दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद संपल्यानंतरच्या काळात राज्यघटना लेखनात सहभागी झालेले आणि पुढे १९९४ ते २००९ अशी १५ वर्षे न्यायाधीश म्हणून कारकीर्द केलेले आल्बी सॅक्स यांना तैवानचा ‘टँग पुरस्कार’ जाहीर झाला म्हणून सॅक्स यांचे नाव जसे पुन्हा चर्चेत आले, तसेच या पुरस्काराची जागतिक प्रतिष्ठाही वाढलीच.
आल्बी यांचे पूर्ण नाव आल्बर्ट लुई सॅक्स. वयाच्या एकविसाव्या वर्षी (१९५६) ते कायद्याचे पदवीधर झाले, पण न्यायाचा विचार करण्याचे बाळकडू त्यांना आईवडिलांकडूनच मिळाले होते. ते मूळचे रशियन ज्यू आणि साम्यवादी. हिटलरी काळात दक्षिण आफ्रिकेत आले. वर्णभेदावर तेव्हाही त्यांनी आवाज उठविला. पालकांच्या या संस्कारांमुळे, १९६० नंतर तथाकथित स्वातंत्र्य मिळूनही दक्षिण आफ्रिका हा देश वर्णभेदीच राहू नये, यासाठीच्या चळवळीत ते सहभागी झाले. आधी ९०, मग १८० दिवस कोणत्याही चौकशी वा खटल्याविना कोणालाही डांबण्याचा अधिकार वर्णभेदी शासनाने स्वत:कडे घेतला होता. त्यास विरोध करणाऱ्या आल्बी यांना याच कायद्याखाली, पण एकांतवासात ठेवण्यात आले. तोवर त्यांचे लग्नही चळवळीतील कार्यकर्तीशी झाले होते. एकांतवासाचा धसका घेऊन, आल्बी यांनी देश सोडण्याचे ठरवले आणि १९६६ साली ते ब्रिटनला गेले. तेथे ‘जेल डायरी ऑफ आल्बी सॅक्स’ हे पुस्तक त्यांनी लिहिले, ते गाजले आणि चळवळीत आल्बी यांचा पुनप्र्रवेश होण्याची वाट खुली झाली.
 एव्हाना कायद्याचे अध्यापक झालेले आल्बी आफ्रिकेतील अनेक कार्यकर्त्यांच्या संपर्कात असत. पुढे १९७४ मध्ये जस्टिस इन साऊथ आफ्रिका हे पुस्तक त्यांनी लिहिले आणि त्याची दखल घेऊन ब्रिटनच्या ससेक्स विद्यापीठाने त्यांना १९८१ मध्ये संशोधन पाठय़वृत्ती दिली. त्याआधीच, १९७५ मध्ये स्वतंत्र झालेल्या मोझांबिक देशातून मायदेशाशी अधिक संपर्क ठेवता येईल, म्हणून आल्बी तेथे गेले होते. तेथे त्यांच्यासह पुन्हा आफ्रिका खंडात राहणे पत्नी व मुलांनी नाकारले, तेव्हा ते एकटेच राहू लागले. याच ११ वर्षांच्या वास्तव्यादरम्यान, १९८८ साली त्यांच्या मोटारीत एका कृष्णवर्णी अतिजहाल माथेफिरूने बॉम्बस्फोट घडवला. एक हात व डोळा आल्बींनी गमावला. परंतु याच आरोपीला पुढे द. आफ्रिकेत भेटून, त्याच्याशी प्रदीर्घ संवाद साधून त्याचे हृदयपरिवर्तन घडवण्यात आल्बींनी यश मिळवले. समलिंगी विवाहांना अनुमती देणारा निकाल (२००५) देणारे ते पहिले बिगरपाश्चात्त्य न्यायमूर्ती. यानंतर त्यांनी व्हेनेसा या तरुणीशी लग्न केले आणि ७९व्या वर्षी, १० वर्षांच्या मुलाचे पिता म्हणून ते निवृत्त आयुष्य जगत आहेत.