मराठा सेवा संघाची स्थापना नव्वदची. त्याच्या आगेमागे केव्हा तरी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, त्यांचा ओबीसींमध्ये समावेश करावा अशी मागणी पुढे आली. म्हणजे किमान २३ वर्षांपासून हा लढा सुरू आहे. वस्तुत: पहिल्या काकासाहेब कालेकर आयोगापासून अगदी आताचा, १९९६चा न्या. खत्री आयोग आणि २००४चा न्या. बापट आयोग येथपर्यंत किमान सहा आयोगांनी मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करण्यास नकार दिला आहे. पण ही आरक्षणाची दिंडी थांबलेली नाही. एखाद्या समाजाला आपल्या उत्कर्षांसाठी राखीव जागा असाव्यात असे वाटले, तर त्यात कणभरही गर नाही. तशी मागणी करण्याचा हक्कत्यांना घटनेनेच दिलेला आहे. तेव्हा मराठा समाजाने अशी मागणी केली म्हणून त्यावर कोणी टीका करण्याचे कारण नाही. मागणीची योग्यायोग्यता हा वेगळा भाग झाला आणि तो भावनेपेक्षा कायदा आणि विवेकानेच हाताळला पाहिजे. सध्या नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रश्नाचा अभ्यास करीत आहे. निवडणुकीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हा अभ्यास कामी यावा, अशा तरतुदी येत्या काही महिन्यांत करण्यात आल्या, तर त्यात काहीच आश्चर्य नसेल. दरम्यानच्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर छोटी-मोठी आंदोलने सुरूच आहेत. हा काही मूठभर मराठा नेत्यांच्या राजकीय जीवन-मरणाचा प्रश्न आहे. तेव्हा ते त्यात मशाली आणि चूड घेऊन उभे ठाकल्याचे दिसत आहेत. हेही चित्र महाराष्ट्राला आता नवे नाही. हल्ली राजकारणात उपटसुंभांचा एक प्रवाह मुख्य धारेला धरून वाहताना दिसतो. तो लहान असला, तरी त्याने राजकारणाची आणि समाजकारणाची खराबी होतेच. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून हेच होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही आपल्या प्रत्येक संघर्षांत जो साध्य-साधनविवेक नेहमीच बाळगला, त्यालाही या आरक्षण लढय़ाच्या सेनापतींनी पायदळी तुडवले आहे. छावा संघटनेचे नेते बाळासाहेब पाटील यांनी या लढय़ामध्ये चक्क हैदराबादचे खासदार असुदिद्दीन ओवेसी या वादग्रस्त नेत्याला उतरविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हे कोणत्या प्रतीचे राजकारण आहे? पाटील यांना नेमके कोणाला ‘मेळवायचे’ आहे? त्यांचा वाद विनायक मेटे यांच्याशी आहे. मेटे यांनी आरक्षणाचा भंडारा उधळून सत्तेचे खोबरे पटकावले आणि केले काहीच नाही, असा पाटील यांचा आरोप आहे. मेटेंचा   मगदूर आणि पाटलांचे पाणी मराठा समाज जोखून आहे. यातला खरा वाद राणे समितीच्या      स्थापनेचे श्रेय लुटण्याचाच आहे, हेही लपून राहिलेले नाही. त्यावरून या दोन्ही नेत्यांनी आपसात खुशाल भांडावे. आक्षेप त्याला नाही. आक्षेप आहे तो ओवेसीसारख्या भंपक नेत्याला बांग देण्याला. ओवेसीचा या वादात संबंध काय? त्यांनी नांदेडमध्ये यश मिळविले. त्या शक्तीचा वापर मेटेंविरोधात करण्याचा पाटील यांचा प्रयत्न असू शकेल. तसे असेल तर त्यांनी पुन्हा एकदा िहदुस्थानच्या इतिहासाचे वाचन करावे. शिवरायांच्या पदरी मुस्लीमही होते, असा युक्तिवाद यावर छावाचे नेते करीत आहेत. हे पाहता त्यांना इतिहासाच्या वाचनाची नक्कीच आवश्यकता आहे, हे स्पष्ट दिसते. शिवरायांच्या चरित्रातून त्यांनी राजकारणातील मूल्यविवेक घेतला तरी खूप झाले. मराठा समाजाच्या उत्कर्षांसाठी आपणच तेवढे झगडतो असा या तथाकथित तारणहारांचा समज आहे. तो किती   फोल आहे, हेच त्यांच्या या अशा उद्योगांतून स्पष्ट होत आहे.