अगडबंब अलीबाबाच्या तुलनेत सध्या तरी आपल्या कंपन्या रांगतं पोर आहेत.. अलीबाबाच्या गुहेत कोटय़वधींची भांडवल उभारणी होत असताना, आपण कसं वाढायचं हा विचार गरजेचा आहेच..
राजकारण असो वा समाजकारण, आपल्याला सोप्या गोष्टीच कळतात. उदाहरणार्थ चीनचे अध्यक्ष क्षी जिंगिपग भारतात आले होते तर आपल्याला दिसत होती चिनी सनिकांची घुसखोरी. ती महत्त्वाची होतीच. कारण थेट आपल्या सुरक्षेचाच प्रश्न होता. परंतु धोका काही दिसत असतो तिथूनच असतो असं नाही. किंबहुना तसा तो नसतोच. चीनच्या बाबत तर ही बाब अगदीच लागू पडते. या देशाकडून असलेला धोका दुहेरी आहे. जो सगळ्यांना दिसतो तो तर आहेच. पण त्याहूनही अधिक जे सहज दिसत नाही तिथून अधिक आहे. उदाहरणार्थ बाजारपेठ.
आता चिनी बाजारपेठ म्हटल्यावर साहजिकच समोर येतात त्या चिनी वस्तूंनी ओसंडून वाहणाऱ्या आपल्याकडच्या बाजारपेठा. आता तर काय आपले गणपतीसुद्धा चिनी बनावटीचे आलेत म्हणे. असो. तो काही आपला आजचा मुद्दा नाही. तर बाजारपेठ म्हणजे भांडवली बाजारपेठ. आता सर्वसाधारण माणसाला या बाजारपेठेविषयी फारसं काही माहीत नसतं. म्हणूनच ते समजावून घ्यायला हवं. तर मुद्दा आहे या बाजारपेठेचा आणि या बाजारपेठेचं प्रतीक आहे अलीबाबा.
हा अलीबाबा पूर्णपणे चिनी बनावटीचा. चीनमध्ये जन्मलेला आणि जगाला गवसणी घालायला निघालेला. त्याची ही पृथ्वीप्रदक्षिणा नुकतीच सुरू झालीये. कोण आहे हा अलीबाबा? काय त्याचं इतकं कौतुक?
खरं म्हणजे या प्रकरणातला अलीबाबा म्हणजे आहे एक वेबसाइट. जॅक मा या तरुणानं काढलेली. फार जुनी आहे असंही नाही. १९९८ सालचा तिचा जन्म. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातला. पण आताच का त्याची कहाणी ऐकायची? कारण याच आठवडय़ात या कंपनीचा आयपीओ आलाय. म्हणजे भांडवली बाजारातून ही कंपनी पसे उभे करणार आहे. लोकांना ही कंपनी आपले समभाग विकणार आणि भांडवल उभं करणार. यावर अनेकांना प्रश्न पडेल त्यात काय एवढं? आपल्या कंपन्याही हे करतातच की. पण या अलीबाबाचं लक्ष्य किती आहे याचा काही अंदाज?
या आयपीओतून अलीबाबा उभारू इच्छितो तब्बल २२०० कोटी डॉलर. म्हणजे साधारण एक लाख २६ हजार कोटी रुपये. पण त्यातली बातमी ही नाही!
तर या आयपीओचं महत्त्व यासाठी की तो जगातल्या आतापर्यंतच्या सगळ्यात मोठय़ा आयपीओतला एक आहे. आणि त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे आपण यात कुठेही नाही. तेव्हा या आयपीओ प्रकरणाचा आढावा घ्यायला हवा. या अलीबाबाचं महत्त्व यासाठी की तो अनेक अमेरिकी कंपन्यांच्या आयपीओपेक्षाही मोठा आहे.
असा आपल्याला माहीत असलेला मोठा आयपीओ होता तो लोकप्रिय अशा फेसबुक या कंपनीचा. तो होता १६०० कोटी डॉलरचा. जेव्हा आला होता तेव्हा तो सर्वात मोठा आयपीओ होता. याचाच अर्थ असा की चिनी कंपनीनं अमेरिकी कंपनीला आयपीओत मागे टाकलंय. पण गंमत म्हणजे अलीबाबाचा आयपीओ हा काही आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ नाही. तो मान पुन्हा चिनी कंपनीकडेच जातो. या कंपनीचं नाव आहे अ‍ॅग्रिकल्चर बँक ऑफ चायना. या कंपनीने २०१० साली समभाग विक्रीतून २२,१०० कोटी डॉलर्स इतकी रक्कम उभी केली.
यातली आपले डोळे फाडेल अशी बाब म्हणजे अलीबाबाचं मूल्यांकन. ते आहे तब्बल १,६२,००० कोटी एवढं. तरीही यातली धक्कादायक बाब ही की इतकं प्रचंड मूल्यांकन होऊनही अलीबाबा जगातल्या पहिल्या २० मूल्यांकित कंपन्यांत नाही. पण या यादीत तीन चिनी कंपन्या आहेत आणि एकसुद्धा भारतीय कंपनी त्यात नाही. पेट्रो चायना, इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड कमíशयल बँक ऑफ चायना आणि चायना मोबाइल या त्या तीन कंपन्या. यातल्या प्रत्येक कंपनीचं मूल्यांकन आजमितीला जवळपास २०,००० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक आहे.
आता या पाश्र्वभूमीवर आपली परिस्थिती तपासून पाहायला हवी.
आपल्याकडचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ कोल इंडिया या सरकारी कंपनीचा. त्यातून उभे राहिले फक्त ३४० कोटी डॉलर. आणि अलीबाबा उभा करणार आहे २२०० कोटी डॉलर. आपल्या बाजारातली सर्वात अधिक मूल्यांकित कंपनी म्हणजे टाटा कन्सल्टन्सी- म्हणजे टीसीएस. तिचं मूल्य आहे ८५०० कोटी डॉलर. आणि मोठय़ा चिनी कंपन्यांचं मूल्यांकन किती आहे? २०,००० कोटी डॉलर किमान. याचा साधा अर्थ असा की सरासरी मोठी चिनी कंपनी आपल्या सर्वात मोठय़ा कंपनीच्या दुपटीपेक्षा अधिक आहे. टीसीएस वगळता आपल्या अन्य दोन कंपन्या, म्हणजे ओएनजीसी आणि रिलायन्स यांच्या तुलनेत चिनी कंपन्यांचा आकार तर आपल्या चौपट आहे.
हे सगळं कशासाठी समजून घ्यायचं?
केवळ आपल्याला आपण कुठे आहोत हे कळावं म्हणून नाही. ते तर समजायला हवंच. पण त्याबरोबर आपल्याला धोका कुठून आहे आणि धक्का कुठून बसू शकतो याचंही भान असावं म्हणून. ते असायला हवं याचं कारण हा अलीबाबा आता भारतात येऊ इच्छितो.
काय व्यवसाय करतो हा अलीबाबा? ती एक साधी वेबसाइट आहे. तशा अन्य अनेक असतातच. फक्त हिचं वैशिष्टय़ हे की या वेबसाइटवरून ग्राहक आणि उत्पादक यांना थेट संधान बांधता येतं. म्हणजे या वेबसाइटच्या माध्यमातून उत्पादकांना आपला माल सरळ ग्राहकांना विकता येतो आणि ग्राहकांना प्रत्यक्ष उत्पादकांकडूनच खरेदी करता येते. हे दोघांसाठी सोयीचं. कारण मधले सर्व अडते आणि दलाल यांना बाजूला ठेवून व्यवहार करता येतात. त्यामुळे उभयतांचा वेळ आणि ऊर्जा वाचते. म्हटलं तर किती साधी संकल्पना. पण चिनी कंपनीला सुचली आणि त्याने ती जागतिक पातळीवर राबवून दाखवली. तेव्हा कल्पना केलेली बरी हा अलीबाबा जर भारतात आलाच तर काय गहजब उडेल त्याची.
म्हणूनच सीमेवरनं होणाऱ्या सनिकी घुसखोरीइतकीच, किंबहुना त्याहूनही अधिक ही बाजारपेठेतली घुसखोरी दखल घ्यावी अशी आहे.
चीनच्या या अगडबंब अलीबाबाच्या तावडीतून म्हणूनच आता कुठे रांगू लागलेलं आपल्या बाजारपेठेचं पोर वाचवायला हवं.