावही ओळखता येत नाहीत.
ती त्रयस्थ असते, हे मात्र क्षणोक्षणी जाणवत राहते. कारण या गर्दीतील प्रत्येकाच्या एकमेकांशी असलेल्या नात्याचे धागे तुटकपणामुळे विरत चालले आहेत. या गर्दीतील प्रत्येक जण आपल्यासारखाच एकएकटाच आहे आणि या गर्दीच्या एकटेपणावर ‘मला काय त्याचे’ या भावनेचे मळभ साचलेले आहे, हेही प्रत्येकाला कळत-नकळत जाणवलेले असते. सभोवती घडणाऱ्या अप्रिय प्रसंगी ही गर्दी मनातल्या मनात कदाचित, एकटेपणानेच कुढत असेल, आपल्यासारखीच संतापत असेल, आणि मुठीही आवळत असेल.. पण आजूबाजूची प्रत्येक मूठही अखेर एकटीच आहे, या जाणिवेने असहाय भाव मनात बळावत असेल. आवळलेल्या त्या मुठी क्षणकाळानंतर आपोआप सैलावत असतील, आणि त्या प्रसंगापासून आपल्यापुरते दूर राहण्यासाठी त्या गर्दीतील प्रत्येक जण एकएकटा प्रयत्न करीत असेल. मुंबईसारख्या गर्दीने ओथंबलेल्या महानगरातच नव्हे, तर सर्वत्रच, याच, एकटेपणाच्या भावनेमुळे, गर्दीलादेखील सामूहिक शक्तीचा विसर पडू लागला असेल. म्हणूनच, त्याची कारणेही शोधली पाहिजेत. अशा प्रसंगी पीडिताच्या मदतीकरिता पुढे सरसावलेच, तर त्यानंतरच्या सर्व सोपस्कारांमध्ये सहभागी होण्याएवढा वेळ प्रत्येकाकडे नाही, असे एक कारण दिले जाते. एखाद्या प्रसंगात असे मदतीचे धाडस दाखविलेच, तर नंतरचे पोलीस ठाण्यांवरील हेलपाटे, कोर्टकचेऱ्या साक्षीपुराव्यांचे फेरे आणि तपास यंत्रणा आणि गुन्हेगाराचे लागेबांधे, त्यामधील व्यवहारांचे अर्थसंबंध असे पांढरपेशा मानसिकतेला अनाकलनीय असणारे सारे अडथळे पार करून गुन्हा सिद्ध होईलच याची शाश्वती नसेल, तर त्यापासून लांब राहिलेलेच बरे, असा पांढरपेशा विचार अनेकदा अलिप्तपणाला कारणीभूत ठरतो, असेही स्पष्टीकरण दिले जाते. याआधीच्या अशा किती तरी घटनांमुळे या विचाराला बळदेखील मिळत गेले आणि गुन्हेगारावरील आरोप सिद्ध करण्याकरिता तपास यंत्रणा खरोखरीच गंभीर असतात का, या शंकेमुळे अलिप्तपणाचे पदर आणखी गडद होऊ लागले.
गर्दीच्या या अलिप्तपणाच्या भावनेला बळ देणारी आणखी एक बाब अलीकडे प्रबळ होऊ लागली आहे. याकडे अजूनही फारसे गंभीरपणे पाहिले जात नाही. काळ, काम आणि वेग यांची सांगड घालण्याची कसरत करणाऱ्या प्रत्येकालाच, आपल्यापलीकडच्या जगाकडे पाहण्यासाठी आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी पुरेसा वेळच नाही. अगोदरच बिनचेहऱ्याची, त्रयस्थपणे आसपास वावरणारी गर्दी अलीकडे अधिकच एकाकी होऊ लागली आहे. आसपास असलेली अनेक शरीरे, एकत्र असतानाही, आपल्याआपल्यापुरतीच, एकटी असतात, हे अनुभवण्यासाठी फार लांब जावे लागत नाही. गर्दीने खचाखच भरलेल्या एखाद्या प्रवासात, जो जो सहभागी होत जातो, तो आपल्यापुरती जागा मिळताच, खिशातील मोबाइल हाती घेतो, इयरफोन कानाला लावतो, आणि आपल्यापुरत्या समस्या विसरण्याच्या प्रयत्नांत, मोबाइलमध्ये साठविलेल्या सुरांच्या वा खेळांच्या दुनियेत एकटाच रंगून जातो. कुणी, आपल्यापुरती जागा मिळताच लॅपटॉप उघडून जगाची सफर करू लागतो, तर कुणी हातातल्या टॅबलेटवरून मनाला रिझविणाऱ्या करमणुकीच्या विश्वात रममाण होऊन जात आसपासच्या अस्तित्वापासून स्वत:ला अलिप्त ठेवतो.
आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधताना, या कारणांचा विचार केला गेला पाहिजे. आपण असे का आहोत, आपल्या पांढरपेशा अलिप्तपणामुळे समूहाच्या मानसिकतेलाही हतबलपणा येतो, हे आपण विसरत का चाललो आहोत, याची उत्तरे कदाचित यांमध्ये सापडू शकतात. अशा प्रसंगांत ज्या यंत्रणांवर आश्वस्त राहावयाचे, त्यांचा सबळ पाठिंबा, त्यांच्याविषयीचा विश्वास नि:संदेह असला पाहिजे. असे घडले, तर बघ्यांची भीती वाटणारच नाही, उलट आसपासच्या हैवानांचा मुकाबला करण्याचीही शक्ती अंगी येईल.